दिसायला सुंदर, उत्तम अभिनय क्षमता आणि चातुर्य यांचा संगम म्हणजे मराठमोळ्या अभिनेत्री. त्यांच्या आयुष्याविषयी प्रेक्षकांना सदैव कुतूहलमिश्रित आकर्षण असतं. त्यामुळे त्यांच्या अभिनयासोबतच चर्चा होते ते त्यांचा खऱ्या आयुष्याविषयी सुद्धा. खासकरून त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते ती या अभिनेत्री आणि त्यांच्या जोडीदारांविषयी. आज हाच विषय घेऊन मराठी गप्पाची टीम आपल्या भेटीस आली आहे. आज आपण काही निवडक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि त्यांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार यांच्याविषयी माहिती घेणार आहोत.
अभिज्ञा भावे :
मालिकेतील खलनायिकि भूमिका असो कि एखादं विनोदी स्कीट असो वा अगदी व्यवसाय. अभिज्ञा आपल्याला प्रत्येक भूमिकेत सहजपणे वावरताना दिसते. आपल्या माहिती आहेच कि तेजाज्ञा या मराठमोळ्या ब्रँडची ती सहभागीदार आहे. तसेच ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेलिब्रिटी पॅटर्न मध्ये तिचा सहभाग होता. तसेच तुला पाहते रे या मालिकेतील मायरा हि तिची भूमिकाही गाजली. तसेच नुकतीच ती पुन्हा एकदा चर्चेत आली ते तिच्या साखरपुड्याच्या फोटोज मुळे.
तिचा साखरपुडा मेहुल पै यांच्याशी झाला. तिने साखरपुड्याचे फोटोज नुकतेच शेअर केले आहेत. अभिज्ञा हिचे काही काळापूर्वी लग्न झाले होते. पण काही कारणांमुळे ते दोघेही विभक्त झाले. काही महिन्यांपूर्वी मेहुल यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करून अभिज्ञा हिने स्वतःच्या रिलेशनशिप ची कल्पना चाहत्यांना दिली होती. मेहुल हे गेली काही वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच अभिज्ञा सध्या, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या नवीन जोडप्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा !
रुपाली भोसले :
बिग बॉस, आई कुठे काय करते या नजीकच्या काळातील गाजलेल्या कार्यक्रम आणि मालिकेतून पुन्हा नव्याने आपल्या भेटीस आलेल्या अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये आणि नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमांतून अभिनय केलेला आहे. आपल्या आयुष्यात अनेक चढ उताराचे क्षण अनुभवत त्यांनी आज पर्यंतच्या यशापर्यंत वाटचाल केली आहे.
या कलाप्रवासात मधला काही काळ त्या परदेशात स्थायिक होत्या आणि म्हणून अभिनयापासून लांब. त्याकाळात त्यांचं लग्न झालं होतं. पण हे लग्न काही कारणांमुळे टिकू शकलं नाही. पुढे त्या भारतात परत आल्या. आपल्या कारकिर्दीची पुन्हा सुरुवात केली. अनेक गाजलेल्या मालिकांतून त्यांनी आधीही कामे केली होती. आपल्या सेकंड इनिंगमध्येही त्यांनी त्याच जोमाने काम करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती आली जी आज त्यांची खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहे. त्या व्यक्तीचं नाव अंकित मगरे. अंकित हे सुद्धा मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहेत. गेल्या काही काळापासून हे दोघे रिलेशनशीप मध्ये आहेत. गेल्या काही काळात या जोडीने एकत्र असे काही युट्युब विडीयोज केले होते ज्यात ते एकत्र जेवण बनवत होते. तसेच एकत्र मुलाखतही त्यांनी दिली. अशा या मेड फॉर इच अदर जोडीला मराठी गप्पाच्या टीमकडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
वीणा जगताप :
बिग बॉस मराठी या कार्यक्रमाने आपलं दोन्ही पर्वांमध्ये मनोरंजन केलेलं आहे. यात सहभागी झालेल्या कलाकारांपैकी काही कलाकार आपल्या विशेष लक्षात राहिले. त्यातील दोन कलाकार म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप. दोघेही उत्तम कलाकार. वीणा ला आपण मालिकांमधून भेटलो आहोतच. तर शिवला नृत्याची आवड आणि तो एका गेम शो मध्येही झळकला होता. या दोघांची भेट हि बिग बॉस मराठीच्या घरात झाली. पुढे त्यांच्यातले स्नेहसंबंध वाढत गेले. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही आवडत होतीच. या घरातून बाहेर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली.
आज दोघेही रिलेशनशिप मध्ये आहेत. शिव हा सध्या बिग बॉस मराठीची अजून एक विजेती मेधा धाडे आणि सोनाली यांच्यासोबत एका कलाकृतीत अभिनय करतो आहे. तर वीणा जगताप हि सध्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत दाखल होते आहे. येत्या काळात शिवचा महेश मांजरेकर यांच्या सोबत एक ऐतिहासिक चित्रपट येण्याची शक्यता आहे. को विड १९ मुळे या चित्रपटाचं शुटींग येत्या काळात सुरु होईल असं एका प्रथितयश वृत्तपत्राने म्हंटलं आहे. एकूणच काय तर या दोघांनी एकमेकांना साथ देत देत आपापल्या कारकिर्दीत घोडदौड चालूच ठेवली आहे. या जोडीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
ईशा केसकर :
ईशा केसकर हि आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री. जय मल्हार या मालिकेतील ‘बानू’ या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. पुढे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील खलनायिका साकारली. त्याही भुमिकेसाठी तिचं कौतुक झालं होतं. अशी हि ईशा प्रेमात पडली ती एका अभिनेत्याच्या. त्याचं नाव रिशी सक्सेना. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात रिशी पोहोचला. त्याची या मालिकेतील भूमिकेचं सगळ्यांनी कौतुक केलं. या मालिकेनंतर त्याने काही मालिकांमधून पाहुणा कलाकार आणि इतर भूमिका केल्या. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची आणि ईशाचं बोलणं सुरु झालं. एका मुलाखतीत संगीतल्याप्रमाणे ते एकमेकांना ओळखत होते पण जास्त बोलणं होत नव्हतं. मग या निमित्ताने बोलणं वाढलं.
पुढे १४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी म्हणजे वॅलेन्टाइंसच्या दिवशी त्यांनी आपल्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली सोशल मिडियाच्या माध्यमांतून त्यांच्या चाहत्यांना दिली. पुढे यथावकाश आपलं हे प्रेम मान्यही केलं. गेली काही वर्षे ते रिलेशनशिपमध्ये आहेत. तसेच विविध कलाकृतींतूनही आपल्या भेटीस येत आहेत. नुकतंच रिशीचं ‘लाजीरा’ हे गाणं प्रसिद्ध झालं. यानिमित्ताने सायली संजीव आणि रिशी यांची ‘काहे दिया परदेस’ मधील जोडी पुन्हा पाहायला मिळाली. तसेच दिग्पाल लांजेकर यांच्या ‘जंगजौहर’ मध्ये तो आपल्याला दिसेल. ईशाहि येत्या काळात आपल्याला विविध भूमिकांमधून दिसेल हे नक्की. या गोड जोडीला, मराठी गप्पाच्या टीमकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
शिवानी सुर्वे :
शिवानी सुर्वे म्हणजे थेट आणि बिनधास्त अशी नायिका. तिच्या मालिकेतील अभिनय कारकिर्दीची सुरुवात महाविद्यालयात असताना झाली. देवयानी हि तिची गाजलेली मालिका. त्यातील मुख्य व्यक्तिरेखा साकारताना तिने आपल्यातील अभिनय कौशल्याचा कस लावला त्यामुळे आजही प्रेक्षक तिची हि व्यक्तिरेखा विसरू शकलेले नाहीत. याच काळात इतरही मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये तिने काम सुरु केलं होतं. अशाच एका मालिकेच्या निमित्ताने तिची भेट झाली ती अजिंक्य नन्नावारे याच्याशी. तिच्यासोबत तोही एका मालिकेत काम करत होता. मुळचा साताऱ्याचा हा मुलगा आता मुंबईत शिकत होता. अभिनय क्षेत्रातील प्रशिक्षण घेत होता.
याच काळात त्यांची भेट झाली असावी. यथावकाश ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गेली काही वर्षे ते एकत्र आहेत. नजीकच्या काळात शिवानी हि बिग बॉस मराठीच्या एका पर्वात सहभागी झाली होती. तसेच अजिंक्य हा सुद्धा अनेक नाटक आणि मालिकांमधून आपल्या भेटीस आलेला आहेच. वाडा चिरेबंदी, तू जीवाला गुंतवावे, साधू (शॉर्ट फिल्म), हि त्यातली काही ठळक उदाहरणं. दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘जंगजौहर’ या चित्रपटांतून तो आपल्या भेटीस येईल. येत्या काळातही हि गोड जोडी, त्यांच्या कारकिर्दीतील अनेक भूमिकांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने आनंद देत राहील हे नक्की. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा !
रेवती लेले :
ऐतिहासिक मालिकांना मराठी घराघरातून विशेषकरून पाहिलं जातं. त्यामुळे स्वामिनी या मालिकेचा स्वतंत्र असा एक प्रेक्षकवर्ग आहे हे स्वाभाविकच. अशा या मालिकेतील दोन मुख्य व्यक्तिरेखा म्हणजे रमाबाई आणि गोपिकाबाई. या दोन्ही भूमिका अनुक्रमे रेवती लेले आणि ऐश्वर्या नारकर यांनी निभावल्या आहेत. ऐश्वर्याजींच्या अभिनय प्रवासावरील लेख आपण मराठी गप्पावर वाचला असेलंच. गोपिकाबाईंच्या अनुभवी व्यक्तिरेखेसमोर तेवढीच अल्लड पण समंजस रमाबाई हि व्यक्तिरेखा उभी केली आहे रेवती लेले हिने.
रेवती हि एक उत्तम कलाकार म्हणून उदयास येते आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे, तसेच उत्तम नृत्यांगना देखील. तिचा जोडीदार हा सुद्धा याच क्षेत्रातील आहे. त्याचं नाव आदिश वैद्य. त्यानेही अनेक कलाकृतींमधून आपली कला सादर केलेली आहे. सध्या त्याची ‘गुम हे किसी के प्यार मै’ हि हिंदी मालिका सुरु आहे. यातील मोहित हि भूमिका लोकप्रिय झाली आहे. अशा या तरुण कलाकार जोडीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खुप खुप शुभेच्छा !
मिताली मयेकर :
‘लाडाची मी लेक गं’ हि मालिका सध्या मालिकाविश्वात स्वतःचं असं स्थान निर्माण करते आहे आणि त्यात बऱ्याच अंशी यशस्वीहि झाली आहे. या मालिकेतील तीन मुख्य पात्र म्हणजे डॉ. सुहास, कस्तुरी आणि माई. या तीन व्यक्तिरेखा निभावल्या आहेत अनुक्रमे आरोह वेलणकर, मिताली मयेकर आणि स्मिता तांबे यांनी. या तिन्ही कलाकारांच्या कलाप्रवासाचा आढावा घेणारे लेख मराठी गप्पावर प्रसिद्ध झाले आहेत. त्याला लाभलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आमच्या वाचकांचे आभार. मिताली विषयी लेख ज्यांनी वाचला असेल त्यांना कल्पना असेलच कि मिताली सध्या सिद्धार्थ चांदेकरसोबत रिलेशनशिप मध्ये आहे.
त्या दोघांचा मागील वर्षी साखरपुडा झाला होता. लग्नही होणार होतं पण कोविड १९ च्या संकटामुळे त्यांनी हा विवाह सोहळा पुढे ढकलला. त्यांची ओळख झाली ती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. मग हळू हळू बोलणं वाढत गेलं. यथावकाश प्रपोज केल्यानंतर त्यांनी पुढे साखरपुडाहि केला. त्यांचं एकत्र असं एक इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. या अकाउंटच्या माध्यमांतून ते जिथे जिथे एकत्र जातात तिथले फोटोज ते त्यांच्या चाहत्यांसाठी वेळोवेळी अपलोड करत असतात. अशी हि मराठी मनोरंजन विश्वातली गोंडस जोडी एकत्र आल्यापासून प्रेक्षकांची मनंपसंत जोडी बनली आहे. अशा या लोकप्रिय जोडीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)