तुम्हाला एखाद्या क्षेत्राची आवड असेल आणि येणाऱ्या संधीचा फायदा घेऊन सतत काम करत त्या क्षेत्रात पुढे जायची वृत्ती असेल तर यशाचे दरवाजे तुमच्यासाठी नक्की उघडतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे सोनाली पाटील. होय, तीच सोनाली जी, वैजू नं. १ मध्ये मुख्य भूमिकेत झळकते आहे.
सोनाली हि प्रशिक्षित शिक्षिका. सिनियर कॉलेज मध्ये शिकवणारी. ती राजाराम कॉलेज मध्ये तीन वर्षे शिक्षिका म्हणून काम करत असे. तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं एम.बी.ए. पर्यंत. बी.एड. हि केलंय. शिक्षण घेता घेता, लहानपणापासून असलेली अभिनयाची आवड स्वस्थ बसू देईना. तिच्या आईचा तिच्या अभिनय करण्याला खंबीर पाठींबा होता आणि आहे. त्यात लहानाची मोठी कोल्हापूरच्या मातीत झालेली. कोल्हापूरची ओळख जशी झणझणीतपणासाठी आहे, तशीच कलाक्षेत्रातील योगदानासाठी सुद्धा. या मातीने अनेक कलाकार दिले. अनेक कलाकृती येथे चित्रित झाल्या आहेत. आपली आवड जोपासण्यासाठी ती लहान लहान नाटकांत काम करायाची.
पण शिक्षकी पेशा घेतला कि कामात सतत व्यस्तपणा आलाच. पण कितीही व्यस्त झाले तरी हि धावपळ सांभाळता सांभाळता, अभिनायची आवड जपायची हे तिच्या मनाने घेतलं. टीक टॉक वर बंदी येण्यापूर्वीचा काळ. तिनेही मग या सोशल प्लॅटफॉर्म वर आपले अभिनयाचे विडीयोज टाकायला सुरुवात केली. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. तसचं झालं. ती टीक टॉकवरचे विडीयोज करता करता संधी येत गेल्या. त्यातलं उल्लेखनीय काम म्हणजे ‘सुरं नवा, ध्यास नवा’ च्या जाहिरातीत केलेलं काम. मग आली तिची भूमिका असलेली ‘जुळता जुळता जुळतंय कि…’ हि मालिका. सध्या ती गाजतेय ते ‘वैजू नं. १’ साठी. यात तिची एकदम बिनधास्त भूमिका दाखवली आहे. प्रत्येक प्रॉब्लेम ला आहे सोल्युशन हि मालिकेची टॅगलाईन. त्यामुळे काही प्रॉब्लेम असो, वैजू आणि मालिकेतील बाकीच्या व्यक्तीरेखा काहीं न काही योग्य मार्ग काढतातच. टिक टॉकमुळे अनेक जण प्रसिद्ध झाले, पण थेट एखाद्या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारणारी ती एकमेव असावी बहुधा.
मनोरंजन क्षेत्रात येणं अनेकांचं स्वप्न असतं. पण प्रत्येक जण या क्षेत्रातील यश मिळवण्यासाठी धडपड करतोच असं नाही. पण सोनाली हिने ती केली. पारंपारिक पद्धतीने नाटक करता करता, टिक टॉक सारखं नवीन माध्यम तिने निवडलं होतं. ती आजही इंस्टाग्राम वर पोस्ट्स शेयर करतच असते आणि यात सहकलाकार सुद्धा सहभागी असतात. त्यामुळे मुख्य प्रवाहात काम करण्याची इच्छा होतीच, आणि मिळेल त्या योग्य संधी तिने घेतल्या. अर्थात एका मालिकेमुळे करियर पूर्ण झालं असं होत नाही, सोनालीला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण तिचं काम सुरु आहे, तिची घोडदौड अशीच सुरु राहील यात शंका नाही. अशा या मेहनती आणि स्मार्ट सोनाली ला येत्या काळासाठी मराठीगप्पा टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा ! (Author : Vighnesh Khale)