मराठी गप्पा आणि मालिकांशी निगडित लेख हे एक अतूट नातं तयार झालेलं आहे. मालिका, त्यातील कलाकार, नवीन येऊ घातलेले प्रोजेक्ट्स अशा विविध विषयांवर मराठी गप्पाची टीम सदैव माहितीपूर्ण लेख आपल्या वाचकांसाठी घेऊन येत असते. आजचा लेखही असाच माहितीपूर्ण आहे, पण तो केवळ एक मालिका किंवा एका कालाकाराविषयी नाहीये. तो आहे कोणत्या मराठी मालिकांना आणि मराठी मनोरंजन वाहिन्यांना किती प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभला आहे आणि त्यासाठीचा अनुक्रम काय या विषयी.
अनेक वेळेस आपण पाहतो की, एखादी नवीन मालिका दाखल झाली की त्या मालिकेची टीम दोन गोष्टी नेहमीच साजऱ्या करत असते. एक म्हणजे त्या मालिकेने ५० किंवा १०० भाग पूर्ण केले असता आणि दूसरी म्हणजे मालिकेचा टी. आर.पी. जेव्हा वाढतो तेव्हा. वरील दोन्ही गोष्टी या प्रेक्षकसंख्या वाढते आहे हे लक्षात आणून देत असतातं. कोणत्याही क्षेत्रात काही मापदंड असतात. अगदी आपणही काम करताना आपल्याला कामाच्या ठिकाणी टार्गेट्स असतातच. मालिकांसाठी प्रेक्षकसंख्या वाढवणे हा प्रॉडक्शन टिम्स आणि मनोरंजन वाहिन्यांचा मापदंड ठरवलेला असतो. कोणत्या वाहिनीची आणि कार्यक्रमाची प्रेक्षकसंख्या किती असते याची माहिती ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडिया या संस्थेमार्फत ठराविक कालावधीसाठी मोजली जाते. जसे की ठराविक कालावधी म्हणजे एक आठवडा होय. आज आपण या लेखात ज्या मराठी मालिकांना आणि वाहिन्यांना असणारा प्रेक्षकप्रतिसाद पाहणार आहोत तो १४ नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२० या काळातील आहेत याची कृपया नोंद घ्यावी.
मराठी टॉप वाहिन्या
वर उल्लेखलेल्या कालावधीमध्ये, जास्त प्रेक्षाकसंख्येनुसार मालिका आणि वाहिन्या यांचे गुणक्रम ठरवले जातात. यातील, सर्वोत्तम मराठी वाहिन्यांच्या गुणक्रमाची विभागणी तीन भागात करण्यात येते. एक म्हणजे फ्री प्लॅटफॉर्म, दुसरं म्हणजे पेड प्लॅटफॉर्म आणि तिसरं म्हणजे या दोघांचा एकूण अनुक्रम. या तीन विभागात आपल्याला दबदबा दिसून येतो आहे तो स्टार प्रवाह वाहिनीचा. पेड आणि एकूण अनुक्रमात या वहिनीने इतर वाहिन्यांना पिछाडीवर सोडल्याचं चित्र सध्या उभं राहिलं आहे. गेल्या काही काळात स्टार प्रवाह वाहिनीने अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. नुकतीच सुरू झालेली, दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका यांचं प्रातिनिधिक उदाहरण. कोठारे व्हिजन सारख्या नावाजलेल्या प्रॉडक्शनची ही मालिका. तसेच फुलाला सुगंध मातीचा, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकाही प्रेक्षक पसंतीस उतरत आहेतच.
स्टार प्रवाह नंतर दुसऱ्या स्थानावर झी मराठी ही प्रसिद्ध वाहिनी आहे. नजीकच्या काळात या वाहिनीवर आधी पासून चालत आलेल्या मालिका नवीन स्वरूपात दाखवल्या जात आहेत. चला हवा येऊ द्या हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण होय. तसेच कारभारी लय भारी ही नवीन मालिकाही अगदी नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तसेच अपूर्वा नेमळेकर हिची बहुप्रतिक्षित नवीन मालिकाही लवकरच आपल्या भेटीस येईल. स्टार प्रवाह आणि झी मराठी यांच्या नंतर कलर्स मराठी आणि झी टॉकीज यांचा अनुक्रम लागतो. पेड प्लॅटफॉर्म आणि एकूण अनुक्रम या दोन्हीं भागांमध्ये हाच अनुक्रम दिसून येतो. तर पेड प्लॅटफॉर्म मध्ये पाचव्या क्रमांकावर सोनी मराठी ही वाहिनी आहे, तर एकूण गुणक्रमात ‘फक्त मराठी’ ही वाहिनी पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच फ्री प्लॅटफॉर्म च्या गुणक्रमात फक्त मराठी, शिमारु मराठी बाणा, डी. डी. सह्याद्री यांचा समावेश होतो.
टॉप ४ मराठी मालिका
पण हे तर झालं वाहिन्यांच्या संदर्भात. जर आपण मालिकांचा गुणक्रम बघितला तर तिथे केवळ एकाच वहिनीच्या मालिकांना सध्याच्या काळात निर्विवादपणे प्रेक्षक पसंती मिळाली आहे असं दिसून येतं आहे. ही वाहिनी आहे, स्टार प्रवाह. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या आठवड्यात टीआरपीमध्ये टॉप ४ मराठी मालिका ह्या स्टार प्रवाहावरीलच आहेत. टीआरपी मध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे तो स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ ह्या मालिकेने. रेटिंग्जच्या बाबतीत ह्या मालिकेला ४५८५ पॉईंट्स मिळाले आहेत. त्यानंतर नंबर तीन वर आहे ‘मुलगी झाली हो’ हि मालिका. ह्या मालिकेला ४६५१ इतके पॉईंट्स मिळाले आहेत. क्रमांक २ वर आहे ‘फुलाला सुगंध मातीचा’ हि मालिका. ह्या मालिकेला ४८८२ इतके पॉईंट्स मिळाले आहेत. तर सर्वात जास्त टीआरपी ज्या मालिकेला मिळाला आहे ती मालिका म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. ह्या मालिकेला सर्वात ५१०२ इतके जास्त पॉईंट्स मिळाले आहेत. म्हणून टीआरपीच्या बाबतीत ह्या मालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
१४ ते २० नोव्हेंबर २०२० या कालावधीतील सर्वात जास्त पहिल्या गेलेल्या मालिका म्हणजे, सुख म्हणजे नक्की काय असतं, फुलाला सुगंध मातीचा, मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा या होय. तसेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या विशेष भागाला म्हणजे महाएपिसोडलाही प्रेक्षक पसंती मिळाल्याचं चित्र सध्या दिसतं आहे. दिवाळीच्या सुट्टीत यंदा प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वरील मालिकांना पसंती दिल्याचं चित्र आहे.
या मालिका प्रेक्षक पसंतीस उतरत आहेतच, सोबत त्यातील कलाकारही प्रसिद्धी झोतात येत आहेत. मराठी गप्पाने वेळोवेळी या मालिकांतील कलाकारांच्या कारकीर्दीवर लेख प्रसिद्ध केलेले आहेत. त्या लेखांप्रमाणेच हा लेखही आपल्यास माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल अशी आशा आहे. तुम्हाला वरील मालिकांतील कालाकारांविषयी माहिती हवी असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. सर्च ऑप्शनमध्ये जाऊन आपल्या आवडत्या मालिकेचं वा त्यातील कलाकारांचं नाव टाईप करा आणि सर्च करा. मराठी गप्पाच्या टीमने लिहिलेले विविध लेख आपणांस वाचायला मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)