मराठी गप्पाच्या माध्यमातून अनेक मराठी कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याच्या प्रयत्न आमची टीम अगदी सातत्याने करत असते. अनेक वेळेस आमचे वाचक, स्वतः कलाकार किंवा अगदी कला क्षेत्रातील इतर मंडळी यांच्या कडून आमच्या या लेखांचं कौतुक होतं असतं आणि आमच्या टीमला प्रोत्साहन मिळतं असतं. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल संपूर्ण मराठी गप्पाच्या टिमकडून धन्यवाद ! या लेखांमधून अनेक वेळेस आपण उदयोन्मुख आणि प्रसिद्ध कालाकारांविषयी जाणून घेत असतो. आज याच मांदियाळीतील एका उदयोन्मुख अभिनेत्रीविषयी आपण जाणून घेणार आहोत. नुकत्याच सुरू झालेल्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेचा ती महत्वाचा भाग आहे. ही मालिका थररापट स्वरूपाची असली तरीही या आधी या अभिनेत्रीने विविध प्रकारच्या मालिकांतून अभिनय करत स्वतःची छाप पाडली आहे. तसेच ती रंगमंचावरील अनेक कलाकृतींचा भाग असतेच.
आपल्या सुजाण वाचकांनी नाव ओळखलं असेलंच. आज आपण शिवानी रांगोळे हिच्या कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत. शिवानी ही मूळची पुण्यातली. तिचं बालपण, शालेय-महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. लहानपणापासून तिला अभिनयाची आवड. तिने एकांकिकांमधून अभिनय करण्यास सुरुवात केली. तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर, समीक्षकांवर आणि सहकलाकारांवर पडत होतीच. आजही काही नाट्यकृतींच्या माध्यमातून शिवानी रंगमंचाशी निगडित असते. तसेच तिने टीव्ही मालिकांमधूनही अभिनय केलेला आहेच. शेजारी शेजारी पक्के शेजारी ही तिची गाजलेली मालिका. त्यातील महुआ ही विनोदी तरीही तरल मनाची तिची व्यक्तिरेखा खूपच प्रसिद्ध झाली होती. तसेच बनमस्का या मालिकेतही तिने अभिनय केलेला होता. नजीकच्या काळातील लोकप्रिय ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतही तिने रमाबाई आंबेडकर यांची महत्वपूर्ण भूमिका साकार केलेली आहे. रमाबाईंच्या तिने साकार केलेल्या भूमिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत भरच पडली आहे, इतकं उत्तम काम तिने केलं होतं. सध्या ती ‘सांग तू आहेस का’ या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
रंगमंच आणि मालिकांसोबतच तिने ओटीटी या नवं माध्यमातूनही अभिनय केलेला आहे. यात तिने काम केलेल्या वेबसिरीज म्हणजे ‘SHE’, ‘यो लो’, ‘इडियट बॉक्स’ इत्यादी. या पैकी SHE ही वेब सिरीज इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेली आहे. येत्या काळात या वेबसिरीजचं पुढचं पर्वही येईल. तसेच शिवानी हिची अजून एक हिंदी वेबसिरीज येत्या काळात प्रसिद्ध होईल. वेब सिरीज सोबतच तिने सिनेमांतूनही अभिनय केलेला आहे. ‘फुंतरु’, ‘& जरा हटके’ हे तिने अभिनित केलेले चित्रपट. वैविध्यपूर्ण माध्यमांतून आणि भूमिकांतून उत्तम अभिनेत्री म्हणून शिवानी सध्या आपल्या कारकिर्दीत आगेकूच करते आहे. सोबतच तिने स्वतःतील लेखिकेला सुद्धा तिच्या चाहत्यांसमोर सादर केलेलं आहेच. गेल्या काही काळातील महाराष्ट्र टाईम्स मधील मेमरी कार्ड या सदराअंतर्गत तिने उत्तम असं लिखाण केलेलं आहे. तिने नेहमीच, ती भाग असलेल्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना आनंद दिला आहे. यापुढेही तिच्या भूमिका, लेख तिच्या चाहत्यांना आनंद देत राहील हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून तिला मनःपूर्वक शुभेच्छा !