सध्या बबड्या हे नाव एवढं गाजतंय कि त्याच्यावर मिम्स वर मिम्स बनताहेत. आपणही पाहिले असतीलच. आशुतोष पत्की या तरुण नटाने ती भूमिका एवढी चपखल वठवली आहे कि, सोबत दिग्गज कलाकार असतानाही त्याच्या भूमिकेचं सुद्धा कौतुक लोकं करताहेत. पण तुम्हाला आशुतोष विषयी किती माहिती आहे. जाणून घ्या मग.
आशुतोष हा हॉटेल मॅनेजमेंटसाठी प्रसिद्ध कोहिनूर कॉलेजचा विद्यार्थी. मुंबईत वाढलेला. ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा. त्यामुळे कलाक्षेत्राशी संबंधित. अभिनय करावं असं मनापासून वाटणारा. शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झालं असतानाही अभिनयाच्या प्रेमापोटी, त्याने अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेत अभिनयाचे प्रशिक्षण घेतलं. आणि पुढे आपलं कामही सुरु केलं.
आपण त्याला बबड्या म्हणून सध्या जास्त ओळखत असलो तरी त्याच्या नावावर अनेक भूमिका आहेत. दुर्वा, श्रीमंत दामोदर पंत, मेहेंदीच्या पानावर, मधु इथे चंद्र तिथे या कलाकृतींमध्ये त्याने काम केलं आहे. वन्स मोअर या चित्रपटातही त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. जानेवारी महिन्यात शहीद भाई कोतवाल हा त्याचा महत्वाचा चित्रपट प्रसिद्ध झाला. ऐतिहासिक भूमिका करणं म्हणजे शिवधनुष्य. पण आशुतोष याने ते शिवधनुष्य पेललंय.
आपल्या कारकिर्दीत नवनवीन भूमिका करण्याकडे आशुतोष याचा कल दिसतो आणि यात तो यशस्वीसुद्धा होताना सुद्धा दिसतोय. आपल्या तरुण करियर मध्ये, विनोदी, नकारात्मक, ऐतिहासिक अशा बऱ्याच भूमिकांना त्याने हाथ घातला आहे. आणि अभिनयाबरोबरच त्याने असिस्टंट दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळे अभिनयासोबतच इतर क्षेत्रातही त्याची मुशाफिरी चालू आहेच.
कामाच्या घाइगर्दितही आशुतोष हा सदैव फिट राहण्याकडे लक्ष देतो. कामाच्या रहाटगाडग्यात फिटनेस कडे दुर्लक्ष होऊ नये असं त्याला नेहमी वाटतं. फिटनेस हा केवळ व्यायामप्रकारपर्यंत मर्यादित नसून ती एक जीवन शैली आहे, असं तो मानतो. त्याला बाईक रायडींग करायलाही आवडतं. तसेच त्याला पाळीव प्राण्यांविषयी लळा आहे, असंही त्याच्या सोशल मिडिया पोस्ट्स वरून दिसून येतं.
त्यामुळे आपण नक्की म्हणू शकतो कि, नकारात्मक भूमिका असूनसुद्धा खऱ्या आयुष्यात तो एक युथ आयकॉन आहे, ज्याच्या विचारांशी आजची तरुणाई स्वतःला जुळवून घेऊ शकेल. त्याच्या करीयरच्या या टप्प्यावर त्याला प्रसिद्धी अमाप मिळते आहे आणि तो एक अभिनेता म्हणून तो उत्तम अभिनय सुद्धा करतो आहे. हे समीकरण त्याच्या संपूर्ण करियरभर असंच टिकून राहो हीच मराठी गप्पाच्या टीमकडून शुभेच्छा. (Author : Vighnesh Khale)