Breaking News
Home / मनोरंजन / लग्नमंडपात काकूंनी केला कोळी गाण्यावर अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्नमंडपात काकूंनी केला कोळी गाण्यावर अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

बदलत्या काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल घडत असतो. लग्नसमारंभ ही त्यास काही अपवाद नाहीत. काही दशकांपूर्वी होणारे विवाह आणि आजकाल होणारे विवाह पाहता आपल्याला यातील फरक कळून येईल. आजकाल नवरा नवरी हे ज्या मोकळेपणाने आपल्या लग्नात मस्त धमाल डान्स करतात, मजा घेतात त्या सोहळ्याची, हे आधी होत नसे. तीच बाब नवरा नवरीच्या आई वडिलांची. आधीच्या लग्नांमध्ये पालक विवाहाच्या ओझ्याखाली दडपून गेलेले दिसत. पण आताच्या काळात दडपण असलं तरीही आपल्या मुलांच्या लग्नात धमाल मस्ती करण्याकडे ही त्यांचा कल दिसतो. याचीच साक्ष देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने नुकताच पाहिला. त्यातील काकूंनी केलेला धमाल डान्स आणि या डान्सची कोरिओग्राफी बघून फार आनंद होतो. म्हंटलं आपल्या वाचकांसाठीही यावर लेख लिहुया आणि म्हणून आजचा हा लेखप्रपंच.

हा व्हिडियो तसा तीन वर्षांपूर्वीचा आहे. पण यात डान्स करणाऱ्या काकूंनी दाखवलेला उत्साह आजही आपल्याला प्रसन्न करणारा असतो. डान्स करणारा आनंद घेत, मजा करत डान्स करत असेल तर हा डान्स बघणारे आपोआप या डान्सची मजा घ्यायला सुरुवात करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे या काकू. व्हिडियो सुरू होतो तेव्हा पारंपारिक आणि सदाबहार असलेलं असं कोळिगीत सुरू असतं. ‘या गो दांड्यावर’ हे ते लोकप्रिय गीत. त्यावर ठुमकत ठुमकत या काकू आणि त्यांच्यासोबत बाकीची मंडळी मंडपात पुढे पुढे येत असतात. या सगळ्यांकडे बाकीच्या मंडळींचं लक्ष लागलेलं असतं आणि मग सुरू होते मजा. गाण्याचं पहिलं कडवं सुरू होतं. ‘त्याच्या करवल्या गो नाजूक साजूक’ या कडव्यावर दोन मुली पुढे येतात. मस्त डान्स स्टेप करत त्या या काकूंच्या पलीकडे निघून जातात. एव्हाना जीचं लग्न आहे त्या ताईचं आपल्याला फोटोजच्या माध्यमातून दर्शन झालेलं असतं. तेवढ्यात या कडव्याचा पुढचा भाग सुरू होतो – ‘त्या नेसल्या पैठणी साड्या’. या भागावर नृत्य करण्यासाठी दोन ताई एव्हाना पुढे आलेल्या असतात.

मग ताई आणि काकू अशा तिघीजणी मिळून या कडव्यावर डान्स करतात. ते ही आपल्या पैठण्या मिरवत. धमाल येते. त्याच कडव्याचा पुढचा भाग म्हणजे ‘डोईमंधी सायलीच्या गो येण्या’. यासाठी मुलींचं एक त्रिकुट पुढे येतं. त्यांनी माळलेल्या वेण्या दाखवत त्यांनी केलेली स्टेप खरंच आवडून जाते. या स्टेप ज्यांनी बसवल्या (बहुधा या काकूंनीच बसवल्या असाव्यात) त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण मजा अजून संपलेली नसते, कारण अजून पुढची कडवी बाकी असतात. मग येतात दोन नवीन त्रिकुट. यातील लहान मुली मग ‘वाजत पैंजण छुमछुम’ आणि मोठ्या मुली ‘आल्या ठुमकत ठुमकत’ या कडव्यांवर डान्स करतात. एव्हाना सगळ्या मुली आणि स्त्रीवर्गाचं वर्चस्व या डान्स मध्ये दिसून येतं. अर्थात कडवी तशी असल्याने. पण पुढच्या कडव्यात मग लहान मुलं आणि पुरुष ही या गंमती जंमतीत सामील होताना दिसतात. सुरुवात होते ती वर्हाडी फेटेवाले या कडव्याने. यात दोन लहानगे डोक्यावर फेटे असल्याचा अभिनय करत करत पुढे येतात. मग पुढे येणाऱ्या जोडीच्या येण्याने एकच हशा पिकतो. कारण यात यजमान चष्मेवाले असे शब्द आहेत आणि त्याला सुसंगत अशीच ही जोडी असते. कोरिओग्राफरने दाखवलेली ही कल्पकता वाखाणण्याजोगी.

मग पुढे येतात ते ‘भाऊबंद घोडेवाले’ या कडव्यावर डान्स करणारे दोघे दादा. दोघेही आपल्या भूमिकेत अगदी घुसून काल्पनिक घोड्यांचे लगाम खेचत असतात. तबडक तबडक करत ही जोडी पुढे जाते तोपर्यंत मग बाकीची मंडळी येतात. एव्हाना गाण्याचे शेवटचे बोल ऐकायला येतात, ते असतात ‘आणि उडविले दारुगोळे’. यावर आजूबाजूला पताका उडवल्या जातात. तसेच वातावरण निर्मिती तर अशी झालेली असते की काही विचारू नका. त्यामुळे व्हिडियो संपतो खरा पण मनात एक गोड आठवण तयार करून जातो. अशी आठ्वण जी पुन्हा पुन्हा पहावी आणि अनुभवावी. आपण हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहतो. एकंदर सगळा परफॉर्मन्स उत्तम जमून आलेला असल्याने यातील मजा आजही कायम आहे. तसेच कितीही वेळेस हा व्हिडियो पाहिल्यास ही कंटाळा येत नाही. अर्थात यातील काकूंना यासाठी दाद द्यायला पाहिजे. कारण त्यांनी स्वतःच्या परफॉर्मन्सची मजा घेतली नसती तर तर बाकीच्यांना ही प्रोत्साहन मिळालं नसतं. त्यामुळे त्यांचं कौतुक. तसेच बाकीच्यांनी ही त्यांना जी उत्तम साथ दिली त्याबद्दल त्यांचंही कौतुक.

आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्यालाही आवडला असेलच. तसेच यावर आधारित आपला हा लेखही आपल्याला आवडला असेल, अशी अपेक्षा आहे. आपण नेहमीच आपल्या मराठी गप्पाच्या टीमने लिहिलेले लेख शेअर करता. आपल्या टीमचं कौतुक करता. त्यामुळे आपल्या टीमला प्रोत्साहन मिळतं. यापुढेही आपल्या टीमला आपण असंच प्रोत्साहन देत राहाल हे नक्की. तसेच हा लेख ही शेअर करालच. आपल्या पाठींब्यासाठी मनःपूर्वक आभार. लोभ असावा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.