आपण सध्या ज्या काळात राहतो आहे त्या काळात तांत्रिकदृष्ट्या आपण गेल्या काही शतकांच्या मानाने खूप प्रगती केली आहे, असं दिसून येतं. या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उत्तमोत्तम वास्तू जगभर उभारल्या गेल्या आहेत. पण काही वास्तू किंवा गोष्टी या अशाही आहेत ज्या कित्येक शतकांपासून अस्तित्वात आहेत आणि त्यांची उभारणी कशी केली गेली असेल किंवा निर्मिती कशी झाली असेल हा आजही एक संशोधनाचा विषय आहे. पिसाचा झुलता मनोरा हा त्यातीलच एक. हि इमारत जेव्हा बांधण्यात येत होती तेव्हा ती काही अंशात झुकत गेली. आज जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये त्याची गणना होते. पण अशीच एक गोष्ट आपल्याला भारतात पाहायला मिळते. हि गोष्ट म्हणजे एक पाषाण आहे. २० फुट उंच आणि १५ फुट रुंद असा. बरं या माहितीत काही वेगळ वाटण्यासारखं नसावं. कारण आपण ट्रेकिंगसाठी फिरताना अनेक वेळेस मोठ मोठे पाषाण किंवा दगड वगैरे दिसतातच कि.
पण इथेच खरी मेख आहे. जिथे तर्क चालत नाही. कारण एवढ्या उंचीचा हा पाषाण आहे २५० टनांचा आणि तो केवळ चार स्क्वेअर फुट इतक्याच जागेवर उभा आहे. अबबबब म्हणावं अशीच हि गोष्ट. या आश्चर्यात भर घालणारी अजून एक गोष्ट म्हणजे हा पाषाण एका नैसर्गिक उतारावर काही अंशाच्या कोनात उभा असून, सद्य स्थितीत तो गेली १२०० ते १३०० वर्ष उभा आहे. विविध बाजूंनी निरीक्षण केलं असता आणि विविध अंगांनी विचार केला असता हा नैसर्गिक चमत्कार म्हणावा असंच आहे. किंबहुना म्हणूनच याला पुरातन काळापासून एक नाव पडलेलं असावं ते म्हणजे ‘वान ईराई काल’ म्हणजे ‘अवकाशस्थ देवतांचा पाषाण’. काही जण याला ‘Krishna’s Butterball’ म्हणजे कृष्ण देवाच्या लोण्याचा गोळा असेही संबोधतात. तमिळनाडू मधील ममल्लापुरम येथे हा पाषाण गेली कित्येक शतकं कुतूहलाचा विषय बनून राहीला आहे.
खासकरून जेव्हा जेव्हा याला इथून हटवण्याचे प्रयत्न झाले तेव्हा तेव्हा आलेले अपयश याच्यामुळे या पाषाणाभोवतालचं कुतूहल आणि सोबतच प्रसिद्धी हि वाढत गेलेली आहे. पुरातन काळात पल्लवा राजघराण्याच्या काळात या पाषाणाला जागेवरून हटवण्याचे निष्फळ प्रयत्न झाले. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातही १९०८ साली असे प्रयत्न झाले होते. या काळात त्या भागाचा इंग्लिश गवर्नर असलेल्या आर्थर हॅवलॉक याने तब्बल सात हत्ती मागवले. त्यांच्या करवी हे अवजड काम कारून घेण्याच्या प्रयत्न झाला. पण हा पाषाण तसूभरही हलला नाही. जसं अपयशामुळे याला प्रसिद्धी मिळाली तशीच या पाषाणापासून स्फूर्ती घेऊन चोला वंशात जन्मलेल्या राजा अरुमोली वर्मन याने मातीच्या बाहुल्या बनवून घेतल्या. ज्यांचा आकार मोठा असला तरीही तळ हा थोडा छोटा असतो. त्यामुळे त्या कलंडतात पण पडत नाहीत.
अनेक कथा आणि दंतकथा यांनी प्रसिद्ध झालेली हि जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेली आहे. युनेस्कोतर्फेहि याला जागतिक हेरीटेज साईटचा दर्जा देण्यात आलाच आहे. मागील वर्षी चीन चे राष्ट्रपती क्षी जीन पिंग यांनी भारताला भेट दिली त्या समयी भारताचे पंतप्रधान मोदि यांच्यासमवेत या आश्चर्यास त्यांनी भेट दिली होती. असा हा नैसर्गिक चमत्कार जो गुरुत्वाकर्षणाचे नियम पुन्हा विचार करायला लावतो. त्याभोवती एक गूढ असं वलंय आहे, ज्यामुळे उत्तरोत्तर त्याच्या प्रसिद्धीत भरच पडते आहे. येत्या काळातही त्याच्या भोवती असलेल्या उत्सुकतेला काही उत्तर मिळेल का, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी एक ऐतिहासिक महत्व असलेलं पर्यटन स्थळ म्हणून तो नावारूपाला आला आहे आणि कौतुकमिश्रित अचंब्याचा विषय ठरला आहे हे नक्की.
(Author : Vighnesh Khale)