Breaking News
Home / मराठी तडका / सई ताम्हणकरने दसऱ्यानिमित्त सुरू केला नवीन व्यवसाय, बघा कोणता तो

सई ताम्हणकरने दसऱ्यानिमित्त सुरू केला नवीन व्यवसाय, बघा कोणता तो

दसरा. एक असा सण, ज्या दिवशी अनेक शुभ कार्यांची सुरुवात केली जाते. आपल्या मनातील अनेक गोष्टी आपण या साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी घरी आणतो. अगदी कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात करायला दसरा हा एक उत्तम दिवस मानला गेला आहे. अशीच एका नवीन व्यवसायाची सुरूवात एका मराठी सेलिब्रिटीने केली आहे. त्या सेलिब्रिटीचं नाव आहे सई ताम्हणकर. सईला आपण तिच्या अनेक सिनेमांसाठी ओळखतो. तसेच, सध्या सोनी मराठी वाहिनीवर चालू असलेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात जज म्हणूनही पाहतो आहोत. मराठी आणि हिंदी सिनेक्षेत्रातली एक आघाडीची कलाकार म्हणजे सई. अशी ही सिनेकलाकार आता एका नवीन व्यवसायात उतरली आहे. चला तर आजच्या लेखात तिच्या नवीन व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.

सईने उत्तम प्रतीच्या साड्यांचा एक ब्रँड आपल्या भेटीस आणला आहे. द सारी स्टोरी (The Saree स्टोरी) असं या ब्रँडचं नामकरण तिने केलेलं आहे. तिची कॉलेजमधली जिवलग मैत्रीण असणाऱ्या श्रुती भोसले यांच्या सोबत हा ब्रँड तिने निर्माण केला आहे. गेले काही दिवस, सईने सोशल मिडिया वरती नवनवीन पोस्ट टाकून काहीतरी नवीन येणार आहे याची नांदी दिली होतीच. तिच्या चाहत्यांनाही याची उत्कंठा लागली होती. ती यानिमित्ताने फळास आली. सई च्या चाहत्यांनी तिच्या या नवीन व्यवसायासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत अनेक सेलिब्रिटीजनी सुद्धा तिचं कौतुक केलं आहे. यात प्रामुख्याने अमृता खानविलकर, पर्ण पेठे, सोनाली कुलकर्णी, गिरीजा ओक गोडबोले, सखील परचुरे या मराठमोळ्या नायिकांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूड मधील मिस मालिनी आणि क्रीती सॅनन यांनीसुद्धा सईला तिच्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सईच्या या ब्रँडचा लोगो हा गुलाब फुलाची पार्श्वभूमी असलेला आहे आणि त्यावर The Saree Story असं वळणदार अक्षरांत लिहिलेलं आहे. तसेच यासाठी वापरलेली रंगसंगती ही एकमेकांना शोभून दिसते. या सगळ्यांमुळे, या नवीन ब्रँडची प्रतिमा ग्राहकांच्या मनात ठसते हे नक्की. साड्या किंवा वस्त्र प्रावरणं या व्यवसायात सईने नव्याने पाऊल टाकलं आहे. याआधी निवेदिताजी सराफ आणि तेजस्विनी पंडित व अभिज्ञा भावे यांचेही अनुक्रमे ‘हंसगामिनी’ आणि ‘तेजाज्ञा’ हे ब्रँड्स आपल्या भेटीस आले आहेतच. या दसऱ्याच्या निमित्ताने व्यवसाय क्षेत्रात अजून एक मराठी पाऊल दिमाखात पुढे पडते आहे याचा मराठी गप्पाच्या टीमला सार्थ अभिमान आहे. यापूर्वीही मराठी कलाकारांच्या व्यवसायाची, युट्युब चॅनेल्सची माहिती करून देणारे लेख आम्ही प्रसिद्ध केले होतेच. या लेखाच्या वाचनानंतर आपण तेही लेख नक्की वाचा. तत्पूर्वी, सईला तिच्या नवीन ब्रँडसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून भरपूर शुभेच्छा ! मराठी कलाकारांचे आणि मराठी जनांचे व्यवसाय वृद्धधिंगत होत राहोत हीच सदिच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.