महाराष्ट्राचा सुपरस्टार हा कार्यक्रम आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल. त्या कार्यक्रमाने आपल्याला निलेश साबळे, संकर्षण कऱ्हाडे, नम्रता संभेराव यांसारखे आजच्या काळातले आघाडीचे कलाकार दिले. यात अजून एका नावाने आपल्या मनात एवढ्या वर्षात घर केलं आहे. ते म्हणजे रेश्मा शिंदे. आज त्यांच्याविषयी थोडसं.
रेश्मा यांची एक मालिका सध्या तुफान चालते आहे. ती म्हणजे रंग माझा वेगळा. आपल्या समाजात सावळ्या मुलं आणि मुलींची त्यांच्या दिसण्यावरून मस्करी, टिंगल केली जाते. काही वेळा अपमानसुद्धा. अशा या सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारी मालिका. रेश्मा यांनी या मालिकेत ‘दीपा’ नावाच्या मुलीची मध्यवर्ती भूमिका उत्तमरीतीने बजावली आहे. पण हि काही त्यांची पहिलीच मालिका नाही. तुम्हाला नुकतीच प्रसिद्ध झालेली हिंदी सिरीयल आठवते का? ‘केसरी नंदन’. त्यातही महत्वाची भूमिका रेश्मा यांनी बजावली आहे.
मुळच्या मुंबईच्या रेश्मा याचं बालपण, शिक्षण मुंबईत झालं. त्यांना अभिनय क्षेत्राची गोडी निर्माण झाली. केवळ आवड म्हणून अभिनय करण्याऐवजी त्यांनी या क्षेत्रात काम करायचं ठरवलं. त्यांनी ‘महाराष्टाचा सुपरस्टार’ ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. स्पर्धा संपली. कौतुक झालं. पण म्हणून काम करत राहिलं पाहिजे हे रेश्मा यांनी ठरवलं.
महाराष्ट्राचा सुपरस्टारनंतर त्यांनी ‘बंध रेशमाचे’ या मालिकेत काम केले. पदार्पणातच आपल्या अभिनयाची चुणूक त्यांनी या मालिकेतून दाखवून दिली. पुढे ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेतून त्या पुन्हा झी मराठीवर आल्या. कौतुकही झालं. पण प्रत्येक कलाकाराला एखादी अशी कलाकृती मिळते ज्याने तो आयुष्यभर ओळखला जातो. रेश्मा यांनी सुद्धा अशाच एका मालिकेत काम केलं. त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव पूर्वा. आठवलं न थोडसं. हो. ‘लगोरी रिटर्न्स’ हि ती मालिका. आजही प्रेक्षकांच्या मनात या मालिकेच्या आठवणी ताज्या आहेत. याच दरम्यान त्यांची ओळख झाली ती अभिज्ञा भावे यांच्याशी. आजही हि मैत्री उत्तम रीतीने टिकून आहे. अभिज्ञा आणि तेजस्विनी पंडित यांच्या तेजाज्ञा या ब्रँन्ड साठी त्यांनी फोटो शुटही केलं आहे.
आपल्या करियर मध्ये सतत कामात बिझी असणाऱ्या रेश्मा यांनी आपली लग्नगाठ अभिजित चौगुले यांच्यासोबत बांधली. अभिजित हे पेशाने सिविल इंजिनियर आहेत. रेश्मा यांचा खट्याळ पण तेवढाच समंजस स्वभाव त्यांच्या सोशल मिडिया पोस्ट्स मधून दिसून येतो. तसच त्यांना प्राण्यांची पण खूप आवड आहे. आपल्या मेहनती स्वभाव आणि उपजत हुशारी या गुणांमुळे रेश्मा यांनी आपल्या करियर मध्ये स्वतःच एक स्थान निर्माण केलंय. रंग माझा वेगळा या मालिकेतली दीपा हि भूमिका हि नक्कीच आव्हानात्मक आहे. सावळ्या मुलीला येणाऱ्या विविधरंगी अनुभवाचं चित्रण करायचं म्हणजे कसरतच. पण रेश्मा अन्य आव्हानांप्रमाणे हि भूमिका सुद्धा समर्थपणे पार पाडतील यात शंका नाही. त्यांच्या पूर्वा या व्यक्तीरेखेसारखी किंबहुना त्याहून अधिक अशी लोकप्रियता या भूमिकेला मिळो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा ! (Author : Vighnesh Khale)