Breaking News
Home / मनोरंजन / शिक्षिका असावी तर अशी… हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील ह्या शिक्षिकेचे कौतुक कराल

शिक्षिका असावी तर अशी… हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील ह्या शिक्षिकेचे कौतुक कराल

बदल ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा दरवाजा कधी ना कधी तरी ठोठावते. एकदा नाही तर अनेकदा ठोठावते. प्रत्येकवेळी बदल करून घेण्याची आपली मनीषा असतेच असे नाही. पण बदल हे तसेही करावेच लागतात. पण काही जण मात्र हे बदल अगदी मोकळ्या विचारांनी अंगीकारतात. काही जण तर यापुढे जाऊन या बदलांचा वापर करत त्यांच्या समोर असलेल्या समस्यांचं निराकरण शोधतात. सोशल मीडियावर नीट बघितलं की अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर येतात. त्यांच्या कामाकडे बघून आपसूक आपली मान लवते आणि त्यांना मानाचा मुजरा ही केला जातो.

शिक्षण क्षेत्रातील असंच एक नावारूपास येत असलेलं उदाहरण म्हणजे उषा ढेरे या होत. बीड मधील ढेकणमोहा येथे उषाजी जिल्हा परिषदेच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या शाळेत त्या दाखल झाल्या तेव्हा पटावरील विद्यार्थी संख्या ही पाच ते दहा मुलांच्या आत असावी. अगदीच कमी पट संख्या असलेल्या शाळेस भविष्य ही तसे अवघडच असते. पण आजूबाजूला असलेल्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली तर मात्र यावर उपाय काढता येऊ शकतो हे त्यांनी ओळखलं. मग ही गोडी निर्माण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला. नवीन तंत्रज्ञान म्हणजे त्यांनी युट्युब या माध्यमाचा वापर करायला सुरुवात केली.

आपण व्हिडियो मध्ये दिसतोय म्हंटलं की मुलं ही आवडीने शिक्षणाकडे वळतील हा त्या मागचा एक मुख्य विचार असावा असं वाटतं. जो खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला दिसून येतो. कारण आज जवळपास चार ते पाच वर्षांनी उषाजींच्या शाळेतील पटाची संख्या वाढून ६० ते ७० च्या घरात असल्याचं कळतं. विविध प्रथितयश वृत्त संस्थानी दिलेल्या वृतांचा आधार घेतला असता ही माहिती मिळते. चार वर्षात (त्यातील दोन वर्षे कोविड-१९ची पकडली असता) ही वाढ खूप परिणामकारक आहे असं म्हणायला हवं. बरं केवळ एवढीच वाढ झालेली आहे का? तर हा उषाजींच्या यशाचा एक पैलू आहे. आजमितीला त्यांच्या चॅनेलला साडे चार लाखांहून अधिक सबसक्रयबर्स लाभले आहेत आणि १८ कोटींहून अधिक व्ह्यूज लाभले आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होते आहे हे ही नमूद करायला हवं. इतकंच काय तर अनेक परदेशी विद्यार्थी ही त्यांचे हे व्हिडियोज अगदी आवडीने बघतात असं कळतं. एवढ्या कमी काळात केवळ १ली ते १०वी शिक्षण हा विषय घेऊन ताईंनी केलेली ही प्रगती नक्कीच स्पृहणीय आहे. अर्थात त्यांच्या या प्रवासात त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांचा ही मोठा वाटा राहिलेला आहे.

या प्रवासात त्यांनी १७०० हुन अधिक व्हिडियोज बनवले आहेत. यात मराठी, इंग्रजी भाषेतील विविध कविता, गणित हे विषय प्रामुख्याने घेतले जातात. सोबतच या चिमुकल्यांचं वाचन ही सुधारावे म्हणून ही काही उपक्रम हाती घेतलेले आहेत. तसेच पुस्तकांसोबतच कृतीयुक्त शिक्षण द्यावं याकडे ही त्यांचा कल असतो. त्यातही कृतीयुक्त गीते हा विद्यार्थ्यांच्या आवडीचा प्रकार असल्याचं दिसून येतं. एवढंच काय आपल्या सारख्या मोठ्या वयाच्या व्यक्तींना ही हा प्रकार नक्कीच आवडून जातो. यात बहुधा उषाजी या वर्गात मध्यभागी उभ्या असतात आणि मुलंमुली आजूबाजूला रिंगण करून उभी असतात. मग उषाजी एक गाणं म्हणतात आणि मुलंमुली त्यांना त्यात साथ देतात. यात शब्दांनुसार कृतींवर ही भर दिला जातो. यातील एक व्हिडियो आपल्या टीमच्या ही बघण्यात आला. किंबहुना तो बघूनच उषाजींचं हे उत्तम कार्य बघता आलं. त्यांच्या या कार्याचा आढावा घेताना त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत हे लक्षात आलं. तसेच त्या एक उत्तम कवयित्री आहेत आणि ‘ऐसा घडवू बालक’ हा त्यांचा काव्यसंग्रह ही प्रकाशित झाल्याचं कळलं. एकूणच काय तर उषाजी या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या शिक्षिका आहेत हे यानिमित्ताने समोर आलं.

त्यांच्या कामाचा आवाका आणि त्याचा पडत असलेला सकारात्मक प्रभाव बघता, त्यांच्याविषयी आपल्या वाचकांना कळलं पाहिजे असं मनापासून वाटलं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. यानिमित्ताने उषाजी आणि त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी या सगळ्यांना आमच्या टीमकडून मानाचा मुजरा ! तसेच त्यांच्या पूढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.