लॉकडाऊन नंतर काही नवीन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करायला दाखल होत आहेत. या निमित्ताने अनेक कलाकार विविध भूमिकांमधून आपल्या भेटीस पुन्हा मालिकांतून येत आहेत. यातलं एक बहुचर्चित नाव म्हणजे स्मिता तांबे. स्मिता तांबे हे नाव मालिका आणि एकंदर मनोरंजनविश्वाला काही नवं नाही. त्यांनी करीयरच्या सुरुवातीपासूनच अनेक विविध भूमिका केल्या आहेत आणि त्यासाठी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आज त्यांच्या नवीन मालिकेनिमित्त त्यांच्याविषयी थोडसं. स्मिता ह्या मुळच्या साताऱ्याच्या. पण त्यांचे वडिल कामानिमित्त पुण्याला आले आणि त्याचं पूर्ण कुटुंब इथे स्थायिक झालं. तिथेच त्याचं सगळं शिक्षण झालं. शाळेत अभ्यासासोबतच इतर स्पर्धांमध्ये स्मिता या पुढे होत्या. एका मुलाखतीत नमूद केल्याप्रमाणे त्यांनी या काळात अनेक वादविवाद स्पर्धा जिंकल्या होत्या. तसेच कबड्डी च्या टीम मधूनही त्या खेळत.
पण पुढे करियर म्हणून त्यांनी शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला. तसा अभ्यास सुरु केला. एम.ए. एम. फिल. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. तो पर्यंत त्यांनी अभिनय हेच आपलं करियर असेल असं ठरवलं नव्हतं. पुढे जोगवा सारखा सिनेमा, तसेच नाटकांतून त्यांनी कामे सुरु केली. “हर हायनेस अनिता” हे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं नाटक ठरलं. या नाटकाच्या तालमींसाठी त्या पुण्याहून मुंबईला येत व त्याच दिवशी पुण्याला पुन्हा जात. असं करता करता, आपण हेच क्षेत्र निवडावं आणि मुंबईला कामानिमित्त राहावं असं त्यांना वाटलं. पुढे नाटकांसोबतच त्यांनी सिनेमा आणि मालिकांमध्येही काम करायला सुरुवात केली. त्यांची गाजलेली नाटके म्हणजे, बापाचा बाप, श्रीमान योगी, हमिदाबाईची कोठी आणि अनेक.
त्यांचे मालिका आणि नाटकांसकट अनेक सिनेमेहि गाजले. कँडल मार्च, ७२ मैल, जोगवा हे त्यातले काही लोकप्रिय सिनेमे. जोगवा हा त्यांचा पहिला सिनेमा. या सिनेमामधली “फुला” हि व्यक्तिरेखा अप्रतिमरित्या त्यांनी साकारली होती. या सिनेमात गाजलेल्या एका गाण्याची कोरिओग्राफी देखील त्यांनी केली होती. ७२ मैल मधल्या त्यांच्या आईच्या भूमिकेने तर प्रेक्षकांच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहिले इतकं परिणामकारक काम त्यांनी केलं होतं. पुढे त्यांचे हिंदीतही सिनेमे आले त्यातील अम्रिका हा एक. या सिनेमातही त्यांनी काम केलं. ज्याचे संवाद लेखक होते धीरेंद्र द्विवेदी, जे पुढे त्यांचे पती झाले. धीरेंद्र हे उत्तम संवाद लेखक तर आहेतच तसेच अनेक सिनेमांमध्ये हि त्यांनी लेखक, दिग्दर्शक अशा भूमिका केलेल्या आहेत. तसेच ते उत्तम चित्रकारही आहेत.
आज वरच्या प्रवासात स्मिता यांनी अनेक उतार चढाव त्यांच्या करियर मध्ये पहिले आहेत. मग त्यात काही काळ असाही होता ज्यात मालिकांतून त्यांनी छोटी छोटी कामे केली. तर काही वेळेस मुख्य भूमिकांमधून कामे केली. पण या सगळ्या अनुभवातून त्या तावून सुलाखून निघाल्या. सतत काम करत राहिल्या. काम करताना स्वतःच क्षितीज त्या विस्तारत गेल्या. मराठी सोबतच हिंदी आणि दक्षिणात्य भाषेतही सिनेमे करताना त्या लीलया वावरल्या आहेत. तसेच नवनवीन माध्यमातूनहि त्यांनी अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. नाटक, सिनेमा, मालिका असा प्रवास करता करता त्यांच्या वेबसिरीजहि प्रसिद्ध झाल्या आहेत. लॉकडाऊननंतर त्या आत्ता पुन्हा “लाडाची मी लेक गं” या मालिकेतून आपल्या भेटीस आल्या आहेत. यातील त्यांची व्यक्तिरेखा हि “मम्मी” म्हणून ओळखली जाते जी दादागिरी साठी प्रसिद्ध आहे. येणाऱ्या काळात स्मिता यांची हि भूमिका सुद्धा इतर भूमिकांप्रमाणेच गाजेल यात शंका नाही. त्यांच्या नवीन मालिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)