Breaking News
Home / मराठी तडका / रात्रीस खेळ चाले मालिकेतील सुशल्या खऱ्या आयुष्यात क’शी आहे, बघा सुशल्याची जीवनकहाणी

रात्रीस खेळ चाले मालिकेतील सुशल्या खऱ्या आयुष्यात क’शी आहे, बघा सुशल्याची जीवनकहाणी

मराठी प्रेक्षकांचं मालिका प्रेम हे सर्वश्रुत आहे. या मालिका आणि त्यातील कलाकारांशी आपण प्रेक्षक म्हणून एवढे एकरुप होऊन जातो की त्यातील कलाकार आपलेसे कधी वाटायला लागतात तेच कळत नाही. आपली टीमही यास अपवाद नाही. त्यामुळे अनेक अनुभवी तसेच अनेक उदयोन्मुख कलाकारांविषयी आपण सातत्याने लेख लिहिले आहेत. आपणही वाचक म्हणून त्यांना खूप उत्तम प्रतिसाद देत आलेले आहात. आज याच लेखांच्या मांदियाळीत अजून एका लेखाची भर पडते आहे. या लेखातून आपण आपल्या आवडत्या मालिकेत नव्याने दाखल झालेल्या आपल्या आवडत्या उदयोन्मुख अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. आपल्याला आवडणारी ही मालिका आहे रात्रीस खेळ चाले आणि यात नव्याने दाखल झालेली आपली आवडीची अभिनेत्री आहे पूर्णिमा डे.

होय, तीच पूर्णिमा जिच्या मॉडर्न लुक्स मुळे रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्या पर्वाच्या सुरुवातीपासून सुशल्या या व्यक्तिरेखेविषयी चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अर्थात पूर्णिमा काही आपल्यासाठी अगदीच नवीन नाही. याआधीही आपण तिला विविध मालिकांतून पाहिलेलं आहेच. मग ती झी युवा वरील ‘गर्ल्स हॉस्टेल’ ही मालिका असो वा झी मराठी वरीलच तुला पाहते रे ही लोकप्रिय मालिका. तिच्या या भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या, हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे तीच्या सुशल्या या व्यक्तीरेखेसाठी तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि तिनेसुद्धा दमदार अभिनेत्री म्हणून या अपेक्षा प्रत्येक एपिसोडगणिक पूर्ण केल्या आहेत. मालिकांतून स्वतःची ओळख निर्माण करणारी ही अभिनेत्री लहानपणापासूनच कलासक्त स्वभावाची आहे. अभिनय, नृत्य, गायन, चित्रकला अशा विविध कलाप्रकारातून ती वेळोवेळी स्वतःला व्यक्त करत असे. तसेच या कलांमध्ये गती असल्याने तिच्या कलासादरीकरणासाठी तिला पारितोषिकं ही मिळत असत.

काही काळापूर्वी तिने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्ट मध्ये तिने एक जुना व्हिडियो पोस्ट केला होता. त्यात अकरावीत असताना तिला पारितोषिक मिळालं होतं त्याचा हा व्हिडियो होता. शाळा आणि महाविद्यालयात असताना कलाक्षेत्राची आवड होतीच आणि तेवढीच गती अभ्यासात आणि विविध विषयांत होती. यातूनच तिने मग डॉक्टरेटचं शिक्षण पूर्ण केलं. ती एक डाएटीशीयन आहे. पण सध्या कलाक्षेत्रात पूर्ण वेळ असल्याने वैद्यकीय क्षेत्र थोडं पाठी पडलं आहे. सध्या मालिकांत व्यस्त असलेल्या पूर्णिमा हिने गायक म्हणूनही सिंगिंग स्टार या रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता. या शो मधील तिच्या गाण्यांसाठी परीक्षक आणि चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. टीव्ही क्षेत्रात असा मुक्त आणि लोकप्रिय वावर चालू असताना सिनेक्षेत्रातही तिची मुशाफिरी चालूच होती. युथट्यु’ब, उन्मत्त या सिनेमांतून तिने अभिनय केलेला आहे. यातील यु’थट्युब हा तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारा आणि सामाजिक परिस्थिती वर भाष्य करणारा सिनेमा होता, तर उन्मत्त हा थरारापट होता.

अभिनय आणि गायन यांच्यासोबतच पूर्णिमा ही उत्तम नृत्यांगना ही आहे. तिने अक्षता तिखे सोबत केलेले डान्स परफॉर्मन्स आपल्याला युट्युबवर बघता येतात. तसेच तिने विविध ब्रँड्स साठी जाहिरातीतून मॉडेलिंग आणि अभिनय केलेला आहे. या ब्रँड्स मध्ये आर.बी.आय. आणि लोकसत्ता यांसारख्या नावाजलेल्या ब्रँड्सचा समावेश होतो. अभिनय, गायन, नृत्य यांत आघाडीवर असणारी ही कलाकार उत्तम चित्रकारही आहे. तिने शाहरुख खान यांचं काढलेलं चित्र अगदी जिवंत वाटतं. या चित्रामुळे पूर्णिमाच्या कलाकार व्यक्तिमत्वाची अजून एक बाजू कळून येते. तिच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता,पूर्णिमाचं वय लहान असलं तरीही तिने स्वीकारलेल्या भूमिका, प्रोजेक्ट्स आणि साकार केलेल्या कलाकृती यांतून तिची प्रगल्भता कळून येते. तसेच नाविन्याची असलेली आवड ही लपून राहत नाही.

अशी ही प्रगल्भ, अष्टपैलू कलाकार सध्या मालिकांत व्यस्त आहे. पण येत्या काळात मालिका, सिनेमा आणि अन्य माध्यमांतुनही विविध व्यक्तिरेखा साकार करताना ती आपल्याला दिसेल हे नक्की. तिच्या सध्याच्या आणि यापुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या संपूर्ण टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !!! आपल्याला पूर्णिमा आणि तिच्या रात्रीस खेळ चाले मधील सहकलाकारांविषयी लिहिलेले लेख आवडले असतीलच ना. तेव्हा हा आणि अन्य लेखही शेअर करायला विसरू नका. तसेच आपली टीम विविध वायरल व्हिडियोज बद्दल ही लेख लिहीत असतेच. ते ही वाचा आणि नक्की शेअर करा. मराठी गप्पांच्या या टीमला तुमचा वाचक म्हणून जो सातत्यपूर्ण पाठिंबा मिळतो आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *