सलमान खान हे नाव गेल्या काही दशकांपासून बॉलिवूडमध्ये चालत आलेले खणखणीत नाणं आहे. आजकालचे कलाकार वादाच्या बाबतीत सलमानपासून दोन हाथ लांबच असतात. उगाच कशाला करियरशी पंगा घेणार असा विचार करून ते ह्या बॉलिवूडच्या भाईला घाबरतातही तितकेच. पण तुम्हांला माहिती आहे का बॉलिवूडवर राज्य करणारा आपला भाईला शिक्षकांचा मार खावा लागला होता. कारणही तसेच गमतीशीर आहे. चला पाहूया मग. काही आठवड्यांपूर्वीच शिक्षक दिनानिमित्त सलमान खानने फादर अलियो, फादर हेंड्री आणि पीटी शिक्षक पांडे सर यांची आठवण काढली. आपल्या वैयक्तिक आयुष्यावर क्वचितच बोलणाऱ्या सलमान खानला ह्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने ज्या शिक्षकांचे आयुष्यात महत्त्वाचे योगदान होते, अशा शिक्षकांची आठवण झाली.
तसेच अनेक शिक्षकांनी त्याला शिकवले असले तरी फादर अलियो, फादर हेन्ड्री आणि पीटी शिक्षक पांडे हे त्याच्यासाठी विशेष होते. सलमान खान म्हणतो की, “माझ्या शाळेचे मुख्याध्यापक फादर अलिओ माझे आवडते शिक्षक होते. ते मला खूप जीव लावायचे. ते स्पॅनिश होते. दहावी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी मला भविष्यात काय करणार आहेस असे विचारले असता, मी माझ्या आवडीनुसार सांगितले – “सर मला जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये जायचे आहे.” ते म्हणाले, “फारच छान, मला तुझा अभिमान आहे, तु तुझ्या आवडी निवडीला अनुसरून गेलास तर खूप पुढे जाशील.” बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मी सेंट झेवियर्समध्ये प्रवेश घेतला, कारण तेथील वातावरण खूप चांगले होते. त्यावेळी लोकांचा आर्ट घेणाऱ्या लोकांसंबंधित असा समज होता की, ते कॉलेजमध्ये शिक्षणासाठी न जाता टाईमपास करण्याकरीता जात असत. म्हणूनच मी विज्ञान घेतले. जेव्हा सलमान घरी आला, तेव्हा प्रत्येकजण आनंदी होता आणि त्यांना असे वाटू लागले की सलमान डॉक्टर होईल. परंतु माझ्या वडिलांना माहित होते की, माझ्यामध्ये एक कलाकार दडलेला आहे. ते म्हणाले की, “जर दोन महिने तू फक्त विज्ञानाचा अभ्यास केल्यास, तर मी माझं नाव बदलेन.” त्यानंतर एक दिवस फादर अलियो घरी आले आणि माझ्या वडिलांकडून मी विज्ञान घेतल्याचे त्यांना समजले. त्यांनी मला तिथेच कानाखाली मारली आणि खडसावून विचारले की, “तुला कलेविषयी मनापासून प्रेम आहे आणि तू डॉक्टर होणार?”
अशे होते माझे शिक्षक फादर अलिओ. त्यांना माहीत होते की, मला कोणत्या क्षेत्रात रस होता. ते आता या जगात नाहीत. काही वर्षांपूर्वी त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा मी खूप प्रयत्न केला. मी माझी बहिण अलवीराला शाळेत त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर मिळविण्यासाठी पाठविल होतेे. पण काहीच माहिती हाती लागली नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांनी माझ्यासाठी पत्र लिहल्याचे निदर्शनास आले. मी आजही या शिक्षकांचा खूप आदर करतो. याशिवाय मी ज्या शिक्षकांशी संपर्क साधतो त्यापैकी एक म्हणजे फादर हेन्ड्री. ते माझगाव येथे राहतात. ते दृष्टीहीन झाले आहेत. माझे एक पीटी शिक्षक पांडे सर होते. मी त्यांच्याशीही सतत संपर्कात असतो.”