प्रेमाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात. काही जोड्यांकडे पाहून तर याची शंभर टक्के खात्री पटते. मनोरंजन क्षेत्रातही याला अपवाद नाही. या यादीतील सगळ्यात वरचं स्थान म्हणजे सचिन सुप्रिया याचं. त्यांची जोडी जशी पूर्वी प्रसन्न आणि आपलीशी वाटे तशीच ती आजही वाटते. त्यांचं एकमेकांसोबतच ट्युनिंग, कोपरखळ्या, एकत्र परफॉर्म करतानाचं टायमिंग प्रत्येक पिढीला या जोडीच्या प्रेमात पाडतं. आज जवळपास तेहतीस वर्षांच्या या वाटचालीत त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स एकत्र केले. त्यांची वैयक्तिक आयुष्यातली केमिस्ट्री त्यांच्या प्रत्येक कामात दिसून आली. मग ते ‘नच बलिये’ चा पहिला सीजन असो, किंवा ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’, ‘माझा पती करोडपती’ ह्यासारखे विनोदी सिनेमे असोत. याच कारणामुळे प्रेक्षकांनी या जोडीवर भरभरून प्रेम केलंय.
सचिनजी नुकतेच इंस्टाग्रामवर दाखल झाले आहेत तर, सुप्रियाजी आधी पासूनच तिथे होत्या. त्यामुळे या जोडीची केमिस्ट्री आता इंस्टाच्या ऑनलाईन जगतात पण दिसणार हे नक्की. किंबहुना या मजेशीर प्रवासाची सुरुवात पण झाली आहे. काही दिवसांपुर्वी सचिनजींनी एक विडीयो अपलोड केला ज्यात ते आणि मुलगी श्रिया गाणं गाताना दिसले. आणि सुप्रियाजींनी या दोघांना दाद सुद्धा दिली. पण तुम्हाला माहिती आहे का कि हि जोडी कशी जमली हा एक किस्साच आहे. झालं असं होतं कि मनोरंजन क्षेत्रात यायचं म्हणून सुप्रियाजी नवनवीन कामं करत होत्या. कॉलेजला जाण्याचं वय असावं. त्याच दरम्यान सचिनजी ‘नवरी मिळे नवऱ्याला’ सिनेमाचं शुटींग सुरु करण्याच्या बेतात होते. ते स्वतः लीड रोल मध्ये होते आणि त्यांच्या विरुद्ध तेवढ्याच ताकदीची अभिनेत्री त्यांना हवी होती. याची कल्पना सचिनजींच्या आईंना होती. एका कार्यक्रमादरम्यान त्यांची नजर सुप्रियाजींवर पडली.
त्यांना सुप्रियाजी अभिनेत्री म्हणून आवडल्याच पण हि मुलगी आपल्या घरची सून होऊ शकते असं वाटलं. तसं त्यांनी सचिनजींना सांगितलं, कि सुप्रिया नवरी मिळे नवऱ्याला मध्ये उत्तम कामही करू शकतात आणि सचिनजी त्यांचा लग्नासाठीही विचार करू शकतात. सचिनजी हो म्हणाले, पण त्यावेळी त्यांच्या मनात फक्त आगामी सिनेमाचे विचार होते. या सिनेमाच्यानिमित्ताने त्यांची – सुप्रियाजींची पहिली भेट झाली ती शिवाजी मंदिरला. त्यावेळी नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमामधील भूमिकेसाठी त्यांनी सुप्रियाजींना विचारलं. त्याही हो म्हणाल्या. पुढे शुटींग सुरु झालं आणि सचिनजींना सुप्रियाजी अभिनेत्री म्हणून किती ताकदीच्या आहेत याचा अनुभव येऊ लागला. आजही आठवणींना उजाळा देताना ते सुप्रियाजींच्या त्या सिनेमामधल्या अभिनयाची हमखास तारीफ करतात. सोबत त्यांच्या आईंनी सांगितलेली लग्नाची गोष्ट डोक्यात होतीच पण, सिनेमा आधी पूर्ण होऊ द्यावा असं त्यांना वाटलं. पण यात एक गोष्ट त्यांना लक्षात आली नसावी कि सुप्रियाजींना सचिनजी यांचे लहान पणाचे चित्रपट आवडत असत. त्यांच्या गोंडस रूपावर त्या फिदा होत्या. शेवटी तो क्षण आला.
सचिनजींनी सुप्रिया यांना लग्नाबद्दल विचारलं. थोडा वेळ घेऊन त्यांनी सचिनजींना होकार दिला.
पुढे लग्न झालं अन आजपर्यंत हि जोडी अबाधित आहे. तसचं, कलाकार म्हणून ते दोघेही आपल्याला सतत आनंदचं देत आले आहेत. तसेच तुम्हाला माहिती आहे का, कि दोघांचा वाढदिवस हा लागोपाठ येतो. म्हणजे सचिनजी यांचा वाढदिवस असतो १७ ऑगस्ट ला तर सुप्रियाजींचा वाढदिवस असतो ऑगस्ट १६ ला. आणि त्यांच्यात दहा वर्षाचं अंतर आहे. पण त्यांच्या खेळकर वागण्यामुळे, नैसर्गिक केमिस्ट्रीमुळे असं कधी जाणवत नाही. या जोडीच्या अशाच दिलखुलास स्वभावामुळे त्यांच्या मुलाखती अगदी कान देऊन ऐकत राहाव्या अशा वाटतात.
तर अशा या हसमुख आणि दिलखुलास जोडीने सदैव एकत्र काम करत राहावं आणि त्यांच्यातली नैसर्गिक केमिस्ट्रीचा आनंद प्रेक्षकांना नेहमी घेता यावा असं म्हणत मराठी गप्पाच्या पूर्ण टीम कडून दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)