मराठी गप्पाच्या टीमने अनेक वायरल व्हिडियोज वर लेखन केलेलं आहे. त्यातील अनेकांनी आपलं मनोरंजन केलं असेल तर काहींनी अंतर्मुख केलं असेल, तर काहींनी डोळ्यात पाणी आणलं असेल. यातील एक व्हिडियो आपल्याला आठवत असेल. तो एका गरीब मुलीचा वायरल व्हिडिओ होता, ज्यात ती मुलगी आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत जाणं सोडून काही भाजी वि’कून पैसे कमवत असते. तसाच काहीसा एक व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला. पण यावेळी अजून लहान मुलं या व्हिडियोतून त्यांची कैफियत अनाहूतपणे मांडताना दिसतात. या व्हिडियोत एक पोरगेलासा मुलगा आणि त्याची लहान बहीण आपल्याला लिंबू वि’कायला आलेले दिसतात. त्यांना पाहून एका गाडीतील स्त्री त्यांच्याशी बोलणं सुरू करते. ती पाहिल्यांदा तर त्यांच्या कडून लिंबू वि’कत घेते.
त्यांची परिस्थिती पाहून त्यांना अंमळ जास्त पैसे देतात. त्या स्त्रीने ज्या प्रकारे चौकशी केली हे पाहून आपल्याला वाटतं की पैसे देऊन या थांबतील की अजून काही विचारतील? आणि तेवढ्यात आपल्या मनातल्या या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास सुरुवात होते. या स्त्रीकडून या दोन्ही मुलांची चौकशी होते. यात त्यांना हे दोघेही बहीण भाऊ असल्याचं कळतं. तसेच वडील नाहीत आणि त्यांच्या आईला आर्थिक मदत म्हणून या दोघांना लिंबू वि’कावे लागतात हे ही कळतं. या परिस्थितीमुळे या दोहोंची शाळा थांबलेली आहे हे ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला वाईट वाटतं. ती स्त्री त्या मुलाला विचारते, तुला मोठेपणी कोण व्हायला आवडेल? त्यावर मला पोलीस व्हायला आवडेल हे उत्तर येतं. दरम्यान त्या स्त्रीने त्यांना नवीन मास्क दिलेले असतात. त्याचं हे उत्तर ऐकून ती स्त्री त्याला मास्क खाली घ्यायला सांगते. पोलीस होण्याचं स्वप्न का पाहतो याचं कारण विचारते. तिची या मुलांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चाळवली गेलेली उत्सुकता तिच्या प्रश्नातून जाणवते.
पण जे उत्तर मिळतं त्यानंतर मात्र आपण काही क्षण निरुत्तर होतो. त्या मुलाच्या म्हणण्यानुसार, तो आणि त्याची बहीण आधी काही बाही वि’कत असत. पण लहान असल्याने काही जणं त्यांच्या वस्तू पैसे न देता घेऊन जात असत. अर्थात लहान असल्यामुळे फारसं काही करता येत नाही, पण मोठं होऊन, पोलीस होऊन त्या लोकांना शिक्षा द्यावी अशी इच्छा हा मुलगा बोलून दाखवतो. तसेच मोठा होऊन खूप पैसे कमवावेसे वाटतात ही इच्छा ही बोलून दाखवतो. यावर जर मी तुम्हाला शिक्षण दिलं तर शिकाल का ? या प्रश्नावर हा मुलगा होकारार्थी उत्तर देतो आणि पुढे मग ही स्त्री आपल्याला व्हिडियोत दिसते. तिच्या मनोगतात आपल्या मनातील्या गोष्टी ही स्त्री बोलून दाखवते. रस्त्यावरील गरीब लोकांकडून त्यांच्यां वस्तू हिसकावून घेण्यापेक्षा त्यांना पैसे देऊन आर्थिक मदत करणं चांगलं हे तिच्या बोलण्याचं सार. आपल्या मनातील बाब ती समोर आणते आणि व्हिडियो संपतो. हा संपूर्ण व्हिडियो आणि त्यावरचं तिचं विवेचन आपल्याला विचार करायला भाग पाडतं हे नक्की. त्या लहानग्यांना मदत करणाऱ्या या माउलीला मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा !