मराठी मालिकाविश्वात नवनवीन मालिका या काही काळाने दाखल होत असतात. स्टार प्रवाह या वाहिनीवर गेल्या काही काळात नवनवीन मालिका दाखल झाल्या आहेत आणि प्रेक्षकपसंतीसही उतरल्या आहेत. या मालिकांच्या मांदियाळीत नव्याने दाखल झालेली मालिका म्हणजे ‘सांग तू आहेस का’. या मालिकेतून सिद्धार्थ चांदेकर आणि शिवानी रांगोळे हे चेहरे आपल्या भेटीस आलेले आहेत. या दोघांसोबतच अजून एक चेहरा या मालिकेत लक्ष वेधून घेतो. हा चेहरा म्हणजे मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेतील अभिनेत्रीचा. मालिका सुरू होण्याआधी पासूनच या चेहऱ्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच काहींना हा चेहरा आधी खूप वेळा पाहिल्यासारखा वाटला असणारच.
या अभिनेत्रीचं नाव आहे सानिया चौधरी. तिने याआधी ‘साजणा’ या मालिकेत तेजु ही व्यक्तिरेखा साकार केली होती. या तिच्या भूमिकेसाठी तिचं कौतुकंही झालं होतं. मूळची पुणेकर असणाऱ्या सानिया हिचं बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातून झालं. तिला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड. कलासक्त असणाऱ्या तिच्या आई वडिलांनीही तिला ही आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहनच दिलं. त्यामुळे शालेय वयापासून तिने कथ्थक चे शिक्षण घेण्यास सुरवात केले आणि त्यात पारंगत ही झाली. तसेच तिने वेस्टर्न डान्स प्रकाराचेही प्रशिक्षण घेतलेले आहे. पण केवळ प्रशिक्षण घेऊन ती थांबलेली नाही. तिने अनेक कार्यक्रमांमधून स्वतःची नृत्यकला पेश केलेली आहे. कथ्थक या नृत्यप्रकारद्वारे कथाकथन केले जाते. त्यामुळे यात अभिनयाचा मोठा भाग हा आलाच. या अनुभवाच्या जोरावर तिने मालिका, शॉर्ट फिल्म्स, नाटक या माध्यमांमधून अभिनय केलेला आहे. ‘रेसिपी’ ही तिने अभिनित केलेली शॉर्ट फिल्म होय.
तसेच ‘त्या रात्री’ या नाटकातूनही तिने अभिनय केलेला होता. अभिनय आणि नृत्यासोबतच तिने सूत्रसंचालक म्हणूनही काही कार्यक्रमांचा डोलारा सांभाळला आहे. तसेच ती मॉडेलिंग ही करते. काही कार्यक्रमांतून तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेऊन अनेक पारितोषिकं ही पटकावली आहेत. सध्या ती ‘सांग तू आहेस का’ या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या मालिकेतून एक उत्तम अभिनेत्री म्हणून ती नावारूपास येते आहे आणि तिच्या लोकप्रियतेत अजून भर पडेल हे नक्की. या उदयोन्मुख अष्टपैलु अभिनेत्रीला मराठी गप्पाच्या टिमकडून तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! त्याचप्रमाणे वरील लेखात सांग तू आहेस का मालिकेतील सिद्धार्थ चांदेकर आणि शिवानी रांगोळे ह्यांचा उल्लेख झाला आहे. मराठी गप्पावर ह्या कलाकारांच्या जीवनप्रवासाबद्दलचे लेख उपलब्ध आहेत. तुम्ही सर्च ऑप्शनचा वापर करून हे लेख वाचू शकता. तुमच्या बहुमूल्य वेळेसाठी धन्यवाद.