सध्या एका अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा चालू असलेली दिसून येते. तिची एक मालिका चालू असून तिचा एक नवीन चित्रपट ही प्रसिद्ध झाला आहे. तसेच येत्या काळातही या अभिनेत्रीच्या नवनवीन कलाकृतींची मेजवानी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेच. तसेच नुकताच तिचा वाढदिवसही झाला. या निमित्ताने तिच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न आमच्या टीमने केला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सायली संजीव हिच्या विषयी. सध्या तिने अभिनित केलेला ‘बस्ता’ हा चित्रपट गाजतो आहे. तसेच त्यातील गाणीही गाजताहेत. गेल्या काही काळात नव्याने दाखल झालेल्या मालिकांपैकी एका मालिकेत – शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून – सायली आपल्याला मालिका विश्वात पुन्हा नव्याने दिसली.
तिच्या मालिका विश्वातील कारकिर्दीची सुरुवात ही ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून झाली होती. या मालिकेतील ‘शिव आणि गौरी’ या व्यक्तिरेखांना प्रेक्षकपसंती मिळाली होती. या सुप्रसिद्ध मालिकेनंतर सायली ने काही मराठी तर काही हिंदी मालिकांतून अभिनय केला. ‘परफेक्ट पती’ ही तिची हिंदी मालिका. मालिका क्षेत्रात यश मिळवत असताना तिने सिनेमातूनही स्वतःचं असं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं. तिने अभिनित केलेल्या चित्रपटांच्या नावावरून तुम्हाला याची कल्पना यावी. गोष्ट एका पैठणीची, AB आणि CD, मन फकिरा, आटपाडी नाईट्स, सातारचा सलमान हे तिने अभिनित केलेले काही चित्रपट. येत्या काळात तिचे अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित होतील. चित्रपटांसोबतच तिने वेब सिरीजमध्येही काम केलेलं आहे. यु टर्न (U Turn) असं त्या वेब सिरीजचं नाव आहे. तसेच ‘घरोघरी’ या वेबसिरीज च्या एका एपिसोड मध्ये ती सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्यासोबत झळकली होती. अभिनयासोबतच सायली हिचा रा’जकारण हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तिने महाविद्यालयीन जीवनात पॉलिटिकल सायन्स मध्ये पदविका संपादन केलेली होती. या विषयी तिला असणारा जिव्हाळा आणि आवड तिच्या अनेक मुलाखतींमधून झळकते.
राजकारणासोबतच सायली हिला चित्रकलेची उत्तम आवड आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्ट मधून गणपती बाप्पासाठी सजावट करताना ती कधी कधी दिसते. या सगळ्यांतून वेळात वेळ काढून ती कटाक्षाने स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देते. आरोग्य उत्तम राहावं यासाठी तिने योगाभ्यासाचा मार्ग निवडलेला दिसतो. कलाक्षेत्रात दाखल झाल्यापासून सायली हिने सातत्याने विविध कलाकृतींतून अभिनय केलेला आहे आणि प्रेक्षकांना आनंद दिलेला आहे. येत्या काळातही तिच्या नवनवीन कलाकृती आपल्या भेटीस येतील. त्यातील अनेक चित्रपट असतील असं दिसतं. आजतागायत सायली ने कमी काळात सातत्याने खूप उत्तम काम केलेलं आहे. येत्या काळातही वैविध्यपूर्ण कलाकृतींतून ती तिच्या चाहत्यांना आनंद देत राहील हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !