Breaking News
Home / मराठी तडका / श्रीमंता घरची सून मालिकेतील हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण, लोकप्रिय चित्रपटात केले आहे काम

श्रीमंता घरची सून मालिकेतील हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण, लोकप्रिय चित्रपटात केले आहे काम

गेल्या काही दिवसांपासून, एका मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली होती. त्या प्रोमोज मधले चुरचुरीत आणि नेमके संवाद प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनले होते. मालिकाही अशीच मनोरंजक असावी अशी अपेक्षा होती आणि सध्या ती अपेक्षा पूर्ण होताना दिसतेय. या मालिकेचं नाव आहे ‘श्रीमंता घरची सून’. या मालिकेतून रूपल नंद आणि यशोमान आपटे हे कलाकार आपल्याला पुन्हा एकदा या मालिकेच्यानिमित्ताने नायक आणि नायिका म्हणून भेटायला आले आहे. आज या लेखाच्या निमित्ताने या कलाकारद्वयी मधील रुपल नंद हिच्या अभिनय कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न मराठी गप्पाची टीम करते आहे.

रुपलचा जन्म पुण्यातला. तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं ते पुण्यातून. तिने फिजियोथेरपिस्ट म्हणून शिक्षण पूर्ण केलं आहे. हे शिक्षण पूर्ण करत असताना तिचं अनेक एकांकिकांमधून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. अनेक स्पर्धांमध्ये ती भाग घेत असे. खरं तर याकाळात तिचा ओढा अभ्यासाकडे जरा जास्त होता होता. पण सोबत तिने कलाक्षेत्राशी जुळवलेली नाळ तोडू नये असं तिच्या पालकांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी तिला सदैव प्रोत्साहन दिलं. तिला स्वतःला असलेली अभिनयाची आवड आणि मिळत असलेलं प्रोत्साहन यांच्यामुळे तिने नाटकातून काम करत राहण्याचा निर्णय घेतला होता. सोबत तिने २०१३ साली महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा.श्रावण क्वीन या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे बेस्ट पर्सनॅलिटी या किताबाने तिला सन्मानित करण्यात आलं. या पुढच्या काळात तिने प्रेक्षकांच्या आवडीची अशी एक सिनेमा सिरीज केली. हि सिरीज म्हणजे ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हि होय. यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात तिने मुक्ता बर्वे यांच्या लहान बहिणीची व्यक्तिरेखा साकारली होती.

याच सोबत तिला, एका मालिकेच्या ऑडिशनबद्दल कळलं आणि तिने सहज म्हणून ऑडिशन दिली. त्यात तीची निवडही झाली. हीच तिची पहिली मालिका, जिने तिला महाराष्ट्राच्या घराघरात नायिका म्हणून ओळख मिळवून दिली. ‘गोठ’ असं या मालिकेचं नाव. यातील ‘राधा’ हि मुख्य व्यक्तिरेखा तिने साकारली होती. सोबत विलास हि नायकाची भूमिका साकारली होती समीर परांजपे ह्याने. हि मालिका काही वर्षे चालली. यातील रुपलच्या व्यक्तिरेखेचं खूप कौतुक झालं. पुढे तिने ‘फुलपाखरू’ हि मालिका केली. यातील रेवती हि व्यक्तिरेखा तिच्या वाट्याला आली. तिने या भूमिकेतही स्वतःची अशी छाप सोडली. हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका होत्या. या नंतर आलेल्या अजून एका मालिकेत यशोमान आणि रूपल यांनी एकत्र काम केलं. ‘आनंदी’ असं या मालिकेचं नाव. या मालिकेत ‘आनंदी’ या विशेष मुलीची मोठ्या वयाची भूमिका रूपल हिने निभावली. या भूमिकेसाठी तिने तिचा अभिनय कारकीर्दीचा संपूर्ण अनुभव पणाला लावला. त्यामुळे तिचं या भूमिकेचंही कौतुक झालंच.

या मालिकेनंतर तिची सध्याची मालिका सुरु झाली, ती म्हणजे ‘श्रीमंता घरची सून’. या मालिकेत शांत, सुस्वभावी पण त्याचसोबत वाक्चातुर्य असणारी अशी अनन्या हि व्यक्तिरेखा रूपल साकारते आहे. या मालिकेच्या निमित्ताने सासूची बाजू घेणारी सून आपल्याला दिसणार आहे. अजूनही या मालिकेचे सुरुवातीचे दिवस असल्याने या मालिकेची कथा अजूनही उलगडते आहे. मालिकांसोबतच तिने एक शॉर्ट फिल्मही केली आहे. ‘ब्लाइंड व्हिजन’ असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. रूपल हिचा अभिनय प्रवास हा एकांकिकांतून सुरु होऊन आजतागायत मालिका आणि सिनेमे करत अखंडपणे चालू आहे. तसेच विविध भूमिका करण्याकडेही तिचा कल दिसून येतो. तिचा एकंदर अभिनय प्रवास पाहता, तिने अभिनित केलेली प्रत्येक कलाकृती हि लोकप्रिय ठरली आहे. तसेच तिच्या स्वतःच्या व्यक्तिरेखाही प्रेक्षकांकडून वाखाणल्या गेल्या आहेत. यांमुळे ‘श्रीमंता घरची सून‘ हि मालिका आणि रूपल सकारात असलेली, ‘अनन्या’ लोकप्रिय होणार हे निश्चित. तिच्या यशाचा हा सिलसिला या मालिकेप्रमाणेच येत्या कलाकृतींमध्येही सुरु राहो हि मराठी गप्पाच्या टीमकडून रूपल हिला शुभेच्छा !

आपण हा लेख वाचलात त्याबद्दल धन्यवाद. या लेखात समीर परांजपे या गुणी अभिनेत्याचा उल्लेख झाला आहे. त्याने गोठ या सुप्रसिद्ध मालिकेत विश्वास हि नायकाची भूमिका साकारली होती. त्याच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख काही काळापूर्वी मराठी गप्पावर प्रसिद्ध झाला होता. आपण तो लेख वाचला असल्यास उत्तम. पण नसेल वाचला किंवा पुन्हा वाचायचा असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर आपण करू शकता. त्या सर्च ऑप्शन मध्ये जाउन समीर परांजपे असं लिहून सर्च केल्यास समीर च्या कारकिर्दीची थोडक्यात माहिती देणारा लेख आपल्याला मिळेल. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *