शाळा… कुणाच्या आयुष्यातील स्वप्नवत काळ तर कुणासाठी खडतर प्रवास… कुणासाठी आयुष्याच्या सुंदर इमारतीची पायाभरणी तर कुणासाठी भुसभुशीत जमीन. शालेय जीवनाचा काळ खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार देणारा. ते वयही तितकंच अवखळ. त्यामुळेच या वयात घडणाऱ्या गमतीजमती, आठवणीत मनात कायमच्या कोरल्या जातात. आयुष्याच्या या अद्भुत काळाचा ठेवा मनात रुतून राहतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कायम ताजे राहणारे हे क्षण. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या या शाळेच्या आठवणींचा हा पट असाच बोलका.. मात्र याच शाळेत फक्त शिक्षा होते… गुरुजी फटके देतात, मॅडम छडी मारतात, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्या असल्याच्या सुद्धा घटना आहे. अशातच आमच्याकडे एकदम सुंदर असा एक व्हिडिओ आला आहे. ग्रामीण भागात शाळा शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा प्रसंग नक्कीच पाहिला असेल त्यामुळे त्यांना हा व्हिडीओ पाहून शाळेच्या अनेक आठवणी जाग्या होतील तसेच शाळेतील असे अनेक अतरंगी नमुने आठवतील.
शाळेत शिक्षा म्हणून कोंबडा बनवणे, मुलींच्या शेजारी बसवणे आणि शेवटी खूप मार मिळणे, अशा शिक्षा होत्या. मग काही पोरं अभ्यास, शाळा आणि मास्तर या सगळ्या गोष्टींना कंटाळून शाळेत येत नसत… आणि कग या पोरांचीजी मजा यायची… ती भयंकर हसवणारी असायची. आता अशाच एका शाळेचा कंटाळा असणाऱ्या पोराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येते की, काही मुले आणि शिक्षणाचे महत्त्व समजलेल्या आईने एका मुलाला चक्क उचलबांगडी करून शाळेत आणले आहे.
बांगडी हा शब्द बाईशी तर उचलबांगडी हा शब्द शाळेशी निगडित आहे. अनेकांच्या शाळेतल्या दिवसात ‘एक ठराविक दांड्या मारणारा मुलगा आणि त्याची कायम घरच्यांनी नाहीतर विद्यार्थ्यांनी केलेली उचलबांगडी’ हे जणू समीकरणच झाले होते. अगदी घरापासून आपली शाळा फर्लांगभर अंतरावर असली तरीही त्या ठराविक मुलाला शाळेत जाण्याचा कंटाळा येणार म्हणजे येणारच. तास धरून चालणाऱ्या बैलानं मधेच शिवळं सांडून उभं राहावं तसा तीन चार दिवसातून एकदा का होईना हा कंटाळा असलेला मुलगा शाळेला दांडी मारून घरी राहणार म्हणजे राहणारच.
‘दांडी मारणे’ हा वाक्प्रचार एखाद्याच्या एवढा अंगवळणी पडलेला असतो की, मास्तरांनी अनेकदा छडीने मारूनही तो जाता जात नाही. एखाद्या मारक्या बैलानं नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्या माणसाकडे शिंगे रोखून पहावे तसे मास्तर शाळेत येणाऱ्या पोरांकडे छडी उगारून पाहायचे. अनेकदा शाळेला सुट्टी मारली की, त्या आळशी विद्यार्थ्याला घरी आणायला इतर विद्यार्थ्यांना पाठवणे, हे गुरुजींचे पहिले काम… आणि ‘त्याची उचलबांगडी करून आणा’ असा मास्तरचा असा हुकूम सुटताच दहा पोर सुसाट त्या आळशी घराकडं पळत सुटायचे. त्यांच्यात दोनचारजण तरी जाता येता मध्ये त्यांचे घर लागणारे असायचे.
आता एवढी पोरं आपल्याला न्यायला येणार, हे आधीच आळशी पोराला माहिती असायचं. त्यामुळे तो लपून बसायचा. पण ही त्याच्या लपण्याच्या जागा इतरांना हमखास माहीत असायच्या. बेसावध बसलेल्या कोंबडीला मांजरानं झडप घालून धरावं तसे ते आळशी धरायचे. तो कितीही आरडाओरड करू दे. पण त्या आठदहा पोरांपुढं त्याची ताकद कमी पडायची. दोघंचौघं पाय धरायचे, काही हात धरून झोळी करायचे.
मग तो आळशी पोरगा अंगात ताकद आणून उसळी मारणार, उचललेल्या अंगाची बांगडी करणार, अगदी ज्यांनी धरलं त्याच्या हाताला चावणार. पण हे सगळं व्यर्थ असायचं. अशाच एका पोराची उचलबांगडी करून पोरांनी शाळेत आणली आणि त्याचा व्हिडीओ कुणीतरी शूट केला… बर शूट करून थांबला नाही तर सोशल मीडियावर टाकला… आणि जे जे शाळा शिलकेत त्यांना सगळ्यांना हा प्रकार माहिती… विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना… उचलून आणलेल्या या आळशी पोराच्या देहाचं मुटकूळं विद्यार्थी आपल्या मास्तर समोर आणून टाकायचे आणि आपल्या जागेवर बसून ‘कधी एकदाचे मास्तर याला कुथावतात’ याची वाट पाहायचे. असाच हा व्हिडीओ पण आहे.
मुलं एकदा शाळेत जायला लागली की मग तर रोज शाळेतल्या मित्रमंडळींसोबतच्या तर कधी शिक्षकांबरोबरच्या गमतीजमती आपल्याला ऐकायला मिळतात. मूल मोठं होईल तसे आपले व्याप कमी होतील असं आपल्याला वाटत असतं, मात्र हे व्याप कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जातात. आणि अशाच एका उपद्व्याप करणारा मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. तसेच हा शाळेत नेण्याचा प्रकार अजूनही ग्रामीण भागात चालू आहे, याचेही भारी वाटेल.
बघा व्हिडीओ :