आपण मालिका पाहतो केवळ अर्धा तास. पण त्यातही अनेक मालिका आणि कलाकार आपल्याला आवडायला लागतात. त्यामुळे जेव्हा या मालिकांतील कलाकारांच्या बाबतीत एखादी बातमी येते तेव्हा प्रेक्षक आणि त्या मालिकेतील सहकलाकार यांच्या कडून प्रतिक्रिया या येत असतात. असंच काहीसं झालंय ते लागिरं झालं जी मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांच्या बाबतीत. लागिरं झालं जी या मालिकेतील एक महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रीचं नुकतंच निधन झालंय. त्यांचं नाव कमल ठोके होय. या सुप्रसिद्ध मालिकेत त्यांनी अजिंक्यची आजी म्हणजे जीजी ही भूमिका लोकप्रिय केली होती. कमलजींनी वयाची सत्तरी पार केल्यानंतर लागिरं झालं जी या मालिकेतून काम करण्यास सुरुवात केली. त्याआधी त्यांनी काही कालाकृतींमध्ये कामे केली होती. पण या मालिकेने त्यांना महाराष्ट्राच्या घराघरात नेऊन ठेवलं. अजिंक्यच्या आजी म्हणजे जीजी म्हणून त्यांना अनेकांकडून प्रेम आणि प्रशंसा मिळाली. अजिंक्य हे पात्र भारतीय लष्करातील जवान असल्याचे दाखवल्याने खऱ्या आयुष्यातील अनेक जवानही त्यांच्या संपर्कात येत असत आणि त्यांच्या भूमिकेचं जवानांना कौतुक असे, असं कमलजी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
पण ही भूमिका करण्यापूर्वीही त्यांनी कलाक्षेत्रात गायन क्षेत्रात मुशाफिरी केली होती. त्या उत्तम गात असतं. पण कौतुकाचा भाग असा की त्यासाठी त्यांनी कधीही कोणाकडून गाण्याचे प्रशिक्षण घेतले नव्हते. पण तरीही त्यांचे गाणे कधी चुकत नसे आणि याचा त्यांना सार्थ अभिमान होता. त्यांचे पती यांनाही संगीत क्षेत्रात रस. त्यामुळे या दोघांनी एकत्र खुप काम केलं. पण कलाक्षेत्रात काम करत असताना त्यांनी स्वतःची शिक्षिका म्हणून कारकीर्द घडवली. त्यांच्या आयुष्यातील एक मोठे पर्व या शिक्षण क्षेत्राने व्यापलेले होते. एकेकाळी त्यांना स्वतःला शिक्षण घेण्यासाठी घरच्यांशी काही प्रमाणात संघर्ष करावा लागला होता. पण पतीचा पाठिंबा आणि जिद्दी स्वभाव यांच्या जोरावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. एक वेळ तर अशी होती की त्यांनी रात्रशाळेत जाऊन शिक्षण घेतले. पुढे शिक्षण क्षेत्रात स्वतः दाखल झाल्यावर त्यांनी विद्यार्थोपयोगी अनेक उपक्रम राबवले. या उपक्रमांचा उद्देश मुलांमध्ये शिस्त बाणवणे, अभ्यास आणि इतर शालेय उपक्रमांत गती असावी हा असे. त्या निवृत्त झाल्या तेव्हा त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. संगीत, शिक्षण या क्षेत्रांमध्ये भरीव असे काम केल्यावर त्यांनी अभिनयाकडे लक्ष केंद्रित केलं आणि लागिरं झालं जी मालिकेतील जीजी ही व्यक्तिरेखा त्यांनी लोकप्रिय केली. तसेच मालिकेच्या कलाकारांसोबत त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते.
आज त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर या मालिकेतील कलाकारांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या मालिकेचे लेखक असलेले तेजपाल वाघ यांनी कमलजींचा एक फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तेजपाल यांनी स्थापन केलेल्या वाघोबा प्रॉडक्शनतर्फेही कमलजींना श्रद्धांजली देण्यात आली. लागिरं झालं जी मालिकेचा नायक म्हणजे अजिंक्य याची भूमिका केलेल्या भगवान नितीश याने त्यांच्या सोबतचा मालिकेतील एक प्रसंग दाखवणारा व्हिडीओ अपलोड केला. तसेच त्यांना कमलजींसोबत अजून काम करण्याची इच्छा अपुरी राहिल्याची खंत बोलून दाखवली. या मालिकेतील नायिकेचं काम करणाऱ्या शिवानी बावकर हिनेही त्यांना आपल्या सोशल मीडिया पेजच्या माध्यमांतून ‘जिजे तुझी प्रत्येक वळणावर आठवण येत राहील गं’ असं म्हणत श्रद्धांजली अर्पण केली. तर या मालिकेतील आणि सध्या चालु असलेल्या देव माणूस या मालिकेतील खलनायकी भूमिका करणारे किरण गायकवाड यांच्याही भावना अशाच काहीशा होत्या. त्यांनी कमलजींच्या सोबत केलेला एका जुन्या गाण्यावरचा व्हिडियो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आशा या प्रेमळ जीजी म्हणजे कमलताई ठोके यांना टीम मराठी गप्पाची भावपूर्ण श्रद्धांजली.
– Vighnesh Khale