Breaking News
Home / मराठी तडका / शालिनीची खऱ्या आयुष्यतील मावस बहीणसुद्धा आहे लोकप्रिय अभिनेत्री, हिंदीमध्येही केले आहे काम

शालिनीची खऱ्या आयुष्यतील मावस बहीणसुद्धा आहे लोकप्रिय अभिनेत्री, हिंदीमध्येही केले आहे काम

आपल्या मनोरंजन विश्वातलं एक महत्वाचं माध्यम म्हणजे मालिका. इतर कोणत्याही माध्यमापेक्षा या माध्यमाचा आपल्या आयुष्यात खूप जास्त परिणाम होत असतो. कारण या माध्यमातून आपल्याला भेटीस येणाऱ्या कलाकृती या कळत नकळत आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनून जातात. त्यामुळे यातील विविध व्यक्तिरेखा या आपल्या अगदी जवळच्या वाटू लागतात. त्यात नायकी आणि खल अशा दोन्ही व्यक्तिरेखांचा समावेश होतो. सध्या यातील एक खल भूमिका तर आपल्या सगळ्यांच्या आवडीची झाली आहे. श्रेय अर्थातच जातं ते ती भूमिका अगदी चपखलरीतीने वठवणाऱ्या अभिनेत्री यांना. या खल भूमिकेचं नाव आहे शालिनी. ही दमदार भूमिका साकार केली आहे तितक्याच दमदार अभिनेत्री असणाऱ्या माधवी निमकर यांनी. त्यांचं सुंदर व्यक्तिमत्त्व या भूमिकेतही भुरळ पाडून जातं. सोबतच या व्यक्तिरेखेच्या त्यांनी वठवलेल्या शेड्स मुळे ही व्यक्तिरेखा सदैव लक्षात राहते.

या भूमिकेत त्यांनी जशी स्वतःची छाप पाडली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इतर भूमिकांतूनही सशक्त अभिनय करत स्वतःचं कलाक्षेत्रातील अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यांची या क्षेत्रातील सुरवात ही अतिशय खडतर म्हणावी अशी होती. मुंबईला येऊन नोकरी करत करत त्या कलाक्षेत्रात जम बसवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी सुरुवात केली ती एक सूत्रसंचालिका म्हणून. गाणे तुमचे आमचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केलं होतं. पुढे त्यांनी विविध सिनेमे आणि मालिकांतून अभिनय करत करत आपल्या कारकिर्दीस वळण दिलं. स्वप्नांच्या पलीकडले, हम तो तेरे आशिक हैं, सुख म्हणजे नक्की काय असतं या त्यांनी अभिनय केलेल्या मालिका.बायकोच्या नकळत, असा मी तसा मी, धावा धाव, सगळं करून भागले, संघर्ष ही त्यांनी अभिनय केलेल्या सिनेमातील काही सिनेमांची उदाहरणं. तसेच त्यांनी काही काळापूर्वी अक्षय कुमार यांच्या सोबत एका जाहिरातीत ही काम केलं होतं. त्यांच्या या कलाप्रवासाची सुरुवात त्यांच्या मावस बहिणीसोबत झाल्याचं कळतं.

आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की त्यांची ही मावस बहीण म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे-आनंद या होत. सोनालीजींनी ही आपल्या कारकिर्दीची सुरवात मालिकांतून केली. त्यात त्यांनी हिंदी मालिकांतूनही अभिनय केला. आभाळमाया, ऊन पाऊस, बे दुणे दहा, हम जो केह ना पाए, प्यार के दो नाम या त्यांनी अभिनित केलेल्या मालिका आहेत. तसेच त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केलेला आहेच. सावरखेड एक गाव, चेकमेट, ७ रोशन विला, हृदयांतर हे त्यांनी अभिनित केलेले चित्रपट आहेत. हृदयांतर या चित्रपटाचा मुहूर्त शाहरुख खान आणि ट्रेलर लॉन्च हे हृतिक रोशन यांनी केला होता. सोनालीजींनी काही काळापूर्वी व्यावसायिक रंगभूमीवरही पदार्पण केलं होतं. ‘बाय बाय बायको’ हे त्यांनी अभिनित केलेल्या नाटकाचे नाव. मधल्या काळात एका कुकिंग शोच्या निमित्ताने त्या आपल्याला पुन्हा एकदा टीव्ही च्या पडदयावर दिसल्या होत्या.

या दोन्ही बहिणींनी आपल्या उत्तम अभिनयाने मालिका, नाटक, सिनेमा, जाहिरात या जवळपास सगळ्याच माध्यमांत स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं आहे. या प्रवासात त्यांनी स्वतःला माणूस आणि अभिनेत्री म्हणून घडवत जो प्रवास केला आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भूमिका या पुन्हा पुन्हा बघाव्यात अशा वाटतात. तसेच या दोघी उत्तम योगा करतात आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून त्यांच्या चाहत्यांना ही योगा करण्यास त्या प्रवृत्त करत असतात. आपण आपलं आरोग्य उत्तमरीत्या कसं जपावं याचं जणू उदाहरण त्या दोघी आपल्यासोबत शेअर करत असतात. हा त्यांच्यातील अजून एक समान दुवा म्हणता येइल. त्यांच्याकडून कलाकार म्हणून बरच काही शिकता येतं. तसेच त्यांचा कलाप्रवास हा प्रेरणादायी सुद्धा आहे. या लेखाच्या निमित्ताने या दोघींनाही आमच्या मराठी गप्पाच्या टिमकडून मानाचा मुजरा. तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण नेहमीच आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता. सकारात्मक कमेंट्स मधून आपला प्रतिसाद कळून येतो. तसेच प्रत्येक लेख तुम्ही मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता. त्यातूनही एक ऊर्जा मिळतेच. आपला हा स्नेह आमच्या मराठी गप्पाच्या टीमप्रति कायम असू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *