आयुष्यात शिस्त किती महत्वाची आहे हे आपल्याला नव्याने सांगणे न लगे. ज्या ज्या व्यक्तींनी शिस्तीचं जीवन अंगिकारलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्यात यश, कीर्ती संपादन केलीच सोबतच ज्या ज्या वेळी देश, आस्थापने यांच्यासाठी कामं केली त्या त्या वेळी या देशांची, आस्थापनांची नावंही मोठं केलं. या सगळ्यांच्या पाठी शिस्त असणं, हा एक सामायिक गुणधर्म दिसून येतो. पण आपल्या समाजात एक मोठा वर्ग असाही असतो जो शिस्त आणि त्यातही सामाजिक जीवनातील शिस्त पाळताना दिसत नाही. हा वर्ग कोणत्याही ठराविक वयोगटातील किंवा आर्थिक परिस्थितीशी निगडित नसतो. हा वर्ग असतो नियम मोडण्यात धन्यता मानणाऱ्या मानसिकतेशी संबंधित. पण या सगळ्यांच्या पुढे एक उत्तम उदाहरण ठरू शकेल असा एक व्हिडियो आमच्या टीमच्या हाती लागला आणि तो आमच्या वाचकांसमोर आणणं आम्हाला आमचं आनंददायी कर्तव्य वाटलं.
हा वायरल व्हिडियो आहे एका सद्गृहस्थांनी सकाळच्या वेळेस प्रवास करताना काढलेला. ते एके ठिकाणाहून इच्छित स्थळी जात असताना अहमदनगरच्या देवगड येथील दत्त मंदिर संस्थानांच्या मुलांची रस्त्यातून चाललेली रांग त्यांच्या नजरेस पडते. बरं मुलं चालत चालली आहेत का, तर तसंही नाही. सगळी मुलं आपापल्या सायकल वर बसून आपलं मार्गक्रमण करत असतात. तेही, एका ओळीत आणि रस्त्याच्या डाव्या बाजूने. जेणेकरून समोरून येणाऱ्या वाहनांना जाण्यास जागा मिळावी आणि गैरसोय होऊ नये. एवढ्या पाचपंचवीस मुलांचा घोळका एरवी खूप दंगा करू शकतो आणि त्रासदायकही ठरू शकतो. पण ही सगळी गुणी मुलं अगदी शांतपणे जात असतात. त्यात आघाडीवर असतात मुली आणि त्यांच्या मागून मुलं जात असतात. या संपूर्ण व्हिडियो मध्ये एकदा समोरून एक बैल गाडी येतानाही दिसते. तेही सहज या मुलांना ओलांडून जातात. ज्यांनी हा व्हिडियो रेकॉर्ड केला आहे ते सद्गृहस्थ संपूर्ण व्हिडियोत आपलं म्हणणं मांडत असतात.
आपल्यालाही ते पटत जातं. तसेच ही अभूतपूर्व पण गरजेची असलेली शिस्त पाहून त्यांच्या मुखातून कौतुकाचे बोल उमटतात त्याचप्रमाणे आपणही मनातल्या मनात का होईना कौतुक करतोच. काही जण तर हा व्हिडियो ही शे’अर करतात. आपणासही हा लेख आवडला असल्यास आपण तो शे’अर करावा. तसेच या लेखाच्या माध्यमातून हा व्हिडीओ काढणाऱ्या काकांचे आभार आणि मुलांना अशी योग्य शिस्त लावल्याबद्दल देवगड संस्थानचे आणि त्यांच्या शाळेतील गुरुजनांचे ही कौतुक. आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपण शे’अर करालंच. सोबत आमच्या अन्य लेखांचाही आनंद घ्या. वर उपलब्ध असलेल्या स’र्च ऑ’प्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा. आपल्याला विविध लेख वाचायला मिळतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !
बघा व्हिडीओ :