Breaking News
Home / मराठी तडका / ललित इनामदार ह्यांच्या पत्नी आहेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री, बघा जीवनकहाणी

ललित इनामदार ह्यांच्या पत्नी आहेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री, बघा जीवनकहाणी

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेची चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार सुरु आहे. यातील नायक नायिका यांच्याप्रमाणेच यातील सौंदर्या, लावण्या, ललित इनामदार या व्यक्तिरेखाही गाजत आहेत. यातील ललित इनामदार म्हणजे श्रीरंग देशमुख. हर्षदा खानविलकर यांच्या सौंदर्या या व्यक्तिरेखेला तोडीस तोड अशी व्यक्तीरेखा त्यांनी उत्तमरीतीने वठवली आहे. या जोडीने या आधी ‘पुढचं पाउल’ मालिकेतही काम केलं होतं. श्रीरंग हे नाटक, मालिका, सिनेमे, जाहिराती अशा विविध माध्यमांतून काम केलेलं बहुआयामी कलाकार आहेत. उत्तम अभिनेते असण्याबरोबरच ते वॉईस ओवर कलाकार, संकलक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांच्या पत्नी या सुद्धा उत्तम अभिनेत्री, सूत्रसंचालिका आहेत.

त्यांच्या पत्नीचं नाव सीमा देशमुख. सीमा या सुद्धा श्रीरंग देशमुख यांच्याप्रमाणे मालिका, नाटके, सिनेमा अशा विविध माध्यमातून आपल्याला भेटल्या आहेत. नजीकच्या काळातलं त्यांचं गाजलेलं नाटक म्हणजे वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’. यात सुबोध भावे, शैलेश दातार यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या नाटकाचे अमेरिकेतही प्रयोग झाले आहेत. त्यांचे अजून एक प्रसिद्ध नाटक म्हणजे ‘इंदू काळे आणि सरला भोळे’ हे होय. यात त्यांनी लीना भागवत यांच्या सोबत रंगमंचावर काम केलं होतं. या नाटकाचेही भारतभर प्रयोग झाले. अभिनयाव्यतिरिक्त, सूत्रसंचालक म्हणूनही त्या रंगभूमीशी निगडीत आहेत. ‘वाजविता धनी’ या ज्येष्ठ संगीतकारांवर आधारित वाद्यमैफिलीचं निवेदन त्यांनी केलेलं आहे. ‘चित्रतपस्वी नि चित्रपती एक संस्मरण’ या भालजी पेंढारकर आणि व्ही. शांताराम यांच्या वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या सोबत हि त्यांनी अभिवाचनाचा कार्यक्रम केला होता.

रंगमंचावर काम करता करता त्यांनी टेलीविजन आणि सिनेमा क्षेत्रातही काम केलं आहे. जिवलगा या मालिकेत त्यांनी एक छोटेखानी भूमिका केली होती. तसेच देवाशप्पथ हि मालिकाहि केली. या सोबतच पु.ना.गाडगीळ आणि सन्स यांच्या जाहिरातीत त्या होत्या. सिनेक्षेत्रातील त्यांचे नावाजलेले सिनेमे म्हणजे “मला काहीच प्रॉब्लेम नाही”, “AB आणि CD”. मला काहीच प्रॉब्लेम नाही यांत स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी यांच्या भूमिका होत्या. तसेच विक्रम गोखले यांची भूमिका असलेला “AB आणि CD” हा सिनेमाही वाखाणला गेला. यात अभिनयाचे शेहेनशाहा अमिताभ बच्चन यांनीही भूमिका केली हे या सिनेमाचे वैशिष्ठ्य. सीमा आणि श्रीरंग देशमुख यांनी एक सिनेमा एकत्र केला होता. “एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी” हा तो सिनेमा. या निमित्ताने देशमुख कुटुंब रंगलं होतं सिनेमात असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही.

या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती श्रीरंग देशमुख यांची होती. त्यांच्या आईंनी सुद्धा सहनिर्माती म्हणून भूमिका बजावली होती. सीमाजी अभिनेत्री म्हणून होत्याच. तसेच यातील काही गाण्यांना संगीतबद्ध केलं होतं ते सीमा आणि श्रीरंग यांच्या मुलाने म्हणजेच रोहन याने. रोहन हा पेशाने संगीतकार आहे. या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज काम करत होते. विक्रम गोखले, सुहास परांजपे, मधुरा वेलणकर-साटम, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे आणि सुबोध भावे हि यातील काही नावं. श्रीरंग यांच्या प्रमाणेच सीमा यांचीही अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द आहे. सिनेमे, मालिका, जाहिराती या माध्यमांमधूनहि मुशाफिरी केली आहे. सूत्रसंचालिका म्हणूनही त्यांना वाखाणलं जातंच. येत्या काळातही त्यांच्या कडून अनेक दर्जेदार व्यक्तिरेखा विविध माध्यमांतून साकारल्या जातील हे नक्की. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.