मालिका, सिनेमा, नाटक, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स आणि कित्येक माध्यमांनी आपलं मनोरंजन विश्व नटलेलं आहे. या प्रत्येक माध्यमातून आलेल्या विविध कलाकृती आपलं सातत्याने मनोरंजन करत असतात. पण त्यातही काही कलाकृती आपल्या मनात खास असं स्थान मिळवून जातात. किंबहुना हे स्थान इतकं खास असतं की त्यातील बदल हे नेहमीच आपल्या चर्चांचा विषय बनत असतात. त्यातले काही बदल हे अपेक्षित असतात तर काही अनपेक्षित असतात. यातील अनपेक्षित बदलांनी त्या कलाकृतींच्या चाहत्यांना धक्का हा जरा जास्तच बसतो. त्यातही हे बदल जर मध्यवर्ती व्यक्तिरेखेविषयी असतील तर मग हे बदल पचवणं थोडं कठीण ही असतं. हे बदल कालपरत्वे पचवले जातात पण त्यासही वेळ लागतोच. कारण एखाद्या कलाकाराला त्या त्या व्यक्तिरेखेत बघण्याची सवय झालेली असते.
सध्या अशीच अवस्था रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या बाबतीत प्रेक्षकांची झाली आहे. या मालिकेने आजतागायत प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन केलेलं आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षक हे या मालिकेचे आणि पर्यायाने यातील प्रत्येक व्यक्तीरेखेच्या प्रेमात पडले आहेत असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. त्यातही अण्णा नाईक आणि शेवंता या जोडीने तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. इतकं की या व्यक्तिरेखांच्या नावाने असंख्य मिम्स बनले, त्यांच्यावर काही प्रहसन झाली आणि बरंच प्रेम केलं ते ही हक्काने.
या दोन्ही व्यक्तिरेखा साकार करणारे अनुक्रमे माधव अभ्यंकर आणि अपूर्वा नेमळेकर यांनी या व्यक्तिरेखा लोकप्रिय केल्या आहेत. त्यामुळे रात्रीस खेळ चाले आणि या उत्तम कलाकारांच्या दोन व्यक्तिरेखा हे एक ठाम समीकरणच तयार झालं होतं. पण गेल्या काही दिवसांत या समीकरणात एक मोठा बदल होताना दिसून आला आहे. हा बदल म्हणजे अपूर्वा नेमळेकर यांनी या मालिकेतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय होय. त्यांनी हा निर्णय का घेतला असावा याविषयी त्यांच्या आणि ‘शेवंता’ व्यक्तिरेखेच्या चाहत्यांमध्ये प्रश्नचिन्ह होतं. प्रेक्षकांच्या या प्रश्नाला अपूर्वा यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून उत्तर दिलं. त्यांनी या सोशल मीडिया पोस्ट मधून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात अपूर्वा यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी भूमिकेसाठी वजन वाढवले होते. पण वजन वाढवल्यानंतर काही जेष्ठ आणि काही नवख्या कलाकारांकडून त्यांची थट्टा करण्यात आली असं त्या म्हणतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार यातील थट्टा ही जिव्हारी लागणारी होती असं त्या नमूद करतात. यावर वरिष्ठांडून कार्यवाही झाली असली तरी नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरी ही व्यक्त न केल्याचं त्या नमूद करतात.
तसेच या मालिकेच्या आधीच्या पर्वासाठी त्या मुंबईहून शूटिंग लोकेशन जे कोकणात आहे तेथे प्रवास करत असत. पण त्यातही एका महिन्यात केवळ काही दिवसच शूटिंग होत असे आणि बाकीचा बराच काळ त्यांना थांबून राहावं लागे यामध्ये त्यांचा एकूणच महिनाभराचा काळ वाया जात असे असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच याविषयी तक्रार केली असता वरिष्ठांनी काही आश्वासने दिली पण अद्याप पाळली नाहीत असंही त्या या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हणतात. एकूणच काय, तर अपूर्वा यांनी आपली बाजू या सोशल मीडिया पोस्टमधून मांडली आहे. यावर चाहत्यांच्या ही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातील त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांचेही अपूर्वा यांनी आपल्या दुसऱ्या एका सोशल मीडिया पोस्ट मधून आभार मानले आहेत. सध्या या प्रकारावर या मालिकेचं प्रोडक्शन हाऊस तसेच वाहिनीकडून काहीही म्हणणं मांडण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या बाजूचं म्हणणं अजूनही प्रेक्षकांसमोर येणं बाकी आहे. असो. सध्या पर्यंत जो काही प्रकार झाला आहे तो आमच्या टीमने आपल्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात कोणाचीही बाजू न घेता जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे त्याविषयी केवळ माहिती देण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न आहे याची सुज्ञ वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. अपूर्वाने मालिका का सोडली ह्यासंदर्भात तिने शेअर केलेल्या पोस्ट्स आम्ही खाली देत आहोत.
सध्या या मालिकेत कृतिका तुळसकर यांनी शेवंता ही व्यक्तिरेखा साकार करण्यास सुरुवात केली आहे. कृतिका यांच्या पाठी विविध माध्यमातून आणि कलाकृतींतुन अभिनय करण्याचा अनुभव गाठीशी आहे. पाशबंध, बिलाँगिग्ज, विजेता, बबन, बॉयझ, हैदराबाद कास्टडी, आयुर्वेदम अशा विविध सिनेमांतून त्यांनी अभिनय केलेला आहे. त्यातील काही व्यावसायिक सिनेमे असून काही शॉर्ट फिल्मसही आहेत. तसेच उलटसुलट या गाजलेल्या नाटकांतूनही त्यांनी समर्थपणे अभिनय केलेला आहे. तसेच त्यांनी काही कार्यक्रमांचं सूत्रसंचालन ही केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण कारकिर्दीचा अनुभव त्या शेवंता या व्यक्तिरेखा साकार करण्यासाठी वापरतील हे नक्की. अर्थात त्या साकार करत असलेली ही व्यक्तीरेखा आधीच लोकप्रिय असल्याने प्रेक्षक त्यांना किती चट्कन या व्यक्तिरेखेत स्वीकारतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. असो.
तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!