Breaking News
Home / मराठी तडका / श्रीमंता घरची सून मालिकेतील कलाकारांची खरी नावे आणि त्यांच्याविषयी जाणून घ्या

श्रीमंता घरची सून मालिकेतील कलाकारांची खरी नावे आणि त्यांच्याविषयी जाणून घ्या

अनलॉक सुरू झाल्यानंतर नवनवीन मालिका प्रेक्षाकांच्या भेटीस आल्या. त्यातील कलाकारांची ओळख मराठी गप्पाच्या माध्यमांतून सातत्याने वाचकांना होतंच असते. आजच्या लेखातून आपण श्रीमंता घरची सून या मालिकेतील कलाकारांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत.

रुपल नंद
रुपल नंद हिला आपण अनेक उत्तमोत्तम भूमिकांसाठी ओळखतो. पेशाने डॉक्टर असणाऱ्या रुपल हिने एकांकिकांमधून अभिनय प्रवासाला सुरुवात केली. पुढे मालिकांमधून तिने काम करणं सुरू केलं. या क्षेत्रातली, गोठ ही तिची पहिली मालिका. त्यांनतर तिने फुलपाखरु, आनंदी हे जग सारे या मालिकांतून भूमिका केल्या आहेत. यांतील काही मालिकांमध्ये यशोमान आपटे हा तिचा सहकलाकार राहिलेला आहे. या मालिकेत तिने अनन्या ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे.

(फोटोत : रूपात नंद आणि यशोमान आपटे)

यशोमान आपटे
यशोमानचं नाव घेतलं की त्याने केलेली कामं हमखास आठवतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की शाळेत असे पर्यंत त्याने कधीही अभिनय केला नव्हता. अगदी घरी कलेसाठी पोषक वातावरण असताना. पण महाविद्यालयात आल्यावर मात्र त्याने स्वतःला या क्षेत्रात झोकून दिलं. अनेक एकांकिका स्पर्धांमधून त्याने भाग घेतला आणि पारितोषिकं मिळवली. अगदी मुंबई युनिव्हर्सिटीची पारितोषिकं ही मिळवली. बी.पी. या नाटकातही तो होता. पुढे फुलपाखरू ही मालिका आली आणि त्याच्या लोकप्रियतेत भर पडली. नुकताच त्याने सिंगिंग स्टार या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. गाण्याचं कोणतंही प्रशिक्षण नसतानाही उत्तम गायकीच्या जोरावर त्याने या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. श्रीमंता घरची सून या मालिकेतील अथर्व या नायकाची भूमिका त्याने साकार केली आहे.

ऐश्वर्या नारकर
ऐश्वर्याजींचं नाव उच्चारलं की उत्तम अभिनय हे ओघाने आलंच. त्यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम प्रकारे व्यक्तिरेखा साकारून भूमिका जिवंत केल्या आहेत. त्यांनी विविध माध्यमांतून काम केलेलं आहे. नजीकच्या काळातली त्यांनी साकारलेली पेशवीण बाई ही स्वामिनी मधील व्यक्तिरेखा प्रेक्षकपसंतीस उतरली आहे. तसेच त्यांनी केलेल्या ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. या नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका साकारलेली आहे. ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत त्यांनी अथर्व ची आई आणि अनन्या ची सासू ही व्यक्तीरेखा साकारली आहे.

(फोटोत : ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर)

अविनाश नारकर
अविनाशजींचं नाव घेतलं की आठवतं ते त्यांचं रणांगण या नाट्यकृतीतलं अफलातून काम. त्यांची पल्लेदार वाक्य उद्धृत करण्याची पद्धत प्रेक्षकांना मोहवून टाकते. मालिका, नाटकं यातून त्यांनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. त्यांच्या अभिनयाने अनेक नावाजलेल्या कलाकृती नटल्या आहेत. त्यांनी ऐश्वर्याजीं सोबत अनेक नाट्यकृतींत अभिनय केलेला आहे. ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेतही दोघांनी नवरा बायकोची भूमिका साकारली आहे. अथर्व चे वडील म्हणजे अशोक ही ती भूमिका आहे.

फाल्गुनी राजनी
भाभीजी घर पे है मालिकेतील गुल्फाम कली म्हणजे फाल्गुनी राजनीजी. प्रत्येक कलाकाराला एखादी भूमिका अशी मिळते, जी त्या कलाकाराची ओळख बनून जाते. फाल्गुनी यांच्यासाठी गुल्फाम कली ही ती व्यक्तिरेखा आहे. या मालिकेसोबतच त्यांनी बडे दूर से आये है, सुहानी या मालिकांतूनही कामे केली आहेत. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. मालिकांमध्ये येण्याआधी बराच काळ, त्या रंगमंचावर कार्यरत होत्या. तसेच त्यांनी शॉर्ट फिल्म्स मधूनही अभिनय केलेला आहे. सध्या ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत त्यांनी देविका हे मुख्य खल पात्र साकारलं आहे.

(फोटोत : फाल्गुनी राजनी आणि श्रीरंग देशमुख)

श्रीरंग देशमुख
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, डबिंग आर्टिस्ट ही ओळख असलेला मराठी मनोरंजन क्षेत्रातील चेहरा म्हणजे श्रीरंग देशमुख. अनेक मालिकांतील सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका त्यांनी अगदी सहजतेने साकारल्या आहेत. सिनेमांतूनही ते सदैव कार्यरत राहिलेले आहेत. इतकंच काय त्यांनी स्वतः आपल्या कुटुंबासमवेत सिनेमा निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलेलं होतं. त्या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलेलं होतं. नाटकांतूनही त्यांनी विपुल काम केलेलं आहे. डबिंग आर्टिट्स म्हणून त्यांनी अनेक गाजलेल्या प्रोजेक्ट्स ना आपला आवाज बहाल केलेला आहे. श्रीमंता घरची सून या मालिकेत त्यांनी देविकाचा नवरा ही भूमिका साकारली आहे.

मानसी मोहिले
मानसीला आपण काहे दिया परदेस, साजणा अशा अनेक मालिकांतून पाहिलं आहेच. काहे दिया परदेस मधील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. तिने आपल्या कारकिर्दीत दूरदर्शनवरील कालाकृतींतही अभिनय केलेला आहे. सध्या ‘श्रीमंता घरची सून’ मध्ये सिमरन ही खल भूमिका ती वठवते आहे. अभिनयासोबतच ती उत्तम नृत्यांगना आणि डबिंग आर्टिस्टही आहे.

(फोटोत : मानसी मोहिले आणि सिद्धेश प्रभाकर)

सिद्धेश प्रभाकर
सिद्धेश हा नाटक, सिनेमा, मालिका यांतून सातत्याने आपल्या समोर येणारा कलाकार आहे. श्रीमंता घरची सून या मालिकेत त्याने रोहन ही भूमिका साकारली आहे. याआधी तो अग्निहोत्र २, दुहेरी या मालिकांतून दिसला होता. तसेच त्याने गोल गोल गरा गरा या सिनेमात काम केलेलं आहे.

ऋतुराज फडके
अनेक उदयोन्मुख कलाकारांमध्ये ज्याचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असा ऋतुराज आहे. त्याचे नातेवाईक रंगभूमीशी निगडीत होते. पुढे तोही रंगभूमीशी जोडला गेला. अनेक नाटकांतून त्याने अभिनय केला. अनेक दिग्गजांसोबत रंगमंचावर त्याला वावरता आलं. नटसम्राट सारख्या नाटकांत तो होता. पुढे या अनुभवाचा फायदा त्याने मालिका आणि सिनेमात करून घेतला. सर्व माध्यमांतून त्याने सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. राजा शिवछत्रपती या मालिकेत तो होता. पूढे कृपासिंधु, आंबट गोड अशा अनेक मालिकांतून त्याने वैविध्यपूर्ण काम केलं. त्यामूळे त्याच्या अभिनयाला एक वेगळीच झळाळी आहे. श्रीमंता घरची सून या मालिकेत त्याने आशिष ही भूमिका साकार केली आहे.

(फोटोत : ऋतुराज फडके आणि सिद्धेश म्हशीलकर)

सुदेश म्हशीलकर
सुदेश म्हशीलकर यांना आपण सातत्याने अनेक वर्षे नाटक आणि मालिकांतून पाहिलेलं आहे. घाडगे अँड सून, नकळत सारे घडले,सावित्री ज्योती आभाळा एवढी माणसं होती या त्यांच्या गाजलेल्या मालिका. मालिकांसोबतच त्यांनी रंगमंचावरही उत्तम काम केलेलं आहे. अंग ऐकलंस का हे त्यांचं नजीकच्या काळातलं नाटक. श्रीमंता घरची सून या मालिकेत त्यांनी श्रीयुत धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा वठवली आहे.

केतकी पालव
एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणजे केतकी पालव. आपण केतकी हिला अनेक उत्तमोत्तम कलाकृतींच्या माध्यमातून कला सादर करताना पाहिलं आहे. श्रावण बाळ रॉकस्टार, ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमांतून ती सातत्याने टीव्हीच्या पडद्यावर कार्यरत राहिली आहे. तसेच तिने नाटकांतून ही उत्तम अभिनय साकारला आहे. संगीत देवबाभळी या नाटकात तिने महत्वपूर्ण भूमिका साकार केली होती.

(फोटोत : केतकी पालव आणि मुग्धा गोडबोले रानडे)

मुग्धा गोडबोले रानडे
मुग्धाजींना आपण अनेक मालिका, नाटकं यांतून अभिनय करताना अनुभवलं आहेच. एक संवेदनशील अभिनेत्री असण्यासोबतच त्या तितक्याच संवेदनशील लेखिकाही आहेत. त्यांनी अभिनित केलेल्या मालिकांची यादी जशी मोठी आहे तशीच त्यांनी संवाद लेखन केलेल्या मालिकांचीही. १०० डेज, होणार सून मी ह्या घरची या सुप्रसिद्ध मालिकांसाठी त्यांनी संवाद लेखन केलेलं आहे.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.