Breaking News
Home / मराठी तडका / रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता खऱ्या आयुष्यात कशी आहे, वडील आहेत लोकप्रिय व्यक्ती

रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता खऱ्या आयुष्यात कशी आहे, वडील आहेत लोकप्रिय व्यक्ती

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील काही कलाकारांविषयी आपण मराठी गप्पाच्या माध्यमांतून वाचलं आहे. त्या लेखांना खूप मोठ्या संख्येने वाचक लाभले. आपल्या या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या मालिकेतील सौंदर्या इनामदार हि व्यक्तिरेखा जशी खलनायिकि तशीच अजून एक व्यक्तिरेखा हि या मालिकेतील नायिकेच्या म्हणजेच ‘दीपा’च्या मुळावर उठलेली दिसून येते. हि व्यक्तीरेखा आहे ‘श्वेता’ आणि ती साकार केली आहे, अनघा अतुल भगरे हिने. आज या लेखाच्या निमित्ताने तिच्या कलाप्रवासाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न. अनघा मुळची नाशिकची. लोकप्रिय ज्योतिषतज्ञ, ‘अतुल भगरे’ यांची ती मुलगी. तिचं बालपण आणि शिक्षण मुंबईत झालं. तिला फॅशन आणि मनोरंजन क्षेत्राविषयी आवड होतीच.

एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने काही प्रतिष्ठित निर्मिती संस्थांमध्ये काम केलं. त्यात कोठारे विजन, सुयोग, फिल्मफेअर या संस्थांचा समावेश होतो. या संस्थांसोबत काम करताना अनेक भूमिकांमधून तिने जबाबदारी सांभाळली. पुढे अभिनेत्री म्हणूनही ती कार्यरत झाली. ऋतुजा बागवे हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘अनन्या’ नाटकांतून तिने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. यात अनन्या या मुख्य व्यक्तिरेखेच्या मैत्रिणीची म्हणजेच, प्रियांका देशपांडे हि व्यक्तिरेखा तिने साकारली आहे. या नाटकाने अगदी अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकली होती. केवळ चार ते पाच महिन्यांत या नाटकाचे शंभर प्रयोग झालेही होते. लॉकडाऊनआधी या नाटकाने ३०० प्रयोगांचा टप्पा पार केला होता. या काळात या नाटकाची टीम कुवैत, अमेरिका येथेही प्रयोग करून आली. अनेक मानसन्मान मिळाले या नाटकाला. अनघाला हि सहाय्यक अभिनेत्री म्हणून नामांकन मिळालं होतं.

तसेच प्रसिद्ध समीक्षकांच्या कौतुकास ती पात्र ठरली आहे. नाटक चालू असताना, अनघाने एका मालिकेच्या निमित्ताने खलनायिकी भूमिका केली आहे. हि मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’ आणि ती भूमिका म्हणजे ‘श्वेता’ हि होय. या ऑक्टोबर महिन्यात या मालिकेने आपलं एक वर्ष पूर्ण केलं. अभिनयासोबतच अनघाला फॅशन क्षेत्राचीही आवड आहे. २०१८ साली तिच्या कलाक्षेत्रातील उभारत्या कारकीर्दीचा सन्मान WEE या संस्थेने केला होता. तिला या संस्थेतर्फे ‘कलारत्न’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. कलाक्षेत्राप्रमाणेच अनघा रमते ते जिममध्ये. तिला पहिल्यापासून व्यायामाची आवड. योग्य प्रमाणात आहार आणि नियमित व्यायाम हे तिच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. यांमुळे तिचं व्यक्तिमत्व सुडौल आणि आकर्षक वाटतं. यापाठी तिची कित्येक वर्षांची सातत्याने केलेली मेहनत आणि अंगी बाणवलेली शिस्त हे कारणीभूत आहेत. पण म्हणून खाण्यावर तिचं प्रेम नाही, असं नाही. तिला विविध पदार्थ बनवायला आणि खायला आवडतात. खवय्यी असलेल्या अनघाला फिरण्याचीही खूप आवड. नवनवीन ठिकाणी भटकायला तिला आवडतं.

अशी हि नवोदित पण दमदार अभिनेत्री एकेक पाउल टाकत अभिनय आणि कलाक्षेत्रात वाटचाल करते आहे. तिला अल्पावधीत मिळालेला लोकप्रतिसाद पाहता येत्या काळात ती अनेक उत्तमोत्तम कलाकृतींमधून आपल्या समोर येईल आणि नायिका, खलनायिका अशा विविध व्यक्तिरेखा साकारेल हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला खूप खूप शुभेच्छा ! आपण हा लेख वाचलात याबद्दल धन्यवाद ! आमच्या टीमने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील काही कलाकारांच्या कलाप्रवासाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ते लेख वाचले नसतील तर जरूर वाचावेत. यासाठी आपण वर उपलब्ध असलेल्या सर्च मध्ये जाऊन टाईप करा. रंग माझा वेगळा. आणि एन्टर दाबा. आपल्याला या मालिकेतील कलाकारांविषयीचे लेख वाचायला मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक होण्यासाठी धन्यवाद.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.