मराठी सिनेमाने गेल्या दोन दशकांत खूप मोठी मजल मारली आहे. मग ते सैराटसारखे सिनेमे असोत कि ज्यांनी मराठी सिनेसृष्टीपलीकडे घोडदौड करत मजल मारली. अनेक काही चित्रपटांचे इतर भाषांमध्येहि शुटींग झालंय. श्वास सारखे सिनेमे तर अगदी ऑस्करच्या शर्यतीतही भाग घेऊन आले. विविध स्तरांवरून मराठी सिनेमे, कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ यांनी आपली छाप जागतिक स्तरावर सोडली आहे. पण बऱ्याच वर्षांपूर्वीसुद्धा असे एक मराठी कलाकार होऊन गेले ज्यांच्या सिनेमांमुळे त्यांचं नाव थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदलं गेलं होतं. त्यांचं नाव म्हणजे कृष्णा कोंडके ज्यांना आपण दादा कोंडके या नावाने ओळखतो. मुंबईच्या नायगाव परिसरात त्यांचा जन्म झाला. ते जन्मले त्या दिवशी जन्माष्टमी होती म्हणून मग, त्यांचं नाव कृष्णा असं ठेवलं गेलं. घरी परिस्थिती बेताची. त्यामुळे दादांनी कष्टात दिवस काढले.
पण लहानपणा पासून त्यांची निरीक्षण आणि आकलन शक्ती खूप छान. त्यामुळे आजूबाजूची माणसे, त्याचं एकमेकांशी होणारं संभाषण, त्यातील हावभाव ते नेहमी टिपत. तसेच घर चालावं म्हणून अनेक लहान मोठी कामे ते करत. त्यांनी त्याकाळी एका बँडमध्ये हि काम केलं होतं. पुढे त्यांचा ओढा सेवादलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांकडे वळला आणि मग पुढे नाटकात काम करण्याकडे वळला. नाटकात कामे करता करता त्यांची अनेक मान्यवरांशी ओळख झाली. यातील एक मान्यवर म्हणजे प्रसिद्ध लेखक वसंत सबनीस. दादांनी त्यांना एखादं नाटक लिहा म्हणून सुचवलं. सबनीस यांनी मग आपल्या सिद्धहस्त लेखणीची जादू दाखवली आणि जन्माला आलं, “विच्छा माझी पुरी करा”. कलाकार कितीही उत्तम असला तरीही त्याला प्रेक्षकांसमोर प्रस्थापित करायला एखादी कलाकृती लागतेच जी सदैव त्यांच्या मनात वसून राहते. “विच्छा…” ने ते काम दादांच्या बाबतीत केलं. त्यांनी “विच्छा…”चे जवळपास १५०० पेक्षा जास्त प्रयोग केले. नाटकातून नाव कमवत असतानाच दादांना सिनेसृष्टी खुणावत होती.
सुरुवात झाली ती भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या सिनेमाने. या सिनेमात त्यांनी अभिनय केला होता आणि पुढे या सिनेमाला फिल्मफेअरचं अवॉर्डही मिळालं. त्यांनी पुढे मग अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक या विविध भूमिकांतून या सिनेसृष्टीत झोकुन देऊन काम केलं. त्यांच्या नावावर जो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो याच क्षेत्रामुळे. दादांचे सिनेमे नेहमीच हिट ठरत असतं. त्यातील त्यांचे तब्बल ९ सिनेमे सिल्वर जुबिली चा टप्पा पार करणारे होते. सिल्वर जुबिली म्हणजे सलग २५ आठवडे एक सिनेमा थिएटर मध्ये असतो तेव्हा. सध्याच्या मल्टीप्लेक्सच्या जमान्यात या गोष्टी कालबाह्य आणि थोड्या अशक्य वाटतील. पण याच घवघवीत यशासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांच्या सिनेमांची नोंद घेतली गेली. अनेक वेळेस या सिनेमांच्या निमित्ताने वाद झाले. काही वेळेस हे वाद सेन्सॉर बोर्ड आणि दादा यांच्यामध्ये सिनेमातल्या भाषेवरून असतं. अनेक वेळेस नावावरून असत.
पण हे वाद असले तरीही दादांना सेन्सॉर मध्ये बसलेल्या व्यक्तींविषयी आदरही होता. त्यांच्या चरित्राचं म्हणजे “एकटा जीव”चं लेखन केलेल्या अनिता पाध्ये यांनी तसं एका मुलाखतीत नमूदही केलं होतं. पण या वादांमुळे सिनेमाची प्रसिद्धीही तितकीच व्हायची हे खरं. त्यांनी सिनेमात नवनवीन चेहऱ्यांना संधीही दिली, तसेच जुन्या सहकार्यांसोबातही दीर्घकाळ काम केलं. त्यांचे अनेक सहकलाकार, गायक-गायिका, तंत्रज्ञ हे विविध सिनेमांसाठी त्यांच्यासोबत काम करत. अभिनेत्री उषा चव्हाण, संगीत दिग्दर्शक राम लक्ष्मण, पटकथा लेखक राजेश मुजुमदार हि काही त्यातलीच काही नावे. त्यांचे गाजलेले सिनेमे म्हणजे बोट लावीन तिथे गुदगुल्या, पांडू हवालदार, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, आली अंगावर, ह्योच नवरा पाहिजे आणि बरेच. त्यांनी मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदी आणि गुजराती सिनेमातही काम केलं होतं. पांडू हवालदारचा तर गुजराती रिमेक त्यावेळी झाला होता. तसेच पांडू हवालदार या सिनेमाचे अजून एक वैशिष्ठ म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके अशोकजी सराफ यांनी या सिनेमात केलेली भूमिका तुफान गाजली. अशोकजींच्या शैलीत सांगायचं तर हा सिनेमा प्रसिद्ध झाल्या झाल्या अवघ्या तीन तासांत त्यांना स्टारडम मिळालेलं होतं. त्याचा किस्सा त्यांनी आपल्या काही मुलाखतींमध्ये सांगितलाच आहे.
दादांनी आपल्या आयुष्यात खूप उतार चढाव पाहिले. अनेक वाद अंगावर घेतले. पण ते लढत राहिले. पुढे १४ मार्च १९९८ रोजी त्यांना त्यांच्या दादरच्या राहत्या घरी हृद्यवि काराचा तीव्र झटका आला. जवळच्याच हॉस्पिटल मध्ये दाखल करत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. निधानावेळी ते ६५ वर्षांचे होते. एका सामान्य घरातला मुलगा ते लोकप्रिय कलाकार हा प्रवास सोप्पा नव्हता. पण जे आपल्याला वाटतं आणि पटतं ते प्रेक्षकांसमोर मांडण्याची हिंमत आणि जिद्द त्यांच्यात होती. त्याच्या सिनेमांविषयी, त्यातील भाषेच्या उपयोगाविषयी मतमतांतरे होती, त्या त्या वेळी वादही झाले. परंतु याच गोष्टींचा त्यांनी सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी वापर केला हे त्यांच्या बुद्धीचातुर्याचं उदाहरण आहे. असा हा हुशार, हरहुन्नरी आणि मराठी सिनेमासाठी प्रसिद्धी खेचून आणणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला असला तरीही, त्यांच्या कलाकृतींतून ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या लक्षात राहतील.
(Author : Vighnesh Khale)