Breaking News
Home / मराठी तडका / ‘येऊ कशी तशी नांदायला’ मालिकेतील ओंकार खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघूया ओंकारची जीवनकहाणी

‘येऊ कशी तशी नांदायला’ मालिकेतील ओंकार खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघूया ओंकारची जीवनकहाणी

अनलॉक नंतर अनेक मालिका आल्या आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा भागही झाल्या. पण यात एका मालिकेने अशी काही एन्ट्री घेतली आहे की प्रत्येकाने या मालिकेची आणि पर्यायाने यातील कलाकारांची नोंद घ्यावी. ही मालिका म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला. या मालिकेतील अन्वीता फलटणकर या नायिकेविषयी आमच्या टीमने एक लेख लिहिला होता. या लेखाला आपण मोठ्या प्रमाणात वाचकसंख्येच्या रुपात प्रतिसाद दिलात. आपल्या या प्रेमाबद्दल धन्यवाद! आज आपण या मालिकेतील नायकाविषयी थोडंस जाणून घेणार आहोत. या मालिकेत स्वीटू आणि ओंकार ही पात्र अतिशय गाजत आहेत. या जोडीतील ओंकार म्हणजे शाल्व किंजवडेकर. चला तर पाहूया ओंकारचा चित्रपटसृष्टीतील जीवनप्रवास आणि खऱ्या आयुष्यात शाल्व कसा आहे ते.

शाल्व यांस आपण याआधी प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकं, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट अशा विविध माध्यमांतून अभिनय करताना पाहिलं आहे. शाल्व मूळचा पुणेकर. बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सगळं पुण्यात झालं. या सोबत झाले ते कलाक्षेत्राचे संस्कार. या क्षेत्रातील त्याची आवड लक्षात घेता त्याने अगदी कमी वयात ह्याच क्षेत्रात आपली कारकीर्द घडवायची असा निर्णय त्याने घेतला. पण केवळ निर्णय घेऊन तो थांबला नाही, तर त्या दिशेने पाऊलं टाकणं ही सुरू केलं. एकांकिका, प्रायोगिक नाटकं यांतून त्याने स्वतःतील अभिनेत्याला शोधलं. प्रत्येक कलाकृती आणि प्रयोगागणिक तो या अभिनेत्याला पैलू पाडत गेला. स्वतः एक उत्तम चित्रकार असल्यामुळे असेल कदाचित पण त्याने अभिनेता म्हणून केलेलं स्वपरिक्षण त्याने स्वतःतील अभिनय क्षमतांना फुलवताना वापरलं. यामुळेच जेव्हा तो एका हिंदी चित्रपटाच्या ऑडिशन ला गेला, तेव्हा त्याची निवडही झाली. त्याच्या कारकिर्दीतला हा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाचं नाव ‘हंटर’. त्याने हिंदी सोबतच मराठी चित्रपटांतूनही अभिनय केला आहेच. माधुरी दीक्षित यांनी अभिनित केलेल्या बकेट लिस्ट या चित्रपटात त्याने महत्वपूर्ण भूमिका साकार केली. तसेच राजेश्वरी सचदेव आणि के.के. मेनन यांच्या ‘एक सांगायचंय’ या चित्रपटात त्याने ध्रुव ही व्यक्तिरेखा साकार केली होती.

चित्रपटात काम करत असताना रंगमंचावर ही त्याचा वावर कायम होताच. कधी अभिनेता म्हणून तर कधी या नाट्यकलेचा प्रशंसक म्हणून. त्याने अभिनित केलेली नाटकं ही गाजली आहेत. त्यातील ‘गजब कहानी’ या नाटकातील त्याची जर्मन राणीची भूमिका प्रेक्षकांना आवडून गेली. तसेच त्याचे पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’. या नाट्य क्षेत्रावर आधारित ‘से’ क्स, ड्र’ ग्स अँड थिएटर’ या कलाकृतीतही त्याने अभिनय केलेला आहे. नाटक, चित्रपट यांच्यासोबत त्याने वेब सिरीज सारख्या नवं माध्यमातून स्वतःची छाप पाडली आहे. ‘गोंदया आला रे’ या वेब सिरीज चा तो एक महत्त्वाचा भाग होता. तसेच ‘मेड इन हेव्हन’ या वेब कलाकृतीतही त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘आई-बाबा, दिवाळी आणि मी’ या भा.डी. पा. च्या वेबीसोड्समधूनही त्याने अभिनय केलेला आहे. वेब कलाकृतींसोबत सोबत इंटरनेट वर प्रसिद्ध असलेलं कलामाध्यम म्हणजे शॉर्ट फिल्म. त्याने एका शॉर्ट फिल्मची निर्मितीही केली आहे. या शॉर्ट फिल्म मध्ये त्याने स्वमग्न असणाऱ्या एका मुलाची कथा सांगण्याचा प्रयत्न केला होता. अंतरंग असं त्या शॉर्ट फिल्मचं नाव.

कलाक्षेत्रात आपली कारकीर्द घडवायची हे ठरवून त्यात झोकून देऊन काम करणारा हा कलाकार. तो आपल्याला अनेक कलाकृतींतून भेटला आणि त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून त्याने प्रेक्षकांना आनंद दिला. सोबत तो स्वतःही प्रगल्भ झाला आहे आणि होतो आहे. असा हा गुणी कलाकार सध्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत व्यस्त आहे. कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर ओंकार या त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव येणं ही त्याच्या अभिनयाला मिळालेली पावतीच. येत्या काळात शाल्व आणि येऊ कशी तशी मी नांदायला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचू देत हीच सदिच्छा. तसेच शाल्व यांस त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *