महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हि जोडी एखाद्या सिनेमात एकत्र आली कि उत्तम सिनेमा असणार हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात नेहमीच पक्कं होतं. त्याला कारणीभूत होती ती महेशजी आणि लक्ष्मीकांतजी यांच्या मधील जबरदस्त केमिस्ट्री. अनेक वेळेस लक्ष्मीकांतजींच्या आठवणींना उजाळा देताना, आजही महेशजी असं म्हणतात कि लक्ष्मीकांतजी त्यांच्या सिनेमात जे काम करत ते काही औरच असे. या केमिस्ट्रीची तुलना करताना ते हॉलीवूड मधील सुप्रसिद्ध डीन मार्टिन आणि जेरी लुईस यांचा दाखला देत असतं. हि केमिस्ट्री ऑनस्क्रीन जशी होती तशीच ती खऱ्या आयुष्यातही होती. त्याचमुळे एका बड्या निर्मिती संस्थेचा हिंदी सिनेमा लक्ष्मीकांत जी करत होते. तारखा ठरल्या होत्या. पण ९० चा काळ. महेशजी शुटींग करत असताना अचानक लाईट्स गेल्या. सोबत जनरेटरची वगैरे काही सोय नाही, काय करावं कळेना. लक्ष्मीकांतजींना दुसऱ्या शुटींगला जाऊ देण्याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून महेशजींची होती. ते चिंतेत होते. पण तेव्हा लक्ष्मीकांतजी पुढे आले आणि म्हणाले कि काही झालं तरी आजच्या दिवसाचं शुटींग झाल्याखेरीज हिंदी सिनेमाच्या शुटींगला जाणार नाही. महेशजींना हायसं वाटलं. हे आणि असे अनेक किस्से त्यांच्या अनेक सिनेमांच्या निमित्ताने घडले.
पण त्यांचा दोघांच्या पहिल्या भेटीचा आणि पहिल्याच चित्रपटाचा किस्सा नक्की ऐकण्यासारखा आहे. महेशजींचे आई वडील हे रंगभूमीशी निगडीत होते. त्यांनी आत्माराम भेंडे, बबन प्रभू आणि इतर अनेक उत्तमोत्तम कलाकारांसोबत कामे केली होती. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्याकाळी गाजलेलं नाटक याच जेष्ठ मंडळींचं. या नाटकाला खूप लोकप्रियता मिळाली. पण, बबन प्रभू याचं देहावसान झालं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘झोपी गेलेला जागा झाला’ चे प्रयोग पुन्हा करावेत असं ठरलं. बाकीचा कलाकार संच तसाच ठेवला गेला आणि बबन प्रभूंच्या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली ती लक्ष्मीकांत बेर्डे यांची. या नाटकाच्या निमित्ताने महेशजींनी लक्ष्मीकांत जी यांच्या अभिनयाची झलक पहायला मिळाली. त्यावेळी महेशजींना लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा अभिनय इतका आवडला कि त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर एक रुपया ठेवत सांगितले कि, जेव्हा कधी मी माझा पहिला चित्रपट दिग्दर्शित करेल तेव्हा त्या सिनेमात मुख्य भूमिकेत तुला घेईल.
लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांनी सुद्धा हसत हसत एक रुपया स्वीकारत महेशजींची हि ऑ फर मान्य केली. महेशजींनी एका रुपयात लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना करारबद्द करून घेतले. परंतु तो चित्रपट कोणता होता हे तुम्हांला माहिती आहे का ? चला तर जाणून घेऊया. त्या वेळेस महेशजी हिंदीतील ‘प्यार किये जा’ हा चित्रपट मराठीत करण्याच्या विचारात होते. त्यांना सगळ्यात जास्त भावलेला हा सिनेमा. हा सिनेमा मूळ दक्षिणेतून हिंदीत आला एवढा तो लोकप्रिय ठरला होता. तर असा गाजलेला सिनेमा मराठीत करताना, त्यातील हिंदी व्यक्तिरेखा कोण कोण करणार हे त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होतं. किशोर कुमार यांच्या भूमिकेसाठी अशोकजी सराफ, शशी कपूर यांच्या भूमिकेसाठी ते स्वतः आणि इतर कलाकार. पण या गोष्टीतील तीन मित्र असलेल्यांपैकी मेहमूद यांची भूमिका करण्यासाठी त्यांना कोणीही कलाकार मिळत नव्हता. पण ‘झोपी गेलेला…’ च्या प्रयोगाने हि चिंता मिटवली.
लक्ष्मीकांत यांना हि भूमिका द्यायची असं ठरलं. हातची संधी जाऊ देतील ते महेश कोठारे कसले. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्याशी चित्रपटासंबंधी चर्चा केली. लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना ह्या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि त्यांना दिलेला रोल खूप आवडला. केवळ एका रुपयात लक्ष्मीकांतजींना करारबद्ध केलेला तो सिनेमा म्हणजे धुमधडाका. महेशजींचा दिग्दर्शक म्हणून आलेला पहिला आणि पुढे लोकप्रियतेचा कळस गाठलेला हा सिनेमा. या सिनेमाने जसा इतिहास घडवला, प्रेक्षकांची वाहवा मिळवली तशीच एक अफलातून जोडी प्रेक्षकांना मिळवून दिली. महेशजी आणि लक्ष्मीकांतजी यांनी या सिनेमानंतर अनेक वेळा एकत्र काम केलं, त्यानिमित्ताने अनेक किस्से घडत गेले आणि सोबतीला घडत राहिला तो मराठी सिनेमाचा इतिहास. जो या जोडीने आपल्या कलागुणांनी समृद्ध केला. तो इतका समृद्ध आहे कि आजही त्यांच्या कलाकृती तेवढ्याच ताजातवान्या वाटतात. मराठी कलाजगताला लाभलेल्या या दोन्ही जीवश्च कंठश्च मित्रांना त्यांच्या या योगदानासाठी टीम मराठी गप्पा कडून मानाचा मुजरा !
(Author : Vighnesh Khale)