गेल्या काही काळापासून ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’ ही संज्ञा फारच प्रचलित झाली आहे. यात सोशल मीडियाचा वाढता पसारा हे कारण आहे हे आपण जाणतोच. पण अस असलं तरी हा सोशल मीडिया प्रसाराचा वेग इतका आहे की या वेगात अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पाठी पडत जातात. पण काही जण मात्र अगदी ठामपणे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतात. यातील एका इन्फ्लुएन्सरचा एक वायरल व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. तेव्हा जाणवलं की आपण यांच्या विषयी लिहिलं नाहीये. मग, आता विचार झालाच आहे तर लिहू एक लेख असं सगळ्यांचं मत ठरलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे.
हा लेख ज्या सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर बाबतीत आहे त्यांचं नाव आहे संजीव श्रीवास्तव. डोक्यात थोडी घंटी वाजली का? थांबा त्यांचं अजून एक नाव जाणून घ्या. त्यांना लोकं लाडाने डब्बू अंकल, डान्सिंग अंकल म्हणतात. हा ! आता कसं आठवलं.
तेच हे डान्सिंग अंकल जे काही वर्षांपूर्वी त्यांच्या डान्समुळे प्रसिद्ध झाले होते. एका नातेवाईकाच्या लग्नात त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने धमाल डान्स केला होता. आजतागायत त्या व्हिडियोला जवळपास सात करोडहुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून त्यांची प्रसिद्धी कळून येते. त्यांचा हा डान्स, सुपरस्टार गोविंदा यांच्या डान्स वरून प्रेरित झाला होता. पुढे पुढे तर हा व्हिडियो इतका लोकप्रिय ठरला की एका रियालिटी शोच्या निमित्ताने खुद्द गोविंदा यांच्या समक्ष डान्स करण्याची संधी या डान्सिंग अंकलना मिळाली. पुढे सलमान खान यांच्या सोबतही एका शो दरम्यान पाय थिरकवण्याची संधी मिळाली. पेशाने प्रोफेसर असणारे संजीव श्रीवास्तव गेले अनेक वर्षे डान्स करत असत अस कळतं. पण त्यांच्या लोकप्रियतेत या वायरल व्हिडियो आणि हे दोन रियालिटी शोज यांनी भर टाकली आणि त्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं हे नक्की.
पुढे सोशल मीडिया वरून त्यांचे अनेक डान्स वायरल होत राहिले. त्यातील एक डान्स जो आपल्या टीमने आज पाहिला. हा डान्स परफॉर्मन्स त्यांनी खरं तर एका गोकुळाष्टमी कार्यक्रमानिमत्त सादर केला होता. नेहमीप्रमाणे त्यांच्या अर्धांगिनी सुद्धा तेथे उपस्थित होत्या. या दोघांनी जो डान्स केला तो उपस्थितांनाही अगदी मनापासून आवडला.
त्यात डब्बू अंकल यांनी केलेला स्लो मो डान्स असो, वा जे काही ठुमके लागावले आहेत त्यांना तोड नाही. बरं या कार्यक्रमातील स्टेज ही बराच लांब लचक होता. पण त्यांचा उत्साह इतका की आपल्या डान्सने त्यांनी पूर्ण स्टेज व्यापून टाकला होता. तसेच त्यांची अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे स्टेजच्या आजूबाजूला सगळीकडे जिथे जिथे प्रेक्षक दिसतील तेथे तेथे त्यांनी मानवंदना दिली. अर्थात ती ही डान्स स्टेप्स मधूनच. त्यामुळे परफॉर्मन्स मध्ये खंड पडला नाही, पण लोकांना त्यांची ही पद्धत ही आवडली. तसेच या कार्यक्रमात पहिल्यांदा गाणं वाजलं ते ‘आपके आ जाने से’ हे प्रसिद्ध गाणं. या गाण्यावर हे काका जवळपास पाच मिनिटं नाचले. विचार करा पाच मिनिटं म्हणजे बराच काळ झाला. पण एखादी कला मनापासून आवड असेल तर वेळेचं बंधन नसतं आपल्या मनाला. हे काका यांचं उत्तम उदाहरण. कारण हा डान्स झाल्यावर हे काका अजून एक डान्स करतात. ते ही ज्युलि ज्युलि या गाण्यावर. आधीच हे गाणं परफॉर्म करताना खूप ऊर्जा लावावी लागते. त्यात काकांनी आधीच पाच मिनिटं डान्स केला होता. पण कसचं काय. काकांनी पुढची दोन मिनिटं स्टेज अगदी दणाणून सोडला म्हंटलं तरी वावगं ठरू नये.
त्यात त्यांची ऊर्जा इतकी होती की सूत्रसंचालन करणाऱ्या मुलींनाही डान्स करण्याची इच्छा झाली. त्यांनी सोबत काकांच्या पत्नीला ही डान्स करायला घेतलं होतं. पण काकांचा डान्स एवढा जबरदस्त होता की या तिघीही त्या मानाने कमीच नाचू शकल्या. पण एक मात्र खरं की एरवी सात मिनिटांचा व्हिडियो म्हंटला की कंटाळा येतो. पण ह्या व्हिडियो मधील एक क्षणही कंटाळवाणा होत नाही. आपण हा व्हिडियो अथपासून ते इतिपर्यंत आनंद घेत बघतो. आपल्याला संधी मिळाली तर हा व्हिडियो नक्कीच बघा.
या लेखाच्या निमित्ताने डान्सिंग अंकल विषयी माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या टीमने केला. त्यामागे एक भूमिकाही होती. संजीवजींना डान्सची आवड होतीच आणि त्यांनी ती जपली. एरवी काहीसा रुक्ष वाटणारा शिक्षकी पेशा असतानाही त्यांनी आपल्यातील कलाकार जागृत ठेवला. आपल्यातील अनेकांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरू शकतात खरे. तसेच आपली आवड जोपासायला आणि ती वृद्धिंगत करायला वयाचं बंधन नसतं हे ही शिकायला मिळतं. आपली टीम त्यांच्या प्रवासातून बरंच काही शिकली आहे. आपणही काही नवीन शिकला असालच. तेव्हा आपण त्यांच्याकडून जे शिकलात ते कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका. तसेच हा लेख आपल्या पसंतीला उतरला असेल अशी अपेक्षा आहे. तेव्हा लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करा आणि नवीन उत्तमोत्तम लेखांसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :