सहकुटुंब सहपरिवार ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत अनुभवी आणि नवोदित अशा कलाकारांचा उत्तम संगम आहे. त्यामुळे तयार होणारी अभिनयाची उत्तम जुगलबंदी गेला काही काळ प्रेक्षक अनुभवत आहेत. मराठी गप्पाच्या टीमने काही काळापूर्वी या मालिकेतील काही कलाकारांच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा घेतला होता. आज अजून एका अभिनेत्रीच्या कला कारकिर्दीचा आढावा आपण घेणार आहोत. या अभिनेत्रीने सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत अवनी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. रागीट पण समजून घेणारी अशी ही व्यक्तिरेखा. ही व्यक्तिरेखा साकारली आहे, साक्षी गांधी हिने. साक्षी ही मूळची चिपळूण मधली.
साक्षीचं बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे चिपळूण येथुन झालं. तिच्या घरी तिची लहान बहीण आणि या दोघींचे आईवडील असतात. साक्षीच्या आई यांना अभिनयाची आवड होती. ती आवड साक्षीत त्यांनी रुजवली. तसेच साक्षीला ही अगदी लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धांमधून भाग घेण्याची आवड होतीच. अगदी बाल वयापासून तिने अशा स्पर्धांमधून भाग घेण्यास सुरुवात केली. आई वडिलांचा पाठिंबा होताच. पुढे पूढे तर या स्पर्धांमधून जे उत्पन्न मिळत असे त्याचा विनियोग साक्षी स्वतःच्या शिक्षणात करत असे. तिने या वक्तृत्व कलेला इतकं आपलंसं केलं आहे की आजही तिला बोलताना ऐकलं की तिचं मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व, विविध विषयांवरील तिचा व्यासंग हा आपल्या निरीक्षणातून सुटत नाही. वक्तृत्व स्पर्धांमधून भाग घेत असताना, योगायोगाने तिचा अभिनय क्षेत्राशी संपर्क आला आणि तो आजतागायत अबाधित आहे. या प्रवासाला सुरुवात झाली ती कॉलेजमधील एकांकिका स्पर्धांमधून. तिने अनेक एकांकिका या काळात केल्या. पुरुषोत्तम करंडक, अहमदनगर करंडक अशा अनेक प्रथितयश स्पर्धांमधून तिने आणि त्यांच्या ग्रुपने एकांकिका सादर करायला सुरुवात केली.
त्यातील खारुताईचा ड्रमॅटिक विकेंड, बिफोर द लाईन या एकांकिका खूप गाजल्या. तसेच साक्षीच्याही या एकांकिका खूप प्रिय आहेत. कारण आजही दरवर्षी न चुकता जेव्हा या एकांकिका सुरू झाल्या त्या त्या दिवशी ती अगदी आठवणीने या एकांकिकांचे फोटोज तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या तिने या स्पर्धांमधून भाग घेणं बंद केलं असलं तरीही त्या आठवणी तिच्या फारच जवळच्या आहेत. पण तिचा हा प्रवास मुख्यत्वे चालू होता हो चिपळूण येथून. अर्थात एकांकिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांसाठी साक्षीने पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली आहे. पण एव्हाना तिला मालिका आणि सिनेमे खुणावू लागले होते. अभिनय क्षेत्रात काम करायचं असं तिचं एव्हाना पक्कं झालं होतं. त्यामुळे तिने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. सोबत आईसुद्धा आली. पण मुंबईत राहायचं तर केवळ काम मिळेल या आशेवर कशी राहणार म्हणून तिने एके ठिकाणी नोकरी करणं तिने सुरू केलं. त्या काळात ज्या भूमिकांमधून काम करता येईल त्या भूमिका साकार केल्या. अग्ग बाई सासूबाई या मालिकेत तिने काही भाग पाहुणी कलाकार म्हणून काम केलं. या भागात जेव्हा आसावरी यांचं कुटुंब बाहेर फिरायला जातं तेव्हा त्यांना मदत करणाऱ्या टुरिस्ट गाईडची भूमिका तिने केली होती.
तसेच अल्टी पल्टी या मालिकेतही तिने अभिनय केला आहे. या मालिकेतील मनाली ही भूमिका तिने निभावली होती. तसेच काही सिनेमांमधून तिने लहान मोठ्या भूमिका केल्या. हिरकणी या प्रसाद ओक यांच्या सिनेमात तिने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींपैकी एकीची भूमिका केली होती. तसेच मन उधाण वारा, उडान हे सिनेमेही केले. येत्या काळात तिचे अजून काही सिनेमे प्रदर्शित होतील. यातील बलोच हा प्रवीण तरडे यांचाही एक सिनेमा आहे. सध्या ती सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. तसेच मालिका आणि सिनेमे यांतील कामांमुळे ती मुंबईत राहत असे. पण गेले काही महिने ती लॉकडाऊनमुळे चिपळूणला गेली होती. या काळात तिने दोन गोष्टी प्रामुख्याने केल्या. एक म्हणजे अनेक उत्तमोत्तम रेसिपीज तिने बनवल्या आणि कुटुंबियांना खाऊ घातल्या. काहींचे फोटोज ही चाहत्यांबरोबर तिने शेअर केले होते. तसेच ती वारली चित्रकला ही या काळात शिकली. अभिनया व्यतिरिक्त साक्षी ही अनेक कार्यक्रमांतील रॅम्प वॉक मध्ये सहभागी होत असे.
एका प्रथितयश संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिला बेस्ट फेस हा किताब मिळाला होता. या सोबतच, तिने काही कार्यक्रमांचे निवेदनही केलेले आहे. त्यामुळे ती एक हरहुन्नरी कलाकार आहे, हे जसं सिद्ध होतं. तसंच येत्या काळातील एक सुप्रसिद्ध अष्टपैलू कलाकार म्हणून ती नावारूपाला येऊ शकते असे म्हंटल्यास वावगं ठरू नये. अशा या उत्तम अभिनेत्रीला मराठी गप्पाच्या टीमकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! आपण हा लेख वाचलात याबद्दल धन्यवाद. मराठी गप्पाच्या टीमने ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील नंदिता धुरी, कोमल कुंभार आणि आकाश नलावडे यांच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा घेतला होता. मालिकेत ही कलाकार मंडळींनी अनुक्रमे सुरू वहिनी, अंजी आणि पश्या या व्यक्तिरेखा साकार केल्या आहेत. तुम्ही जर हे लेख वाचले नसतील किंवा पुन्हा वाचायचे असतील तर आपण वर उपलब्ध सर्च ऑप्शनचा वापर करू शकता. सर्च ऑप्शनमध्ये जाऊन ‘सहकुटुंब सहपरिवार’ असे टाईप करून सर्च केल्यास हे लेख आपणांस उपलब्ध होतील. आपल्या वेळेसाठी आणि मराठी गप्पाचे नियमित वाचक असण्यासाठी धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)