निखळ मैत्री ही अशी एक भावना आहे जी कोणत्याही अभिनिवेशाविना तयार होते आणि टिकवली जाते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही मित्र मैत्रिणी असतात ज्यांच्यात आणि आपल्या स्वभावात किंवा परिस्थितीत जमीन अस्मानाचं अंतर असलेलं बाह्यकरणी दिसतं. पण तरीही आपली मैत्री मात्र कितीही विरोधाभास वाटत असला तरीही टिकून राहते. कदाचित एकमेकांविषयी असलेला जिव्हाळा हा इतर बाबींच्या तुलनेने जास्त असतो म्हणून असेल. अनेक वेळा तर ही मैत्री सुरू होताना अगदी काही क्षण लागतात आणि त्या क्षणांमुळे आपल्या आयुष्यात एक जिवलग मित्र किंवा मैत्रीण जोडली जाते. अशाच एका मैत्रीचा वायरल व्हिडियो आपल्या टीमसमोर आला. आपल्या वाचकांना हा व्हिडियो बद्दल जाणून घेऊन आनंद होईल असं वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा एका रस्त्यावर काही गाड्या उभ्या असलेल्या दिसतात. पुढे काही काम चालू असावं किंवा सिग्नल असावा म्हणून या गाड्या थांबलेल्या असतात.
तेवढ्यात जवळचा एक छोटा मुलगा एका गाडीजवळ येतो. त्याला या लहान वयात परिस्थितीमुळे गाडी पुसण्याचं काम करावं लागत असतं. त्याच्या हातात एक फडकं दिसून येतं. गाडी पुसणार एवढ्यात गाडीच्या मागील बाजूची एक खिडकी उघडली जाते. त्यातून एक लहान मुलगा डोकावत असतो. दोन्ही समवयस्क मुलं पण दोघांच्या परिस्थितीतील तफावत सरळ सरळ कळून येते. पण पुढच्या काही सेकंदात जे घडतं त्यामुळे ही तफावत नाहीशी झाली की काय असं वाटू लागतं. कारण त्या गाडीतील मुलगा या दुसऱ्या मुलाला आपल्या हातातली खेळण्यातली एक छोटी गाडी काढून देतो. मग रस्त्यावर उभा असलेला हा मुलगा ही गाडी चालवून बघतो. नकळतपणे कर्तव्य भावनेतून मोकळा होत त्याने आपल्या बालसुलभ वयात प्रवेश केल्याचं जाणवत. तेवढ्यात गाडीतला मुलगा त्याला थोडीशी मोठी गाडी – खेळण्यातला जे सी बी – काढून देतो. हा मुलगा ही गाडीही चालवून बघतो. मग खऱ्या गाडीच्या खिडकीच्या कडांवर हे दोघेही गाड्या चालवतात. मग मात्र रस्त्यावरचा हा छोट्या त्याच्या हातातली जे सी बी चं खेळणं गाडीतल्या मुलाला पुन्हा देऊ करतो.
पण आतला मुलगा मात्र ते नाकारतो. हाताने दोनदा नकार देत ह्या खेळण्यातल्या गाड्या तो या मुलाला देऊन टाकतो. आपल्या मनात त्या मुलाविषयी कौतुक दाटून येतं. पण हे सगळं फुकट कसं घ्यायचं हे त्या रस्त्यावरच्या मुलाला वाटलं असावं. आम्ही असं म्हणतो कारण हा मुलगा मग कुठे तरी जातो आणि या गाडीतल्या मुलासाठी काही तरी खायला घेऊन येतो. मग दोघेही मिळून या तो खाऊ खातात. एव्हाना गाड्या पुढे जायला सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे या दोन्ही निखळ मैत्री झालेल्या दोघांची ताटातूट होते. पण तरीही ते काही क्षणही त्यांच्यासाठी आनंदाचे असतात. कारण जेव्हा गाडी पुढे सरकते तेव्हाही हे दोघेच एकमेकांना हात दाखवत टाटा करत असतात. व्हिडियो संपतो. व्हिडियो संपला तरीही त्याचा आपल्यावर होणारा आनंदी परिणाम मात्र कायम असतो. हा व्हिडियो अगदी कँडीड (म्हणजे जसा घडला तसा दाखवला) प्रकारातला आहे की मुद्दामहून बनवला आहे माहीत नाही. पण त्यातून मिळणारा आनंद आणि दिसणारी निखळ मैत्री आपल्याला जुन्या आठवणीत घेऊन जाते हे मात्र नक्की.
माणूस वयाने जस जसा मोठा होत जातो तस तसा त्याची मैत्रीची व्याख्या काहीशी बदलत जाते. पण त्याचमुळे लहान वयात जोडल्या गेलेल्या मैत्रीच्या आठवणी या निखळ आनंद देणाऱ्या असतात. आपल्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊन गेली असेल ज्या व्यक्तीसोबत आपली मैत्री अगदी चट्कन झाली असेल आणि आजही त्या आठवणी ताज्या असतील. या व्हिडियोमुळे अशाच मैत्री विषयक आठवणींना उजाळा मिळतो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला आवडला असेल. त्याचप्रमाणे आपल्याला आमच्या टीमने लिहिलेला हा लेखही आवडला असेल अशी आशा आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. तसेच आपण आपले लेख नेहमीच मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपला हा पाठिंबा येत्या काळातही आमच्या टीमच्या पाठीशी कायम राहील हे नक्की. लोभ असावा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :