Breaking News
Home / मराठी तडका / रात्रीस खेळ चाले मालिकेतील पांडू खऱ्या आयुष्यात क’सा आहे, मालिकेत अभिनयासोबतच करतो ‘हे’ महत्वाचे काम

रात्रीस खेळ चाले मालिकेतील पांडू खऱ्या आयुष्यात क’सा आहे, मालिकेत अभिनयासोबतच करतो ‘हे’ महत्वाचे काम

मराठी मालिका म्हणजे आपल्या भावविश्वाचा एक मोठा भाग आहेत. त्यामुळे आपण अपेक्षेपलिकडे या मालिकांशी, त्यातील व्यक्तिरेखांशी आणि त्या साकार करणाऱ्या कलाकारांशी जोडले गेलेले असतो. म्हणूनच कलाकारांविषयी लिहिताना आपल्या टीमलाही मजा येते. कारण कळत नकळत आम्हीही या कलाकारांकडून शिकत असतो. आज अशाच एका कलाकाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत जो गेली काही वर्षे मालिकविश्वाचा आणि पर्यायाने आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. बरं केवळ अभिनेता म्हणून नव्हे, तर लेखक, सह दिग्दर्शक या विविध भूमिकांतून. आज आपण जाणून घेणार आहोत प्रल्हाद कुडतरकर यांच्या विषयी. होय रात्रीस खेळ चाले मध्ये लेखन आणि अभिनय ह्या दोन्ही भूमिका तेवढ्याच ताकदीने निभावणारा कलाकार.

त्यांच्या पांडू या व्यक्तिरेखेने आपल्याला आपली दुःख्ख काही काळ का होईना विसरायला लावली. त्याच्या ‘ईसारलंय’ या डायलॉग वर एवढे मिम्स बनले की काही विचारू नका. असा हा गुणी कलावंत आपल्याला गाव गाता गजाली या त्यांच्या मालिकेतूनही दिसले. मुंबईत लहानाचा मोठे झाले असले तरीही मूळचे मालवणकर असल्याने त्यांच्या कलाकृतींतून मालवणी माणसं डोकावतात. त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखा आपल्याला आनंद देऊन जातात. कारण या व्यक्तिरेखांशी आपण जोडले जातो आणि आपल्याला भेटलेल्या माणसांच्या आसपास जाणारी ही पात्र असतात. अभिनयासोबतच त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांचं लेखनही केलेलं आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ हे तर ताजं उदाहरण. या मालिकेसोबत ‘भाग्य लक्ष्मी’, ‘का रे दुरावा’, ‘तसेच १०० डेज’ या गाजलेल्या मालिकांची लेखनाची जबाबदारी प्रल्हाद यांनी उत्तमरीतीने हाताळली होती. त्यामुळे या सगळ्याच मालिका कथेच्या निकषावर लोकप्रिय ठरल्याचे दिसून येते. लेखक आणि अभिनेता म्हणून टीव्ही वर अतिशय आत्मविश्वासाने वावरणाऱ्या प्रल्हाद यांनी तेवढ्याच आत्मविश्वासाने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं सहाय्यक दिग्दर्शक हे पद भूषवलं आहे. त्यामुळे टीव्ही क्षेत्रात काम करताना त्यांनी व्यापक अनुभव कमावला आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.

अर्थात या सगळ्याची सुरुवात झाली ती शाळा आणि महाविद्यालयात असल्यापासून. खासकरून मुंबईतील एम.डी. महाविद्यालयात असताना केलेल्या एकांकिका, प्रायोगिक नाटकं यांचा अभिनेता आणि लेखक म्हणून प्रल्हाद यांची जडणघडण होण्यात महत्वाचा वाटा आहे. नाटक, टीव्ही मालिका यांतून आपली छाप पडणाऱ्या प्रल्हाद यांनी शॉर्ट फिल्म मध्येही काम केलं आहे. सेल्फी ही ती शॉर्ट फिल्म. ह्या फिल्मची दखल प्रथितयश मामी फिल्म फेस्टिवल येथेही घेण्यात आली होती. यातील मध्यवर्ती भूमिकेसाठी प्रल्हाद यांचं विशेष कौतुक झालं होतं. युट्युब वर उपलब्ध असलेल्या या शॉर्ट फिल्मला २३ लाख लोकांनी पाहिलं आहे. नाटक, मालिका लेखन, दिग्दर्शन, अभिनय असं सगळं लीलया सांभाळणारं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. लहान वयात बरंच यश, प्रसिद्धी कमावलेलं व्यक्तिमत्त्व. पण वागणुकीतून अहं जाणवत नाही. अगदी मुलाखतींतूनही नाही. तसेच सातत्याने नवनवीन कलाकृतीत गुंतून राहावं आणि नवीन प्रयोग ही करावेत, हे त्यांच्या कारकिर्दीतुन शिकता येतं. त्यामुळे नव्याने काही करू पाहणाऱ्या कलाकारांसाठी एक उत्तम उदाहरण.

सध्या प्रल्हाद हे रात्रीस खेळ चाले च्या तिसऱ्या पर्वात व्यस्त आहेत. आज पर्यंत आपण त्यांना ‘पांडू’ या व्यक्तिरेखेत जास्त पाहिलं आहे. पण यापुढे त्यांना अजून विविधांगी भूमिकांतून पाहायला मिळावं, ही इच्छा. तेही आपल्या चाहत्यांची ही इच्छा येत्या काळात पूर्ण करतील हे नक्की. प्रल्हाद यांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! आपल्याला मराठी गप्पावरील लेख आवडतात हे आपण आमचे लेख शेअर केल्यावर आणि केलेल्या क’मेंट्स वरून कळतं. याही लेखाला असंच शेअर करा. तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळू द्यात. आपल्या टीमने लिहिलेले नवनवीन लेखही वाचत राहा. धन्यवाद.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *