मराठी चित्रपटातील विषय गेल्या अनेक वर्षात बदलत गेले आहेत. गेल्या काही वर्षांत तर हि प्रक्रिया अजून वेगाने होताना दिसते आहे. मराठी प्रेक्षकांची मनोरंजनाची दृष्टी हळू हळू ग्लोबल होतेय, हे याचं कारण. आणि काही कलाकार आणि निर्माते यात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यातलंच एक आघाडीचं नाव म्हणजे श्रेयस तळपदे. बाजी, सनई चौघडे, पोष्टर बॉईज सारखे नेहमीच्या मांडणीला छेद देणारे चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. यातील बाजी मध्ये तर त्यांनी एका सुपरहिरोची भूमिका वठवली होती आणि इतर दोन चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. तसचं हिंदी सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाने, इक़्बाल, गोलमाल रिटर्न्स यांसारखे दर्जेदार आणि लोकप्रिय चित्रपट केले आहेत. त्यांच्या या वाटचालीत त्यांना खंबीरपणे साथ दिली आहे ती त्यांच्या पत्नी दीप्ती तळपदे यांनी. त्या पेशाने सायकीयाट्रीस्ट आहेत. या दोघांचं लव मॅरेज. आणि प्रत्येक लव मॅरेजला असतो तसा एक मस्त किस्सा सुद्धा आहे. वाचा तर मग.
झालं असं होतं कि श्रेयस यांनी १९९८ च्या आसपास म्हणजे अगदी तरुण वयात टेलीविजनवर काम करायला सुरुवात केली होती. ते प्रसिद्ध झाले होते. त्याचदरम्यान म्हणजे अंदाजे २००० च्या आसपास दिप्तीजी कॉलेज मध्ये शिकत होत्या. त्यांच्या कॉलेजमध्ये एक समारंभ आयोजित केलेला होता ज्यात श्रेयस यांना सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आमंत्रण द्यायचं होतं. हि जबाबदारी येऊन पडली दिप्तीजींवर. दिप्तीजींनी त्याप्रमाणे श्रेयस यांना आमंत्रण नेऊन दिलं. पण श्रेयस यांनी जसं आमंत्रण स्वीकारलं तसचं दीप्ती यांना पाहताच क्षणी त्यांना पसंत केलं होतं. यथावकाश कॉलेजचा कार्यक्रम झाला आणि पुढच्या अवघ्या चार दिवसांत श्रेयस यांनी दीप्ती यांना मागणी घातली. एक सेलिब्रिटी आपल्याला मागणी घालतोय म्हंटल्यावर कोणतीही मुलगी हरखून जाऊन पट्कन हो म्हणाली असती.
पण दिप्तीजींनी स्वतःला वेळ द्यायचं ठरवलं. पण ओळख मात्र रहावी असं त्यांना वाटत असावं कारण श्रेयस आणि त्यांच्यात त्या कार्यक्रमानंतरही बोलणं चालू होतं. श्रेयस यांनी दीप्ती यांना भेटायला शिवाजी मंदिरला बोलावलं, त्या तिथे गेल्या आणि किस्सा घडला. श्रेयसजी वेळेच्या आधी तिथे पोहोचले आणि दिप्तीजी सुद्धा आल्या. पण श्रेयसजींना पटकन आठवेना याच त्या दीप्ती का कि ज्यांना आपण प्रपोज केलं होतं. शेवटी दीप्ती यांनी हाथ दाखवल्यावर त्यांच्या लक्षात आलं कि हीच ती मुलगी. आजही या मुद्द्यावर दिप्तीजी, श्रेयस यांना कोपरखळी मारत असतात, त्यांची मजा घेत असतात. पुढे काळानुरूप त्यांची मैत्री पुढे घट्ट होत गेली आणि एका सुमुहूर्तावर त्यांचा विवाह झाला. आज त्यांना आद्या नावाची एक गोंडस मुलगी आहे.
दीप्ती या पेशाने सायकियाट्रीस्ट आहेतच आणि त्याचबरोबर त्या श्रेयस यांना त्यांच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातही मदत करत असतात. अभिनेता ते निर्माता या श्रेयस यांच्या प्रवासात दीप्ती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. आयुष्यात एवढ्या वर्षात चढउताराचे क्षण नक्की आले असतील पण आजही हि दोन गोड माणसं एकमेकांना साथ देत, हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य मनमुराद जगताहेत. नवनवीन प्रयोग करताहेत. श्रेयसजींनी वॉइस ओवर क्षेत्रात काम करताना, मागील वर्षी आलेल्या लायन किंग मध्ये टीमोन या लोकप्रिय पात्राचं हिंदी डबिंग केलं होतं. येत्या काळात अभिनेता म्हणून आणि दोघांकडून निर्माते म्हणून प्रेक्षकांना आणि खासकरून मराठी प्रेक्षकांना नवनवीन प्रयोग सिनेमा क्षेत्रात पहायला मिळतील यात शंका नाही. या जोडीच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना टीम मराठी गप्पाकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)