सध्या मालिकाविश्वात दाखल झालेल्या एका मालिकेची खूप चर्चा होते आहे. ती मालिका म्हणजे ‘लाडाची मी लेक गं’. या मालिकेतील डॉ. सौरभ आणि कस्तुरी यांची जोडी लोकांचं विशेष लक्ष वेधून घेते आहे. ह्या व्यक्तिरेखा आरोह वेलणकर आणि मिताली मयेकर यांनी अनुक्रमे साकारल्या आहेत. यांतील मितालीच्या अभिनय प्रवासाचा मराठी गप्पाच्या टीमने काही काळापूर्वी आढावा घेतला होता. त्या लेखाला असंख्य वाचक लाभले. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! आज या मालिकेतील आरोह वेलणकर याच्या अभिनय कारकिर्दीविषयी आपण माहिती घेणार आहोत. आरोहला आपण सिनेमातून पहिल्यांदा भेटलो ते ‘रेगे’ या सुप्रसिद्ध सिनेमाच्या निमित्ताने. या सिनेमातील त्याची मध्यवर्ती भूमिका प्रचंड गाजली. या सिनेमाचंहि खूप कौतुक झालं. हा सिनेमा मिळण्याअगोदर पुणेकर असलेल्या आरोह ने अनेक महाविद्यालयीन एकांकिकांमधून सहभाग घेतला होता.
काही काळापूर्वी त्याने चाह्त्यांसोबत शेअर केलेल्या फोटोत त्याने या काळात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत जिंकलेल्या पुरस्कारांसोबत एक फोटो शेअर केला होता. याच काळात त्याचं इंजिनियरिंगचं शिक्षण त्याने पूर्ण केलं. एकांकिकांमध्ये रमणाऱ्या आरोहचं एक नाटकही मधल्या काळात गाजलं, ते म्हणजे ‘व्हाय सो गंभीर’. लॉकडाऊनच्या काळातही ‘माझं ऑनलाईन थिएटर च्या माध्यमांतून तो नाटकांशी जोडलेला राहिला. एकांकिका आणि नाटकांनंतर केलेल्या ‘रेगे’च्या घवघवीत यशानंतर त्याने अजून काही सिनेमे केले. विराजस कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत त्याने होस्टेल डेज केला. तर अमेय वाघ आणि सक्षम कुलकर्णी यांच्यासोबत त्याने घंटा हा सिनेमा केला. व्यावसायिक सिनेमात काम करताना त्याने एक शॉर्ट फिल्महि केली. त्या शॉर्ट फिल्मला युट्युबवर आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलं आहे. यात ज्योती सुभाष यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. त्यानेही याचं सोनं केलं. या शॉर्ट फिल्मचं नाव ‘केवडा’. तसेच थिएटरॉन एन्टरटेन्मेंटच्या एका मोनोलॉगचाही तो भाग होता. ‘तुझे आहे तुझंपाशी’ असं ह्या मोनोलॉगचं नाव.
सिनेमा आणि मालिका यांच्यात घवघवीत यश मिळवत असताना घराघरात पोहोचवणारा टेलीविजनचा पडदाही त्याने गाजवला आहे. सध्या चालू असलेली ‘लाडाची मी लेक गं’ हि त्यातलीच एक प्रसिद्ध होत चाललेली मालिका. तसेच ‘प्रेम हे’ या झी युवाच्या मालिकेतील काही भागांत तो अश्विनी कासार सोबत झळकला होता. तसेच झी युवाच्याच ‘गुलमोहर’ मालिकेतही त्याने काम केलेलं आहे. पण सगळ्यात जास्त लोकप्रियता आणि प्रसिद्धी त्याला टेलीविजनच्या माध्यमांतून मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’ च्या पर्वातून. या पर्वात वाइल्ड कार्ड म्हणून दाखल झालेल्या आरोहने थेट फिनालेत धडक मारली होती. वाइल्डकार्ड म्हणून येऊन विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचत असताना त्याने पूर्णपणे झोकून देऊन सहभाग नोंदवला. अभिनयासोबत आरोहने दिग्दर्शनहि केलेलं आहे. ‘वीर : संघर्ष, त्याग, क्रांती’ हा त्याने संपूर्णपणे दिग्दर्शित केलेला कार्यक्रम. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या महान कार्यावर आधारित का कार्यक्रम आहे. सिनेमॅटीक अनुभव देणारा हा कार्यक्रम असेल. एप्रिल महिन्यात हा कार्यक्रम सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीस आला असता. पण लॉकडाऊनमुळे येत्या काळात हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
अभिनय, दिग्दर्शन यांच्याप्रमाणेच आरोह उत्तम लेखकहि आहे. अनेक वेळेस त्याच्या कविता तो सोशल मिडियाच्या माध्यमांतून तो आपल्या समोर घेऊन येत असतो. कलाक्षेत्रासोबतच आरोह स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असतो. एका प्रथितयश वृत्तपत्राने सादर केलेल्या एका पाहणी अहवालानुसार मोस्ट डीजायरेबल अभिनेता म्हणून पहिल्या दहांत त्याची निवड झाली होती. आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आरोह सामाजिक कामांतही भाग घेत असतो. यापैकी, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्याने प्रेक्षकांना जे आवाहन केलं आणि त्यासाठी अगदी घरोघरी तो गेला हे नक्कीच स्पृहणीय आहे. असा हा नव्या दमाचा, संवेदनशील कलाकार सध्या ‘लाडाची मी लेक गं’च्या शुटींगमध्ये तो व्यस्त आहे. येत्या काळात मालिकांसोबतच तो विविध माध्यमांतून भेटत राहील हे नक्की. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)