Breaking News
Home / मराठी तडका / रात्रीस खेळ चाले मधील सरिता खऱ्या आयुष्यात कशी आहे बघा, चित्रपटांत सुद्धा केले आहे काम

रात्रीस खेळ चाले मधील सरिता खऱ्या आयुष्यात कशी आहे बघा, चित्रपटांत सुद्धा केले आहे काम

अगदी काही दिवसांपूर्वी ‘तुझं माझं जमतंय’ या नवीन मालिकेचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आला. यातलं मुख्य पात्र म्हणेज पम्मी साकारतेय अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाला आपण ओळखतो ते रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता या भूमिकेसाठी. तिचं होणारं पुनरागमन यामुळे प्रेक्षकांच्या या मालिकेच्या काही आठवणी नक्कीच जाग्या झाल्या असणार. कारण नुकताच ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने आपला निरोप घेतला आहे. या मालिकेतलं अजून एक स्त्री पात्र खूप गाजलं आणि ते म्हणजे सरिता. शेवंता या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट. साधी आणि भोळसट पण तरीही लोकप्रिय. हि भूमिका निभावली आहे प्राजक्ता वाडये हिनं. आज तिच्याच कलाप्रवासाविषयी थोडंसं.

प्राजक्ताचा जन्म कोकणातला, कणकवलीचा. ती कोकणातच वाढली, शिकली. मालवणी हि तिची मातृभाषा. प्रत्येक कोकणी माणसाप्रमाणे तिला कलेची आवड. नृत्यात आणि अभिनयात तिला गती होती. तिची हि आवड तिच्या वडिलांना माहिती होतीच. ते स्वतः नाटक दिग्दर्शित करत असत. त्याचमुळे कलाक्षेत्रात आपल्या मुलीस आवड आहे, हे पाहून त्यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं. किंबहुना अभिनयातील तिचा पहिला प्रवेश तिच्या वडिलांमुळे झाला, अशी आठवण तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती. झालं असं होतं कि तिचे वडील एक नाटक बसवत होते आणि त्या नाटकातील एका मुलीने नाटकातून अचानक माघार घेतली. परिणामी ऐन क्षणी अभिनेत्री म्हणून कोणाला आणणार म्हणून त्यांनी लेकीला उभं केलं. प्राजक्ताने हि जबाबदारी उत्तमरीतीने निभावली आणि पहिल्याच फटक्यात सर्वोत्कृष्ठ अभिनयासाठी पारितोषिकही पटकावलं. पुढेही तिच्या वडिलांनी तिला एकांकिका आणि नाटकांतील भूमिकांसाठी प्रोत्साहनच दिलं.

पण केवळ नाटकात काम करून ती थांबली नाही. तिने यातील तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. मुंबई विद्यापीठातून नाट्य शास्त्रात पदवी संपादन केली. सोबत तिने काही मालिकांमधून काम करणं सुरु केलं होतं. पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एखादी कलाकृती येते जी त्या कलाकाराच्या करियरला कलाटणी देणारी ठरते. ‘रात्रीस खेळ चाले’ हि मालिका, प्राजक्ताच्या करियरमध्ये मैलाचा दगड ठरली. या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. या मालिकेच्या पहिल्या पर्वात तिने पोलीस ऑफिसर हि भूमिका बजावली होती. पण हि भूमिका छोटीशी होती. तर दुसऱ्या पर्वात तिने थेट ‘सरिता’ हि भूमिका बजावली. अर्थात सरिता हि भूमिका आधीच्या भूमिकेपेक्षा जास्त वेळ चालली. या मालिकेसोबतच तिने गर्ल्स हॉस्टेल या मालिकेतही काम केल आहे.

मालिकांसोबत तिने चित्रपटातही अभिनय केला आहे. तिचा ‘दिशा’ हा चित्रपट गाजला. यात तिने एका दिव्यांग व्यक्तीची भूमिका बजावली होती. याचसोबत ‘हिरकणी’ या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती. तिचा तिला खूप आनंद झालेला दिसला. कारण एरवी सोशल मिडीयापासून चार हात लांब राहणाऱ्या प्राजक्ताने खास या शुटींगचे फोटोज चाह्त्यांसोबत शेअर केले होते. व्यावसायिक चित्रपटांसोबत ‘पर्सा’ हि शॉर्ट फिल्महि तिने केली आहे. यात एका आईची भूमिका तिने बजावली होती. मनात कलेविषयी प्रचंड आवड असेल, विविध भूमिका आणि माध्यमं अनुभवण्याची तयारी असेल तर अगदी लहान गावातून येऊनही प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवता येतो. असे अभिनयाची घरची पार्श्वभूमी नसलेले पण तरीही अभ्यासू वृत्ती आणि कष्ट घेण्याची जिद्द यांच्यामुळे नावाजलेले कलाकार आज आपल्या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. प्राजक्ता हे त्यातलं आघाडीचं नाव. मध्यंतरी तिचं एक फोटोशूट गाजलं होतं.

तिची रात्रीस खेळ चाले मधील सरिता हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या एवढी पक्की डोक्यात बसली होती कि अनेकांना तिच्या या नव्या आणि मॉडर्न ढंगाच्या फोटोशूटचं अप्रूप वाटलं. पण नाविन्य हा जणू तिचा स्थायीभाव असावा. म्हणूनच साधी भोळी सरिता, कणखर पोलीस ऑफिसर, पर्सा मधील आई, दिशा मधील मध्यवर्ती भूमिका, गर्ल्स हॉस्टेलमधील देवभोळी व्यक्तिरेखा तिने अगदी सहजसोप्प्या वाटतील अशा पद्धतीने केल्या. पण इतक्या निरनिराळ्या भुमिका साकारणं सोप्प नसतं, हे खरं. पण तिची अभिनयाची आवड आणि मेहनत घेण्याची वृत्ती यांमुळे हे शक्य झालं असणार. तिच्या याच प्रयोगशिलतेमुळे येत्या काळातही ती विविध भूमिकांतून आपल्या भेटीस येईल हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

कैलास वाघमारे हेही याच पठडीतलं नाव. अभिनयाची आवड आणि त्यात करियर करण्याची इच्छा म्हणून मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी संपादन केली आणि आज यशस्वी अशा अभिनेता, लेखक, दिग्दर्शकांपैकी तो एक आहे. प्राजक्ता प्रमाणेच त्याच्याविषयीसुद्धा एक लेख आपल्या मराठी गप्पावर आहे. तो वाचला नसल्यास जरूर वाचा.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *