Breaking News
Home / मराठी तडका / राजा राणीची गं जोडी मालिकेतील रणजित खऱ्या आयुष्यात क सा आहे, बघा जीवनकहाणी

राजा राणीची गं जोडी मालिकेतील रणजित खऱ्या आयुष्यात क सा आहे, बघा जीवनकहाणी

मालिका आणि त्यातील नायक नायिकेच्या जोड्या नेहमीच प्रसिद्ध होत असतात. पण त्यातही काही जोड्या विशेष लक्षात राहतात ते त्या व्यक्तिरेखांच्या विरुद्ध स्वभावांमुळे. अशीच एक मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेचं नाव आहे ‘राजा रानीची गं जोडी’. यातील आपली आवडती जोडी म्हणजे कर्तव्यदक्ष आणि थोडासा गंभीर रणजीत ढाले पाटील आणि तेवढीच चुलबुली संजीवनी. या मालिकेने नुकतेच १५० भागांचा महत्वाचा टप्पा पार केला आहे. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढते आहे आणि यातील कलाकारांची सुद्धा. यानिमित्ताने “रणजीत ढाले पाटील” हि प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मणिराज पवार याच्या कलाप्रवासाचा थोडक्यात घेतलेला आढावा.

मणिराज हा नाट्यविषयात मास्टर्स पूर्ण केलेला कलाकार. अभिनय, दिग्दर्शन करायचं तर त्याचं तंत्रशुद्ध शिक्षण हवं असं त्याचं मत. त्याचा जन्म झाला नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यात. त्याने शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयातलं शिक्षण पूर्ण करून मग नाट्यक्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पुढे पुण्यातील प्रतिष्ठित ‘ललित केंद्र’ मधून त्याने मास्टर्सचा अभ्यास पूर्ण केला. या प्रवासात त्याने स्वतः काही नाटकांच लेखन, दिग्दर्शन केलं. तसेच अभिनयही चालू होताच. या प्रवासात त्याचं आनंदाची बातमी हे नाटक गाजलं. तसेच ‘गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट’ या नाटकातही मणिराज होता. यात त्याने विवेक हि भूमिका सादर केली होती. हे नाटक नील सीमन यांच्या ‘द गुड डॉक्टर’ या इंग्रजी नाटकावर आधारित होतं. या अभ्यासाच्या काळात त्याने जसा अभिनयाचा अभ्यास केला तशीच भ्रमंतीही केली. त्यामुळे कलाकार म्हणून त्याच्याकडे चांगलाच अनुभव जमा झाला असं आपण म्हणू शकतो.

पुढे मणिराजने नाटकांसोबत जाहिराती आणि वेबसिरीज केल्या. त्यातील प्रसिद्ध म्हणजे चितळे बंधू यांची जाहिरात. हि जाहिरात म्हणजे शॉर्ट फिल्म आहे. ज्यात माणुसकी जपणाऱ्या एका एस. टी. कंडक्टर आणि एका महिलेची गोष्ट आहे. तसेच त्याने ‘अपने तो लाग गये’ या वेबसिरीजमध्ये राजकारणी व्यक्तीची भूमिका बजावली होती. या वेबसिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे यात मराठी आणि गोअन या दोन्ही भाषांचा मेळ आपल्याला पहायला मिळतो. काहीच दिवसांपूर्वी या वेबसिरीजला प्रदर्शित होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने एरवी सोशल मिडीयापासून दूर असणाऱ्या मणिराजने या वेबसिरीजचे काही अंश आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. अभिनयात अशी मजल दरमजल करत त्याने ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेपर्यंत प्रवास केला आहे. या मालिकेतील रणजीत हि भूमिका म्हणजे संयमी, कर्तव्यकठोर पण सहृदयी अशा पोलीस ऑफिसरची आहे. यामालिकेच्या प्रसारणानंतर जे जे पोलीस भेटले त्यांनी या भूमिकेचं कौतुक केलं, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अभिनयाव्यतिरिक्त त्याला गायनाची आवड आहे. तसेच त्याच्या आवडत्या बुलेटवरून त्याला फेरफटका मारायलाही आवडतो. त्याला वाचनाचीही आवड असून, व.पु. काळे हे त्याचे आवडते लेखक. अभिनेता म्हणून कारकिर्दीला अनेक जण सुरुवात करतात. पण पुढील प्रवासात फार कमी जण विविध भूमिका करून स्वतःतील अभिनेत्याला खुलवतात. त्या काही अभिनेत्यांपैकी मणिराज वाटतो. कारण त्याच्या अभिनय प्रवासात त्याने केलेल्या प्रत्येक भूमिकेत हे वेगळेपण जाणवतं. मग तो कर्तव्यदक्ष रणजीत ढाले पाटील असेल किंवा बेरकी असा विवेक. तर असा हा वैविध्य जपणारा अभिनेता लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा रणजीत ढाले पाटील बनून आपल्या भेटीस आलेला आहे. प्रेक्षकांची त्याच्या व्यक्तिरेखेस पसंती मिळते आहे. या पुढील काळातही त्याच्या विविध भूमिकांमधून तो प्रेक्षकांचं उत्तमरीतीने मनोरंजन करेल आणि त्या लोकप्रिय होतील यात शंका नाही. त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.