झी मराठी आणि सुप्रसिद्ध मालिका याचं नातं आभाळमायापासून जे सुरु झालंय ते आजतागायत अतूट आहे. या मालिकांच्या माळेमध्ये अनेक मोती येत गेले. लोकप्रिय होत गेले. काही ठराविक काळासाठी झळकले तर काही बराच वेळ चालले. तर काही मालिका वेगवेगळ्या सीजन्स मध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यातलीच नजीकच्या काळातली, एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’. कोकणातला निसर्ग जसा प्रसिद्ध तसाच कोकणाताल्या भुताखेतांच्या गोष्टी. अगदी प्रत्येक कोकणी माणसाच्या घरात तिखट मीठ लाऊन सांगितल्या गेलेल्या. आणि अशा गोष्टींची कितीही भीती वाटू दे, त्या ऐकाव्याश्या आणि पहाव्याश्या वाटतात. त्यामुळे अशा मालिका हमखास चालतात, पण त्याला कथेची आणि अभिनयाची जोड लागते. अन्यथा घाबरण्या ऐवजी प्रेक्षक अशा मालिकांना हसतात आणि सगळं फसतं.
पण याच वेळी “रात्रीस खेळ चाले” सारखी मालिका भाव खाऊन जाते. अनेक वळणं असलेल्या कथानकाने प्रेक्षकांना बांधून ठेवतं. या मालिकेतल्या पात्रांनी प्रत्येक घरात, प्रत्येकाच्या मनात घर केलं. एवढं कि “इसारलंय” या एका शब्दावर मिम्स प्रसिद्ध झाले. पहिला भाग तुफान चालल्यावर मग दुसरा भाग हि आला. आणि मग अण्णा नाईक आणि शेवंता या व्यक्तिरेखांनी धुमाकूळ घातला. काल काल पर्यंत ‘अण्णा नाईक असंय मी’ या वाक्यावरचा सोशल मिडियावरचा मिम्स आपण बघितला असणारच. पण आता मात्र रात्रीस खेळ चाले हि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय अशा वळणावर आहे. २९ ऑगस्ट ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हि मालिका आता निरोप घेण्याची शक्यता असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये दोन तट पडले आहेत. काहींना वाटतंय कि योग्य वळणावर मालिका थांबवली तर मालिका बंद होताना प्रेक्षकांना समाधान लाभतं. अन्यथा त्यात भाग अजून वाढवले तर मात्र मजा निघून जाते. तर काहींना मात्र हि मालिका अजून थोडी चालायला हवी होती असं वाटतंय.
पण मग पुढे काय ? झी मराठी एका मालिकेचे प्रक्षेपण थांबवते ती दुसरी मालिका पुढे करूनच. अशीच एक मालिका प्रदर्शनाच्या वाटेवर असणार आहे. तिचं नाव आहे ‘देवमाणूस’. नाव एवढं सात्विक पण प्रोमो बघा. मालिका थ्रिलर असणार यात शंका नाही. मालिकेच्या जाहिरातीत एक डॉक्टर पेशंटशी बोलतोय. त्यांच्यामध्ये खलबतं चालू आहेत. आणि मग तो त्या पेशंटला चेक करायला घेऊन जातो. ती विश्वासाने डोळे बंद करते आणि डॉक्टर तिच्यावर हल्ला चढवतो. विचार करा, येह तो झाकी है, अभी तो पुरी मालिका बाकी है. हि मालिका ३१ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एक मात्र खरं, कि या थ्रिलर मालिकेला स्वतःचा प्रेक्षक वर्ग असेलंच. पण “रात्रीस खेळ चाले” या मालिकेला आणि ‘अण्णा आणि शेवंता’ यांना सुद्धा नजीकच्या काळात तरी प्रेक्षक विसरणार नाहीत.