बचपन का प्यार हे सध्या एवढं ट्रेंडिंग होतंय की विचारता सोय नाही. एखादा व्हिडियो किती वायरल होऊ शकतो याचं नजीकच्या काळातलं सर्वोत्तम उदाहरण. याचं कारण, या व्हिडियोत असणारा मुलगा त्याच्या गाण्यामुळे एवढा लोकप्रिय झाला की नुकताच एका म्युझिक व्हिडियोत त्याचा समावेश करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायक, बादशाहा यांच्या म्युझिक व्हिडियोत हा चिमुकला झळकलेला दिसून आला. अवघ्या काही तासांतच या व्हिडियोच्या व्ह्यूज ची संख्या दहा लाखांच्या पार गेली होती. यावरून आपल्याला या प्रसिद्धीचा आवाका लक्षात यावा. अर्थात अल्पावधीत एवढी लोकप्रियता मिळवणारं हे निवडक उदाहरण असेल. पण याआधीही काही व्हिडियोज असे येऊन गेले आहेत ज्यांनी धमाल उडवून दिली होती. असाच एक जुना पण मनोरंजक व्हिडियो आपल्या टीमने आज पाहिला आहे. हा व्हिडियो अवघ्या एका मिनिटाचा आहे. एका अतिशय लहान मुलाने गायलेलं गाणं हा या व्हिडियोचा विषय. काही वर्षांपूर्वीचा व्हिडियो असला तरी यातील ताजेपणा आजही टिकून आहे.
हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा या व्हिडियोचा सुपरस्टार ठरलेला मुलगा समोरच उभा असलेला दिसून येतो. कॅमेऱ्यामागे असतात त्या त्याच्या शिक्षिका. या मुलाच्या गळ्यातील गोडवा त्यांनी हेरलेला असतो. तो या व्हिडियोत कैद व्हावा हा त्यांचा प्रयत्न असतो. याचसाठी म्हणून त्याने एक गाणं गावं यासाठी त्या आग्रही असतात. हे गाणं असतं ‘द ट्रेन’ या चित्रपटालं ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया’. जुनं तरीही अवीट गोडीचं हे गाणं. या मुलाच्या गोड आवाजाने ते अजून सुरेल वाटतं. पण असं असलं तरीही व्हिडियोच्या सुरुवातीला हा मुलगा काहीसा चिडलेला वाटतो. पण शिक्षेकेच्या आग्रहास्तव गात राहतो. पण मधेच त्याच्या काहीशा रागावलेपणाच कारण कळतं. त्याच्या दातात टॉफी अडकलेली असते त्यामुळे त्याला ती काढून टाकायची असते. पण शिक्षिका मात्र त्याने गाणं गाण्यावर ठाम असतात. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतं. कदाचित शाळा सुटायची वेळ असावी म्हणून त्यांची घाई चालली असावी. पण त्यांच्या या प्रयत्नांचं यश नक्कीच उत्तम म्हणावं लागेल. कारण एकंदर व्हिडियोत या मुलाचे गोड आणि निरागस सूर घुमत राहतात. अगदी व्हिडियो संपल्या नंतर ही हा व्हिडियो पुन्हा पुन्हा बघावा असं वाटून जातं.
ही सगळी किमया त्याच्या गोड गळ्याची. त्याचं गाणं आपल्याला एवढं आवडतं की त्याच्या विषयी अजून काही माहिती मिळते का हे आपण बघत असतो. त्यावर लक्षात येतं की या मुलाच्या नावाने आता एक युट्युब चॅनेल ही आहे. ‘TheJOYfulSinger’ असं त्याच्या चॅनेलचं नाव आहे. त्याचं नाव जॉय असल्याचं कळतं. तसेच या वायरल व्हिडियो पासून ते आजपर्यंतचा त्याचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो. त्यातही त्याने काही समारंभांमध्ये गायलेली गाणी सुद्धा ऐकण्याची संधी मिळते. तसेच हे सुद्धा कळतं की त्याच्या सुरेल गायकीसोबत तो एक उत्तम असा की बोर्ड प्लेयर म्हणूनही तयार होतो आहे. त्याने स्वतः वाजवलेली अनेक गाणी, कव्हर्स अनुभवायला मिळतात. सध्या केवळ सात वर्षांचा असणाऱ्या या मुलाने गेल्या काळात केलेली प्रगती खरंच स्पृहणीय आहे. त्याच्या या यशस्वी वाटचालीला आपल्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !! तसेच त्याच्या निरागस व्हिडियोमुळे आपलं जे मनोरंजन झालं त्यासाठी त्याचं खूप कौतुक. असाच मोठा होत जा बाळा. तुला खूप शुभाशीर्वाद.
आपणही या बाल कलाकाराचा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेल. तसेच आपल्या टीमने लिहिलेला लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळवायला विसरू नका. तसेच यानिमित्ताने आपले आभार मानावेसे वाटतात. वाचक म्हणून तुम्ही नेहमीच आमचं कौतुक करत असता. लेखही मोठ्या प्रमाणावर लेख शेअर करत असता. यातून आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्यास स्फूर्ती मिळते. तेव्हा येत्या काळातही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला सदैव मिळत राहो हीच सदिच्छा. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :