वेबसिरीज हे तसं मनोरंजन विश्वातील नवं माध्यम. पण अनेक कलाकारांनी सध्या या माध्यमाची कास धरलेली दिसते. त्यामुळे यात नवीन आणि अनुभवी कलाकारांच्या अभिनय जुगलबंदीचा आस्वाद आपल्याला घेता येतो. अशीच एक मराठी वेबसिरीज काही काळापूर्वी आपल्या भेटीस आली. ती एवढी गाजली, कि दोनच दिवसांपूर्वी असं घोषित केलं गेलं कि हि वेबसिरीज आता हिंदीतही डब केली जाणार आहे. कोणत्याही कलाकृतीसाठी दुसऱ्या भाषेतून मागणी वाढणं हि त्यांनी केलेल्या मेहनतीची पोचपावतीच. या वेबसिरीजमध्ये आपल्या मराठी मालिकांमधला नवोदित चेहरा आपल्या भेटीस येतो. त्याचं नाव तेजस बर्वे. त्याच्या या वेबसिरीज चं नाव ‘टिक टॅक टो’. या वेबसिरीजच्या यशानिमित्ताने तेजसच्या अभिनय प्रवासाचा थोडक्यात धांडोळा घेण्याचा प्रयत्न.
तेजसला आपण ओळखतो ते, दोन गाजलेल्या मराठी मालिकांमधील मुख्य भूमिकेसाठी. ‘मिर्सेस मुख्यमंत्री’ मालिकेतील समरसिंह पाटील आणि ‘झिंदगी नॉट आउट’ मधील सचिन या भूमिकांसाठी. या दोन्ही भूमिकांमध्ये त्याने, त्याचा नाट्यक्षेत्रातील अभिनय, दिग्दर्शन याचा अनुभव पणाला लाऊन काम केलं, म्हणूनच या मालिकांनी आपला निरोप घेतला खरा, पण प्रेक्षकांना आजही त्याच्या या भूमिका लक्षात आहेत. तेजसचा नाटकाचा आणि पर्यायाने, अभिनयाचा प्रवास तसा कॉलेजपासुन सुरू झाला असं आपण म्हणू शकतो. कारण त्याआधी त्याला शाळेत असताना अभ्यासाव्यतिरिक्त त्याला तबलावादनाची आवड होती. त्याने रंगमंचावर पहिलं पाउल टाकलं ते एका फॅन्सी ड्रेस शोच्या निमित्ताने. काही काळापूर्वी त्याच्या सोशल मिडियावर याच्या आठवणींना उजाळा दिला होता. पण या व्यतिरिक्त अभिनय फारसा केला नसावा.
तेजसने एस.पी. कॉलेजच्या प्रांगणात त्याने पाय ठेवला आणि तेथील कालामंडळाचा अविभाज्य भाग झाला. इथून बाहेर पडेपर्यंत अनेक नाट्यकृतींमध्ये त्याने सहभाग नोंदवला. फिरोदिया करंडक सारख्या दर्जेदार स्पर्धांमध्ये त्यांच्या नाटकांनी पारितोषिकंही मिळवली आहेत. फिरोदिया करंडकसोबतच त्यांनी अन्य नाट्य स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. पारितोषिकं पटकावली आहेत. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात त्यांनी केलेल्या म्युझिकल J4U या एकांकिकेला ‘रंगीतसंगीत २०१८’ आणि ‘CI-FY 2018’ या नावाजलेल्या स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळाली. पुण्यातील मानाच्या नाट्य महोत्सवांमध्ये हि एकांकिका दाखवली गेली. तसेच, दिग्पाल लांजेकर यांचा सहभाग असलेल्या, ‘चॅलेंज’ या मदनलाल धिंग्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीवरील नाटकात महत्वपूर्ण भूमिका बजावली. पुढे, दिग्पाल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फत्तेशिकस्त’ या लोकप्रिय चित्रपटात त्याने असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. येत्या काळातील, ‘जंगजौहर’ या चित्रपटातही त्याचं योगदान असेल, हे त्याने शेअर केलेल्या फोटोजवरून वाटत. छत्रपती शिवरायांवरील चित्रपटांचा तो जसा भाग होता, तसेच ‘छत्रपती शिवराय शिवकल्याणराजा’ या छत्रपती शिवाजी महाराजांवरील कार्यक्रमात त्याने अभिनय केला आहे.
तसेच, अमेय वाघ, सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात अमेयच्या भावाची भूमिका साकारली होती. चित्रपट माध्यमासमवेत त्याने काही शॉर्टफिल्म्स आणि वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. ‘टिक टॅक टो’ या वेबसिरीजच्या यशाबद्दल आपण वाचलं आहेच. सोबतच त्याने, ‘मातीचं स्वप्न’, ‘ती : आई’ या दोन शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. दोन्हीमध्ये त्याने अनुक्रमे सुमित राघवन आणि मधुराणी गोखले-प्रभुलकर या अनुभवी कलाकारांसमवेत काम केलं आहे. अभिनायाव्यतिरिक्त तेजसला डबिंग करायलाही आवडतं. तसेच त्याला इतर कलांतही उत्तम गती आहे. तो एक उत्तम वादक आहे. आधी सांगितल्याप्रमाणे तो शाळेत असताना तबला वाजवत असे. त्याचसोबत तो कीबोर्डही उत्तम हाताळतो. तसेच ढोलताशा पथकांतूनही त्याने ताशावादन केलेलं आहे. याव्यतिरिक्त, तो चांगली चित्रही काढतो. अजय-अतुल या जोडीचं एक उत्तम चित्र त्याने काही काळापूर्वी आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केलं होतं.
कलाक्षेत्राबाहेर वावरताना तो एक अस्सल खवय्या आहे. विविध प्रकारचे पदार्थ त्याला खायला आवडतात. कॉलेजमध्ये असताना तर खवय्येगिरी एकदम जोरात केली होती असं तो एका मुलाखतीत तो म्हणतो. असा हा नवोदित, नाटकाशी नाळ जुळलेला अभिनेता, मराठी मनोरंजन विश्वात उदयाला येतो आहे. त्याने आत्तापर्यंत विविध भूमिकांमध्ये काम केलं आहे. विविध माध्यमं हाताळली आहेत. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. तसेच अनेक उत्तम कलाकृती आणि कलाकार यांच्यासोबत काम करण्याचा त्याला अनुभव गाठीशी आहे. या अनुभवाच्या उपलब्ध शिदोरीवर येत्या काळात तो त्याच्या चाहत्यांना विविध भूमिकांतून अभिनेता म्हणून आणि इतर कामातून आनंद देईल हे नक्की. त्याच्या कलेकलेने वाढणाऱ्या करियरला मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
तुम्ही हा लेख वाचलात त्याबद्दल धन्यवाद. तेजस ज्या मालिकेशी निगडीत होता, त्या ‘मिर्सेस मुख्यमंत्री’ मालिकेच्या निर्मात्या ‘श्वेता शिंदे’ आणि अभिनेत्री ‘अमृता धोंगडे’ यांच्या अभिनय प्रवासाचा धांडोळा घेणारे लेख मराठी गप्पावर प्रसिद्ध झाले आहेत. आपण तेजस चा अभिनय प्रवास जाणून घेतलात तसाच त्यांचा प्रवासही जाणून घ्या. त्या लेखांनाही नक्कीच भेट द्या.
(Author : Vighnesh Khale)