झी मराठी वरील ‘लागीरं झालं जी’ हि मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. काही दिवसांपूर्वीच हि मालिका बंद झाली. ह्या मालिकेत अजिंक्य आणि शीतल ह्यांची एक सुंदर प्रेमकथा दाखवली होती. त्यामुळे दोघेही खूपच लोकप्रिय झाले. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ह्या मालिकेतील फक्त अज्या आणि शीतलीच नाही तर राहुल्या, भैया, जयडी, विक्या, टॅलेंट ह्यांना देखील खूपच लोकप्रियता मिळाली. हि मालिका चांगली चालू असताना आणि मालिकेला चांगलाच प्रेक्षकवर्ग लाभला असतानासुद्धा हि मालिका इतक्या लवकर संपेल असे कुणालाच वाटले नव्हते. अचानक हि मालिका बंद झाल्यामुळे ह्या मालिकेचे चाहते खूपच नाराज झाले. परंतु शीतली आणि अज्या दोघांच्याही चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे ‘लागीरं झालं जी’ मधील हे कलाकार पुन्हा एकत्र पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
ह्या मालिकेतील अज्या, राहुल्या, भैया, विक्या आणि टॅलेंट हे पाचही जण खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र असून मालिकेच्या शूटिंगनंतरही ते एकत्र दिसले आहेत. कधी पुरस्कार सोहळ्यात असो नाहीतर मग इतर ठिकाणी असो, त्यांना एकत्र पाहण्यात आलेले आहे. मालिकेतील शीतली म्हणजे शिवानी बोरकर हिने ३० ऑक्टोबरला तिच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर महाराष्ट्र टाइम्सची एक बातमी शेअर केली होती. त्या बातमीत ‘अज्या आणि शीतली लवकरच एकत्र चित्रपटात काम करत असल्याचे’ सांगितले आहे. शिवानी बोरकरने हि पोस्ट स्वतःच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर शेअर करून ह्या बातमीला दुजोरा सुद्धा दिला आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील अज्या म्हणजेच नितीश चव्हाण, शिवानी बावकर, राहुल मगदूम, किरण गायकवाड ह्यांनी आपल्या सोशिअल मीडिया चॅनेलवर चाहत्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. ह्या फोटोत गणपती बाप्पांच्या फोटोला हार घातलेला असून बाजूला भली मोठी स्क्रिप्ट असून क्लॅपबोर्डवर क्युरिओसिटी मीडिया वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड असे लिहिले असून चित्रपटाचे आणि दिग्दर्शकाचे नाव धूसर केलेले आहे.
अभिनेता नितीश चव्हाण म्हणजेच अज्याने हि पोस्ट शेअर करताना कॅप्शन दिलेले आहे. ‘दंगा घालायला यालोय, पाडव्याच्या मुहूर्तावर सांगा लागलोय, याय लागतंय, सुट्टी नाय’ असं कॅप्शन ठेवत त्याने हा फोटो शेअर केला आहे. ह्या कॅप्शनच्या शेवटला ‘अपकमिंग प्रोजेक्ट २०२०’ असे हॅशटॅग टाकलेले आहे. हाच फोटो शिवानी बोरकर हिने सुद्धा आपल्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर शेअर केला असून ‘नवीन सुरुवात २०२०’ असे कॅप्शन ठेवले आहे. म्हणजेच हा सिनेमा आपल्याला पुढील वर्षीच्या सुरुवातीच्या काही काळांत पाहायला मिळेल. नितीश चव्हाण ह्यांची हि पोस्ट पाहून चाहते सुद्धा खूप खुश आहे. कारण त्यांची लाडकी जोडी अज्या आणि शीतली पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. ह्या बाबतीत अज्या म्हणजेच नितीशशी संवाद साधला असतो त्याने सुद्धा ह्या बातमीला दुजोरा दिलेला आहे. आम्ही एकत्र काम करत असल्याचे त्याने सांगितले असून हा प्रोजेक्ट नेमका काय असणार ह्याबद्दल त्याने कोणतीच माहिती अजून दिलेली नाही. त्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तर अज्या आणि शीतलीच्या ह्या नवीन प्रोजेक्ट साठी मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा.