मराठी गप्पाच्या मागील काही लेखांमधून चला हवा येऊ द्या आणि त्यातील काही कलाकारांच्या कारकीर्दीविषयी आमच्या टीमने लेखन केलेले आहे. त्या लेखांना अमाप प्रतिसाद आमच्या लेखांना मिळाला. चला हवा येऊ द्या ची जादू प्रेक्षक म्हणून आमच्या टीमने अनुभवली होती. पण या लेखाच्या निमित्ताने ती अगदी जवळून जाणवली. या कालाकारांमधील एका अवलिया कलाकाराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हा कलाकार ज्या व्यक्तिरेखांची झूल पांघरतो, त्या व्यक्तिरेखा शब्दशः जिवंत करतो. त्याच्या या रसरशीत व्यक्तिरेखांमुळे एक अभिनेता म्हणून तर तो सातत्यपूर्ण ठरतोच, सोबत अगदी सहज प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत होऊन जातो.
आज आपण जाणून घेणार आहोत सागर कारंडे यांच्याविषयी. मूळ सातारकर असणाऱ्या सागर यांचा जन्म झाला मुंबईमध्ये. पुढे शिक्षणही मुंबईतच पूर्ण झालं. या शैक्षणिक वर्षांनी सागर यांच्यातील कलाकाराला वाव दिला असं म्हंटल्यास योग्य ठरेल. सागर यांचं शालेय शिक्षण झालं, बालमोहन विद्यामंदिर या शाळेत. कलासक्त वातावरण असणाऱ्या या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सागर हे सहभागी होत. तसेच गणेशोत्सव, नवरात्री निमित्त भरवल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धांमधून त्यांनी अभिनय केला आणि त्यासाठी पारितोषिकं ही मिळवली आहेत. या परितोषिकांसोबतच त्यांना बहुमुल्य असा अनुभवही कमावता आला. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःतील अभिनेत्याला घडवलं. अभिनेता म्हणून व्यक्तिमत्वाला पैलू पडत असताना, माणूस म्हणूनही सागर हे परिपक्व होत होते. सोबत शिक्षणही चालू होतंच. त्यांनी कम्प्युटर इंजिनियर म्हणून याकाळात पदवी संपादन केली आणि सोबत एका प्रथितयश उद्योगसमूहात त्यांनी काही काळ कामही केलं.
पण त्यांच्या मनातील कलाकार मात्र यानिमित्ताने थोडा संकुचित झाल्यासारखा त्यांना वाटत असावा. नोकरी करून आपलं हे अभिनय प्रेम आता जपता येणार नाही हे त्यांना लक्षात आलं. त्यांनी मग नोकरीचा राजीनामा दिला आणि व्यावसायिक अभिनेता म्हणून प्रवास सुरु केला. वर्ष होतं २००२. नवीन शतकाच्या सुरुवातीला त्यांनी घेतलेला हा निर्णय आज जवळपास अठरा वर्षे किती सुयोग्य होता, हे प्रेक्षक अनुभवत आहेत. त्यांनी केलेली नाटकं असोत, मग त्यात इडियट्स आलं, करून गेलो गाव हे नाटक आलं आणि अशी कित्येक. प्रत्येक नाटकाने त्यांच्यातील समर्थ अभिनेत्याची ओळखच प्रेक्षकांना झाली. हीच तऱ्हा त्यांनी केलेल्या मालिका अथवा टीव्ही वरील कार्यक्रमांची. सध्या चालू असलेलं ‘चला हवा येऊ द्या’ असू दे, वा ‘फु बाई फु’. सागर यांच्या प्रहसनांनी प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध केलेलं आहे. तसेच त्यांनी ज्या ज्या व्यक्तिरेखा साकार केल्या त्या सागर यांच्याकडून अफलातून रीतीने वठवल्या गेल्या आहेत. मग त्या पुणेकर बाई असोत, पोस्टमन काका असोत, सिंघम-सेक्रेड गेम्स मधील खलनायक असोत.
इतकंच काय तर आपल्या लाडक्या राजकीय नेत्यांच्या लकबी हेरून त्यानुसार त्यांच्या व्यक्तिरेखा साकार करण्यातही सागर यांचा हातखंडा आहे. तसेच त्यांनी केलेली पोस्टमन काकांची व्यक्तिरेखा ही निःशब्द करणारी असली तरीही मनात कुठेतरी विचारांचं काहूर उठवून जाते. त्यामुळे अरविंद जगताप यांच्या समर्थ शब्द सामर्थ्याला तेवढ्याच सक्षम कलाकाराच्या पुष्ट अभिनयाची साथ लाभली आहे असं आपण म्हणू शकतो. वैयक्तिक आयुष्याविषयी म्हणाल तर सागर कारंडे ह्यांचे लग्न झालेलं असून त्यांच्या पत्नीचे नाव सोनाली कारंडे असून दोघांनाही सई नावाची एक मुलगी आहे. तर असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व नाटकांत जास्त रमंतं. रंगभूमी हा जणू श्वास असल्यासारखी सागर यांची कारकीर्द आहे. मालिका, कार्यक्रम यांतून त्यांचा कल पुन्हा त्यांच्या आवडत्या रंगभूमीकडे वळतो. आता अनलॉक नंतर त्यांचं नाटक पुन्हा नवीन जोमानं सुरू होत आहे. त्यांच्या या नाटकाला आणि एकूणच त्यांच्या यापुढील वाटचालीत त्यांना अखंड यश लाभो हीच मराठी गप्पाच्या टीमची इच्छा. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !