गेल्या काही वर्षात अनेक नवीन चेहरे आपल्याला मालिकांतून भेटलेले आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांच्या व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. शितली हि “लागिरं झालं जी” मधील व्यक्तिरेखा पण अशीच. मालिका प्रसिद्ध झाल्यापासून ते प्रेक्षकांचा निरोप घेईपर्यंत आणि त्यानंतरहि हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली होती आणि आहे. तिचे डायलॉग तर जबरदस्त प्रसिद्ध झाले होते. ‘लई असत्याल मनमौजी पण लाखात एक माझा फौजी’ हा तर सगळ्यांत प्रसिद्ध. पण तुम्हाला कल्पना आहे का कि सुरुवातीला हेच संवाद बोलण्यासाठी तिला सुरुवातीला थोडी अडचण येत असे. का असं ? त्याचं कारण असं कि शिवानी वाढली मुंबई मध्ये. तिचं बालपण, शिक्षण सगळं मुंबईत झालं. त्यामुळे शितली हि व्यक्तिरेखा करताना सुरुवातीला संवाद बोलताना तिची कसरत होत होती.
पण मालिकेचे लेखक तेजपाल आणि इतर सहकलाकार यांनी तिला या बाबतीत खूप मदत केली. तसेच भाषेविषयी असणाऱ्या प्रेमाचाही तिला फायदा झाला. कारण शिवानी उत्तम मराठी, हिंदी, इंग्रजी बोलतेच. तसेच तिने जर्मन भाषेचेही तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे साताऱ्याच्या मराठी बोलीचा लहेजा तिने अगदी मन लाऊन आणि आपुलकीने शिकून घेतली. त्यामुळे हि लोकप्रिय व्यक्तिरेखा निभावताना ती एवढी एकरूप झाली कि अनेकांना ती मुळची साताऱ्याची आहे, असं वाटलं होतं. तसेच तिला शाळा – कॉलेज मध्ये शिक्षण घेताना नृत्य, अभिनय या विषयात रस होताच. तिचं कॉलेज रुपारेल, जिथून तिने नाटकाचा ग्रुप निवडला होता. त्यामुळे अभिनयाशी संबंध आला होताच. अभ्यास सांभाळून तिने तेव्हा अभिनय करणंही सुरु ठेवलं होतं. आणि हा सगळा अनुभव तिने शितलीची व्यक्तिरेखा उभी करताना वापरला. ज्यामुळे अल्पावधीतच महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली.
याच ओळखीचा तिला पुढे लागिरं झालं जी मध्ये भूमिका मिळण्यास मदत झाली. तोही एक किस्सा आहेच. झालं असं कि तिच्या एका मित्राची आणि या मालिकेशी निगडीत काही जणांची मैत्री होती. जेव्हा या मित्राला या मालिकेविषयी कळलं तेव्हा त्याने शिवानीचं नाव सुचवलं आणि पुढे ऑडिशन होऊन तिला हि भूमिका मिळाली. या मिळालेल्या संधीचं तिने सोनं केलं. मालिका तुफान प्रसिद्ध झाली. पण गोष्ट कितीही चांगली असो ती कधी तरी थांबतेच. तशी हि मालिका थांबली. पण शिवानीचा प्रवास सुरु राहिला. तिने पुढे ‘अल्टी पल्टी’ या धमाल मालिकेत विनोदी भूमिका केली होती. आता सध्या ती ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर लेडीज स्पेशलच्या स्कीट्समध्ये काम करते आहे. ती मालिकांसोबतच सिनेमाच्या पडद्यावरही ती दोन सिनेमांमधून झळकली आहे.
एक आहे ‘युथ ट्यूब’ हा सिनेमा तर दुसरा आहे ‘उंडगा’ हा सिनेमा. युथ ट्यूब हा सिनेमा तिने तिचे अभिनयातील गुरु प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्या सोबत केला आहे. तसेच ‘खुळाच झालो ग’ हा तिचा म्युजिक विडीयो युट्युब वर फार प्रसिद्ध झाला आहे. या म्युजिक विडीयोला ६६ लाखांहून अधिक हिट्स युट्युब वर मिळाले आहेत. शिवानीचा अभिनयाचा प्रवास काही वर्षांपूर्वी सुरु झाला आहे. पण तरीही स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर तिने लोकप्रियता मिळवली आहे. येत्या काळातही तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी ‘लागिरं झालं’ साठी जशी भाषेवर आणि अभिनयावर मेहनत घेतली, तशीच मेहनत घेईल यात शंका नाही. तिच्या पुढील वाटचाली साठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)