मराठी गप्पाची टीम आणि मराठी गप्पाचे वाचक यांच्यात एका गोष्टीविषयी प्रचंड असे सामायिक आकर्षण आणि आदर आहे. ही गोष्ट म्हणजे बुद्धीचातुर्य वापरत दाखवलेली कल्पकता. जेव्हा जेव्हा आमच्या टीमला कल्पक असे वायरल व्हिडियोज सापडतात, तेव्हा तेव्हा आपली टीम त्यावर लेख लिहीत असते. आता काही दिवसांपूर्वीच्या एका लेखाचं उदाहरण घ्या. एका शालेय शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना भारताचा भूगोल एका पटांगणात अगदी कल्पकतेने कसा शिकवला याविषयी हा लेख होता. या लेखास आपली वाचकपसंती इतक्या मोठ्या प्रमाणात मिळाली की आमचा उत्साह वाढला. योगायोगाची बाब अशी की अशाच एका कल्पक शिक्षकाचा व्हिडियो आमच्या टीमच्या पाहण्यात आला आणि त्याविषयीचा आजचा हा लेख आपल्या भेटीस आम्ही आणला आहे.
मागील व्हिडियो प्रमाणेच या व्हिडियोतसुद्धा आपल्याला एक शिक्षक, त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत एक उपक्रम करून घेताना दिसत असतात. ज्यात शिक्षकांच्या सभोवती विशिष्ट कारणाने बसवलेले विद्यार्थी आणि इतर सहभागी विद्यार्थी असतात. इतर सहभागी विद्यार्थ्यांची संख्या असते तीन, तर विशिष्ट कारणाने बसवलेले विद्यार्थी असतात १४. या १४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १४ वेगवेगळ्या कृती करण्यास सांगितलेले असते. जसे की पहिला विद्यार्थी वाचन करत असतो, दुसरा विद्यार्थी डान्स करत असतो, तिसरा झोपण्याचा अभिनय करत असतो आणि बाकीच्या कृती. या प्रत्येक कृतीस ओळखणं आणि तीचं नाव घेणं हे या उपक्रमाचे उद्दिष्ट. पण यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे सहभागी मुलांनी या प्रत्येक कृतीचं वर्णन करायचं आणि ते ही इंग्रजी भाषेत. या व्हिडियोत आपल्याला तीनही सहभागी विद्यार्थी अगदी नियमितपणे आपापली उत्तरे देताना दिसतात. तिसरा विद्यार्थी एकदा गोंधळतो खरा, पण त्याचे शिक्षक त्याला मदत करायला सज्ज असतात. त्यामुळे त्याने केलेल्या चुकीबद्दल ते रागे भरत नाहीत.
उलट त्याची चूक सुधारतात आणि त्याला पुढच्या कृतीचं नाव सांगायला सांगतात. खरं तर तीन विद्यार्थ्यांनी चौदा कृतींचं वारंवार वर्णन म्हणजे कंटाळा येऊ शकतो. पण हा व्हिडीओ पाहताना हा कंटाळा अजिबात येत नाही. त्याची काही कारणं नक्कीच आहेत. पहिलं म्हणजे शाळा गावाकडची वाटत असून सुदधा त्यांनी ओळखलेलं व्यवहारातील इंग्रजी भाषेचं महत्व आणि ही भाषा आत्मसात करण्यासाठी ते करत असलेली मेहनत. कारण हे महत्व या शिक्षकांना नसते तर त्यांनी हा घाट घातला नसता, असे वाटते. दुसरा मुद्दा म्हणजे यातील मुलांचा आनंदी सहभाग. मग ती कृती करणारी मुलं असोत वा कृती ओळखणारी. खास मजा येते ती पळणाऱ्या, रडणाऱ्या आणि गाणाऱ्या मुलांची. त्यांचा अभिनय अगदी अफलातून. तसेच यातून त्यांना या उपक्रमाविषयी निर्माण झालेली आवड दिसून येते. शिक्षण हे केवळ पुस्तकी नसावं तर खेळीमेळीच्या वातावरणात आणि कल्पक उपक्रमांच्या साहाय्याने दिलं जावं हे आपल्याला वाटतंच. पण आपल्या पैकी फार कमी जणांच्या वाटेला असं शिक्षण आणि ते देणारे शिक्षक आले असतील.
पण हे असे वायरल व्हिडियोज पाहिले तर मात्र या कल्पक शिक्षाकांची संख्या वाढीस लागल्याचं लक्षात येतं आणि त्याच कौतुक वाटतं. या मुलांना एरवी कठीण वाटू शकणारा विषय अगदी कल्पकतेने शिकवत सोप्पा करणाऱ्या या अनामिक शिक्षकास मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. तसेच त्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना पुढील अनेक उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
हा लेख कल्पक पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शिक्षकाबाबत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांबाबत आहे. त्यामुळे ह्यास जास्तीत जास्त लोकप्रियता मिळू दे. कारण कल्पक पद्धतीने शिक्षण देण्याची आणि ग्रहण करण्याची सवय लागणं ही काळाची गरज आहे. त्यात आपला एक छोटासा वाटा म्हणून हे नक्की करा. तसेच आपल्या टीमने लिहिलेल्या इतर लेखांचाही आनंद घ्या. धन्यवाद !
बघा व्हडिओ :