रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक बिगबजेट चित्रपटात काम केले आहे. २००३ साली ‘तुझे मेरी कसम’ ह्या चित्रपटापासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या रितेशने ‘मस्ती’, ‘क्या कुल है हम’, ‘ग्रँड मस्ती’, ‘मालामाल विकली’, ‘धमाल’, ‘एक व्हिलन’, ‘हाउसफुल’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले. केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर त्याने मराठी चित्रपटांतसुद्धा काम करून मराठी प्रेक्षकांनाही खुश केले आहे. २०१४ साली त्याने ‘लय भारी’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. रितेशने रोमँटिक हिरोपासून ते विनोदी कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच बरोबर त्याने ‘एक व्हिलन’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून चाहत्यांचे मन जिंकले. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रितेशकडे संपत्ती सुद्धा खूप आहे. त्याच बरोबर तो एका चित्रपटासाठी चांगलेच मानधन घेतो. चित्रपटाव्यतिरिक्त अजून कुठून होते कमाई बघूया. चला तर पाहूया किती आहे रितेशचे एका चित्रपटाचे मानधन.
गेल्या वर्षी १९ डिसेंबर २०१९ ला ‘नेट वर्थीअर’ ह्या वेबसाईटने रितेशच्या संपत्ती बद्दल माहिती दिली. ह्या वेबसाईटने दिलेल्या माहिती नुसार रितेशची एकूण संपत्ती १६ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ११४ कोटी रुपये इतकी आहे. बॉलिवूड चित्रपटात रितेशच्या अभिनयाचे वजन देखील दमदार आहे. तो एका चित्रपटासाठी जवळजवळ ४ ते ५ कोटी रुपये इतके मानधन घेतो. अभिनया व्यतिरिक्त त्याचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ हे त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव असून त्याने ह्या बॅनरखाली पत्नी जेनेलियासोबत तीन हिट चित्रपटांची निर्मिती केली. त्यात ‘लय भारी’, ‘माउली’ ह्यासारखे सुपरहिट चित्रपट सामील आहेत. जाहिरातीतून देखील त्याची चांगली कमाई होते. तो हेअर प्रॉडक्ट्स आणि इतर टेलिकॉम जाहिरातीतून चांगली कमाई करतो.
अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त त्याने ‘आर्किटेक्चरल’ आणि ‘इंटेरिअर डिझाइनिंग’मध्येही खूप गुंतवणूक केलेली आहे. त्याने मुंबईतील जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधून आर्किटेक्चरची डिग्री घेतली असल्या कारणाने त्याला ह्या पदवीचा गुंतवणूक करताना चांगलाच उपयोग होतो. दोन वर्षाअगोदर, रितेश देशमुखने भाऊ धीरज देशमुखसोबत त्याची स्वतःची ‘वीर मराठी’ हि क्रिकेट टीम लाँच केली होती. त्याचबरोबर त्याला गाड्यांची सुद्धा खास आवड आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीच्या आलिशान गाड्या असून त्या सर्व गाड्यांची नंबर प्लेट १ आहे. त्यापैकी सर्वात महागडी गाडी बेन्टली कॉंटिनेंटल असून त्याची किंमत २.५ कोटी रुपये इतकी आहे. त्याने २०१७ मध्ये पत्नी जेनेलियाला ५५ लाखांची गाडी भेट दिली होती. ह्याच सोबत त्याच्या मुंबईमध्ये अनेक प्रॉपर्टीज सुद्धा आहेत.