Breaking News
Home / माहिती / व्हेल माशाची उलटी आहे सोने हिऱ्यांपेक्षा मौल्यवान, बघा किती आहे किंमत

व्हेल माशाची उलटी आहे सोने हिऱ्यांपेक्षा मौल्यवान, बघा किती आहे किंमत

असं म्हणतात कि एखाद्यासाठी एखादी गोष्ट हि काही काळाने टाकाऊ किंवा बोली भाषेत म्हणायचं तर भंगारातील असेल तर तीच गोष्ट दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते. काही वेळेस तर आर्थिकदृष्ट्याहि घवघवीत यश आणि अमाप पैसा मिळू शकतो. विश्वास नाही बसत? मग वाचा तर हा लेख. अचंबित व्हाल तुम्ही लोकं. स्पर्मव्हेल ज्याला आपण देव मासा म्हणून ओळखतो त्याच्या संदर्भात हि आश्चर्यचकित करणारी माहिती आहे. आपल्याला माहिती आहेच कि व्हेल माशाची शिकार हि कित्येक शतकांपासून केली जाते. व्हेल माशापासून मिळणारं तेल, व्हेल माशाची हाडं आणि अँबरग्रीस हा पदार्थ यांमुळे प्रामुख्याने त्यांची शिकार केली जात असे. पुढे या शिकारी एवढ्या वाढल्या कि नामशेष होणाऱ्या सस्तन प्राण्यांच्या यादीत व्हेल माशाचं नाव घेतलं जाऊ लागलं आणि त्यांच्या शिकारीवर निर्बंध आले.

पण एक गोष्ट मात्र त्यांची शिकार न करताही व्यापारांना मिळू शकत असे ती म्हणजे अँबरग्रीस हा पदार्थ. कारण हा पदार्थ देव माशाच्या पोटात आतड्यांजवळ तयार होतो. या पदार्थामुळे जायंट स्क्विड सारख्या समुद्री प्राण्याच्या हल्लापासून बचावासाठी मदतशीर ठरतो. संकट आलं कि त्याच्याशी प्रतिकार करण्याची निसर्गाची हि जशी देणगी आहे. तसेच कोणतीही गोष्ट अति झाल्यास त्याचे उत्सर्जन करावे किंवा त्याचा त्याग करावा असा अलिखित नियम सुद्धा. त्याच नियमाप्रमाणे व्हेल माशाच्या शरीरात हा पदार्थ जेव्हा मोठ्या प्रमाणात तयार होतो तेव्हा त्याचे उत्सर्जन केले जाते. बरं हे उत्सर्जन तोंडातून केले जात असावे असं काही संशोधक म्हणतात तर काही संशोधकांच्या मते याची काही वेगळी पद्धत असावी. हे दोन्ही तर्क मानण्यास जागा आहे, कारण अँबरग्रीस हा पदार्थ १५ ग्राम ते ५० किलो एवढ्या विविध वजनांमध्ये आढळतो. तसेच जेव्हा हा पदार्थ उत्सर्जित केला जातो तेव्हा याचा वास अतिशय उग्र असतो आणि एखाद्या उलटीसारखा भासतो. काही जण याला व्हेलची विष्ठा असेही म्हणतात. मग काही काळ तो समुद्रात राहतो आणि कालांतराने किनाऱ्यावर येतो.

याच काळात त्याचं रुपांतर एखाद्या मऊ खडकासारख्या पदार्थात रुपांतर होतं. तसेच उग्र वास जाऊन सुगंध येण्यास सुरुवात होते. आणि इथेच या व्हेल माशाच्या टाकाऊ गोष्टीची किंमत वाढण्याची पहिली पातळी गाठली जाते. कारण याच्या गुणधर्मामुळे याचा वापर अत्तर बनवण्यासाठी केला जातो. वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. अनेक महागड्या परफ्युम्समध्ये याचा वापर केला जातो. पुढची पातळी असते ती किंमत ठरवण्याची. या पातळीविषयी सामान्यतः माहिती नसते. पण काही लाख ते काही करोड रुपयांचे व्यवहार या पदार्थासाठी केले जातात. आपण गुगलवर सर्च केले असता या गोष्टीशी निगडीत बातम्या मिळतील. पण त्या आधी अजून काही गोष्टी जाणून घ्या आणि मग सर्च करा. यात विचार करण्यासारखी गोष्ट अशी कि व्हेल माशाकडून जर हा पदार्थ उत्सर्जित केलेला असेल तर याची एवढी किंमत का. याचा सर्रास पुरवठा होतो किंवा नाही. यात खरी मेख आहे. संशोधनाअंती असं दिसून येतं कि स्पर्मव्हेल माशाच्या एकूण संख्येपैकी केवळ एक टक्के व्हेल माशांकडून अँबरग्रीस हा उत्सर्जित केला जातो. परिणामी त्याचे बाजारमूल्य वाढते.

गेल्याच एका महिन्यापूर्वी एका तैवानी माणसाला चक्क सहा मिलियन डॉलर एवढ्या किंमतीचा अँबरग्रीस हा पदार्थ मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. सहा मिलियन डॉलर्स म्हणजे साठ लाख डॉलर्स. किंमत ऐकून चक्कर येईल, पण खरंच या पदार्थाची एवढी किंमत असू शकते. एवढ्या अवाढव्य किंमतीमुळे अनेक वेळा या पदार्थाची तस्करी केली जाते. या लेखाची सुरुवात करताना म्हंटलं होतं त्याप्रमाणे एखाद्यासाठी टाकाऊ असलेली वस्तू, इतरांसाठी उपयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते याची खात्रीच पटते. मध्य युगीन युरोपात त्याचा औषधी म्हणून वापर केल्याचा उल्लेख विकीपिडियावरील एका लेखात आढळतो. पण अर्थात, याचा सगळ्यांत जास्त वापर अनेक उंची अत्तरांसाठी खासकरून केलेला असतो. अगदी हर्मन मेलविल याच्या १८५१ साली गाजलेल्या मोबि-डीक या व्हेल माशाच्या शिकारीवर आधारित लोकप्रिय पुस्तकातही याचे उल्लेख आढळतात. यामुळे सुरुवातीला किळसवाणा वाटणारा पदार्थ कालांतराने आपल्याला सुगंध देतो आणि माणसाच्या हौसेमौजेला मोल नसतं हेही अधोरेखित करतो.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *