Breaking News
Home / मराठी तडका / राधिकाचा खऱ्या आयुष्यातला पती आहे अभिनेता, बघा तिची जीवनकहाणी

राधिकाचा खऱ्या आयुष्यातला पती आहे अभिनेता, बघा तिची जीवनकहाणी

मालिकाविश्वातील कथांमध्ये कोणते बदल होतील आणि त्याने प्रेक्षकांना कसे सुखद किंवा आश्चर्यकारक धक्के बसतील हे काही सांगू शकत नाही. त्यात माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा हातखंडा आहे, असं म्हणू शकतो. पण याच काही वेळेस अपेक्षित, तर काही वेळेस अनपेक्षित धक्क्यांमुळे या मालिकेने चार वर्षांची दीर्घ वाटचाल केली आहे. या वाटचालीत गुरुनाथ, शनाया आणि राधिका या तीन व्यक्तिरेखा अगदी सुरुवातीपासून प्रेक्षकांच्यासोबत राहिल्या आहेत. यातील गुरुनाथ आणि शनाया या व्यक्तिरेखा साकारणारे अनुक्रमे अभिजित खांडकेकर आणि रसिका सुनील यांच्या विषयीचे लेख मराठी गप्पावर आपण वाचले आहेतच. त्या लेखांना मिळालेल्या वाचकांच्या प्रतिसादाबद्दल, आमच्या टीमकडून मराठी गप्पाच्या वाचकांचे मनापासून धन्यवाद. आज याच साखळीतील, तिसरी आणि किंबहुना सगळ्यात लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजे राधिका साकारणाऱ्या अनिता दाते यांच्या अभिनय प्रवासाबाबत आपण जाणून घेणार आहोत.

अनिता या मुळच्या नाशिकच्या. त्यांचं शालेय शिक्षण झालं ते नाशिकमध्येच. त्यांना लहानपणापासून अभिनयाविषयी आवड. हीच आवड जोपासत त्यांनी पुण्याच्या ललित कला केंद्रामधून मास्टर्सची पदवी मिळवली. ललित कला केंद्रात असताना नाटकांशी संबंध आलाच होता, तो पुढेही सुरु राहिला आणि महासागर, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या यांसारख्या नाटकांतून त्यांनी अभिनय केला. झी नाट्य गौरवच्या मंचावरही त्यांनी सखाराम बाईंडर या लोकप्रिय नाटकाचा काही भाग अभिनित करून दाखवला होता. यात त्यांना सोनाली कुलकर्णी यांची साथ लाभली होती. नाटकातून काम सुरु असताना, त्यांची मालिका आणि चित्रपट क्षेत्रातही मुशाफिरी सुरु झाली होती. ‘सनई चौघडे’ हा त्यांचा पहिला चित्रपट. या हलक्या फुलक्या चित्रपटानंतर त्यांनी कॉफी आणि बरंच काही, अ पेइंग घोस्ट असे हलके फुलके आणि विनोदी चित्रपट केलेच. सोबत आजोबा, तुम्बाड सारखे गंभीर चित्रपटही केले आहेत. यांमुळे अभिनेत्री म्हणून त्या किती विविध भूमिका बजावू शकतात हे कळतं. तसेच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘अय्या’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. यात राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका होती आणि अनिता यांनी त्यांच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. पण या भूमिकेसाठी त्यांचा असा काही कायापालट केला गेला होता, कि त्यांना सहजासहजी ओळखता येणं अशक्य होतं.

नाटक, चित्रपट यांच्यासोबतच त्यांनी दर्जेदार मालिकांमध्ये काम केलं आहे. अग्निहोत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, अनामिका या त्यांच्या गाजलेल्या मालिका. यातील एका लग्नाची तिसरी गोष्ट मध्ये त्यांनी स्पृहा जोशी यांच्या मैत्रिणीची व्यक्तिरेखा निभावली होती. या मालिकांतील, त्यांची नजीकच्या काळातली मालिका म्हणजे, ‘माझ्या नवऱ्याची बायको’. या मालिकेसाठी त्यांची निवड झाली होती पण कोणती व्यक्तिरेखा साकारायला मिळणार हे त्यांना माहिती नव्हती. पुढे राधिका हि व्यक्तिरेखा आहे हे कळल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तिरेखेवर मेहनत घ्यायला सुरुवात केली. खासकरून व्यक्तिरेखेचा नागपुरी लहेजा त्यांनी अगदी मेहनतीने शिकून घेतला. यात त्यांच्या मालिकेतील लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांनीही त्यांना मदत केली. भारत गणेशपुरे यांचीही मदत त्यांना झाली होती. याच त्यांच्या मेहनतीच्या फळाची परिणीती म्हणजे या भूमिकेसाठी त्यांची प्रेक्षकांनी केलेली प्रशंसा आणि झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात मिळालेले तीन पुरस्कार. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात काही भूमिका येतात ज्या त्यांना घराघरात घेऊन जातात. अनिता यांच्यासाठी ‘राधिका’ हि ती व्यक्तिरेखा आहे हे नक्की. त्यांच्या टी.वी.च्या छोट्या पडद्यावरील वावरात त्यांनी जशा मालिकांतून भूमिका केल्या तशाच फु बाई फु या रियालिटी शोमधून विनोदी स्कीट्सहि केले आहेत.

 

नाटक, मालिका, चित्रपट यांच्यासोबत त्यांनी जाहिरातीतही काम केलं आहे. नुकतीच एक जाहिरात फार चर्चीली गेली होती. वोडाफोन आणि आईडिया यांच्या या संयुक्त जाहिरातीत, त्यांचा सहभाग होता. तसेच अमॅझॉन, कॅडबरी या नावाजलेल्या ब्रँड्सच्या जाहिरातीतही त्यांनी अभिनय केला आहे. तसेच त्या उत्तम सूत्रसंचालकही आहेत. अभिनयाव्यतिरिक्त त्यांना फिरण्याची आवड आहे. तसेच फिरताना त्या त्या जागी मिळणारे उत्तम पदार्थ खाण्याचीहि त्यांना आवड आहे. या सर्वांबरोबर त्यांनी आपली सामाजिक बांधिलकीही जपली आहे. पाणी फौंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी नाशिक येथे दोन वर्षे श्रमदान केले होते. त्यांचा विवाह चिन्मय केळकर यांच्याशी झालेला असून, चिन्मय हे हि मनोरंजन क्षेत्राशी अभिनेते, दिग्दर्शक म्हणून जोडले गेलेले आहेत. ललित कला केंद्रामध्ये शिकत असतानाच अनिताची चिन्मयसोबत भेट झाली. परंतु एकाच केंद्रात असून सुद्धा त्यांचं काही जुळलं नव्हतं. ‘सिगारेट’ नाटकाच्या तालमीनंतर दोघेही एकमेकांना मिस करू लागले होते. त्यानंतर दोघांचे जुळून आले.

 

या लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी एकत्र येऊन एका कथासंग्रहातील काही भागाचं वाचन केलं होतं. तसेच स्पृहा जोशी यांच्या युट्युब चॅनेलवरही अनिता यांनी, त्यांच्या आवडत्या कथा-कवितांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. येत्या काळात त्यांची भूमिका असलेला, ‘मी वसंतराव’ हा चित्रपट येणार आहे. यात, वसंतराव देशपांडे यांच्या आईची महत्वपूर्ण भूमिका त्यांच्या वाट्यास आली आहे. त्यांच्या इतर भूमिकांप्रमाणेच याही भूमिकेस त्या तेवढ्याच ताकदीने जिवंत करतील यात शंका नाही. त्यांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट, रियालिटी शो, जाहिरातींच्या माध्यमातून आपली कारकीर्द घडवली आहे. येत्या काळातही त्या अशाच प्रकारे अनेक उत्तमोत्तम व्यक्तिरेखा घेऊन आपल्या भेटीस येतील हे नक्की. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *