मनोरंजन विश्वात मालिका या माध्यमांच स्वतःचं असं एक वेगळ स्थान आहे. अनेक मान्यवर कलाकार या माध्यमातून आपल्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयामुळे आधीच उत्तम कथानक असेल तर त्यास अजून शोभा चढते. अशीच एक मालिका म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’. स्टार प्रवाह वरील उत्तम कौटुंबिक मालिकांमधील एक मालिका. यात सुनील बर्वे, नंदिता पाटकर, किशोरी अंबिये यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केलेत. या मालिकेत नंदिता पाटकर यांनी मोरे कुटुंबातील सुरु वहिनी हि मुख्य भूमिका बजावली आहे. या त्यांच्या नवीन भूमिकेनिमित्त आणि १०० भाग मालिकेने पूर्ण केल्याच्या निमित्ताने नंदिता यांच्या कलाप्रवासाचा घेतलेला धांडोळा.
नंदिता यांना आपण अजून एका मालिकेसाठी ओळखतो. ती म्हणजे ‘माझे पती सौभाग्यवती’. यातील कथानक हे नक्कीच भन्नाट होते. यात त्यांनी वैभव मांगले यांच्या सोबतीने मुख्य भूमिका केली होती. या मालिकेस खूप लोकप्रियता मिळाली. नंदिता यांच्या अभिनय कारकिर्दीत अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. त्यांनी मालिकेत तसं कमी काम केलं आहे. पण त्यांची अजून एक भूमिका म्हणजे ‘तूच माझा सांगाती’ या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका. ती ही त्यांनी अगदी उत्तमरीतीने वठवली होती. किंबहुना आपण असे म्हणू शकतो कि त्यांना ऐतिहासिक भूमिका करण्याचा उत्तम अनुभव आहे. कारण त्यांनी याआधीही, ‘अरण्य-किरण’ या नाटकांत गांधारीची भूमिका केलेली होती. हे अविष्कार या नाट्य संस्थेचं नाटक. याच नावाजलेल्या नाट्यसंस्थेबरोबर केलेल्या ‘संगीत बया दार उघड’ या नाटकाने त्यांना कलाविश्वाचे दरवाजे उघडे करून दिले होते.
कारण या नाटकाच्या प्रयोगाला, ‘एलिझाबेथ एकादशी’ या लोकप्रिय सिनेमाची टीम आली होती. त्यावेळी हा सिनेमाचं शुटींगसुरु होणं बाकी होतं. नंदिता यांचा नाटकातील अभिनय बघून त्यांना या सिनेमातला आईची महत्वपूर्ण भूमिका ऑफर केली गेली. त्यांनीही ती स्वीकारली. पुढे या सिनेमाने अनेक मानांकन मिळवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं ते आजतागायत. या यशामागे नंदिता यांच्या ‘संगीत बया दार उघड’ मधलं काम कारणीभूत होतं. आजही नंदिता यांना त्याची जाणीव आहे. नुकत्याच संपन्न पडलेल्या वर्ल्ड थिएटर डे निमित्त या नाटकाच्या आठवणींना त्यांनी सोशल मिडियावरती उजाळा दिला होता. नंदिता यांचा वावर अनेक माध्यमांतून असला तरीही त्यांना नाटक अतिशय प्रिय आहे. उर्मिला पवार यांच्या आयदान या आत्मकथनावर आधारित नाटक असो वा,’आमच्या ‘ही’चं प्रकरण’, ‘वर खाली दोन पाय’ या नाट्यकृती असोत, त्यांनी आपला रंगमंचावर सदैव उत्तम काम केलं आहे.
नाटकात रमणारी हि अभिनेत्री मालिकांप्रमाणेच, सिनेमातही क्वचित काम करताना दिसते. पण त्या जे काम करतात ते सर्वोतकृष्ठ असतं. याचा दाखला त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारातून देता येतो. वर नमूद केलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ मालिकेत त्यांच्या भूमिकेची वाहवा झाली. तशीच प्रशंसा त्यांच्या ‘बाबा’, ‘खारी बिस्कीट’, ‘आणि…काशिनाथ घाणेकर’ या सिनेमांसाठीही झाली. बाबा या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा तर ‘खारी बिस्कीट’ साठी सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमांसोबातच त्यांनी ‘आणि…काशिनाथ घाणेकर’ या सिनेमात डॉ. घाणेकर यांच्या पहिल्या पत्नीची भूमिका बजावली होती. अनेक मान्यवरांनी या भूमिकेसाठी त्यांचं कौतुक केलं होतं.
अभिनयाव्यतिरिक्त नंदिता यांना भटकंती करायला आणि विविध ठिकाणचे चविष्ठ पदार्थ चाखायला आवडतात. या सोबतच त्या उत्तम चित्रकार आहेत. त्यांनी आपली मंडला या चित्रप्रकारातील अनेक चित्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाह्त्यांसोबत शेअर केली आहेत. त्यांना वाचनाचीही आवड आहे. या सगळ्या व्यस्त दिनक्रमातून योगाभ्यासासाठी त्या अगदी आवर्जून वेळ काढतात. सध्या त्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्या तरीही त्यांच्या नवीन शुटींगसाठी डबिंग सुरु झालं आहे. त्यामुळे येत्या काळातही एक उत्तम व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल यात शंका नाही. आत्ता पर्यंतच्या त्यांच्या वाटचालीत त्यांनी अनेक पुरस्कार, प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. लोकसत्ता या दैनिकाचा तरुण तेजांकित – २०१८ हा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. यापुढच्या काळातही त्यांच्या यशाचा हा सिलसिला असाच सुरु राहो हि मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)