टीव्हीवरील कार्यक्रम म्हणजे धकाधकीच्या जीवनातला विरंगुळा. त्यातही यातील संगीत विषयक कार्यक्रम तर आपल्या सगळ्यांच्या विशेष आवडीचे. या संगीत विषयक कार्यक्रमांची गेल्या काळात संख्याही झपाट्याने वाढली आहे. पण यात एक नाव मात्र आपला दबदबा आणि अदब राखून आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. हे नाव म्हणजे ‘सा रे ग म प’ यांची हिंदी, मराठी आणि अन्य भाषांतील कार्यक्रम. अशा या लोकप्रिय नाममुद्रेअंतर्गत मराठीतील लिटिल चॅम्प्सचं नवीन पर्व नुकतंच सूरु झालं. आनंदाची बाब म्हणजे यात परीक्षक म्हणून पहिल्या वहिल्या मराठी लिटिल चॅम्प्स मध्ये पंच रत्न म्हणून नावाजलेले गायक सहभागी झाले आहेत. जवळपास एका तपाने त्यांना पुन्हा या मंचावर बघताना आनंद तर होतोच, सोबत या काळात त्यांनी जी प्रगती केली आहे त्या प्रगती बद्दल त्यांचं कौतुक ही वाटत. सध्या ही पंचरत्न नव्या पिढीतील लिटिल चॅम्प्सना पैलू पाडताना दिसत आहेत. या नवीन गायकांमधील एक लहान मुलगी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. याच चिमुरडीविषयी आणि तिच्या पालकांविषयी आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
या चिमुरडीचं नाव आहे स्वरा जोशी. नावाप्रमाणे गोड गळा लाभलेली ही पोर तिच्या तेवढ्याच गोड, मनमिळावू आणि सहज स्वभावाने मन जिंकून घेत असते. सोबतच तिचं निरागस रूप आपल्याला तिच्या प्रेमात पाडत. तिच्या गाण्याला तिने केलेल्या छान अभिनयाची ही जोड असतेच. एकूणच काय तर स्वरा म्हणजे उत्तम गाणं आणि सोबत मस्त असा अभिनय. अशा या चिमुरडीचे आई आणि वडील असे दोघेही संगीत क्षेत्राशी निगडित आहेत. आपल्याला आठवत असेल तर सा रे ग म प च्या ७ व्या पर्वात एका गायिकेने आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी परीक्षक आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. त्यासाठी त्यांचं कौतुक ही झालं होतं. या गायिकेचं नाव म्हणजे केतकी भावे. पुढे त्यांचं अभिजित जोशी यांच्याशी लग्न झालं आणि त्या झाल्या केतकी भावे – जोशी. या दोघांचं कन्यारत्न म्हणजे स्वरा होय. केतकी या जशा उत्तम गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच अभिजित हे सुदधा संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. या दोघांच्या घरी गायन कलेला वाव मिळेल असं वातावरण हे होतंच. तोच वारसा त्यांनी आपल्या लेकीला दिलेला दिसून येतो. अर्थात असं असलं तरी या चिमुरडीने एवढ्या लहान वयातही केलेली मेहनत अव्हेरता येत नाही. किंबहुना प्रत्येक नवीन भाग हा स्वराच्या स्वरांचा नवीन असा एखादा आविष्कार घेऊन येत असतो.
हा लेख लिहीत असतानाच्या आठवड्यात झालेल्या भागात तर स्वराला विशेषकरून दाद मिळाली आहे. तसंच आपण सगळ्यांनी पाहिलं असेल त्याप्रमाणे या वेळेच्या ‘चला हवा येऊ द्या’ च्या भागातही स्वरा आपल्याला दिसून आली होती. तिच्या लाघवी स्वभावाची भुरळ तिथेही पडलीच म्हणा. यापुढेही तिच्या गाण्याची आणि मनमोकळ्या स्वभावाची जादू आपल्या सगळ्यांच्या मनावर कायम राहो या आमच्या टिमकडून स्वराला शुभेच्छा !
आपल्यालाही स्वरा आणि तिचं गाणं आवडतच असेल. आपल्या कमेंट्स मधून आपण तिचं कौतुक करालच. सोबतच आपल्या या गोड गळ्याच्या गायिकेबद्दल आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला का हे कळवायला ही विसरू नका. कारण आपण लिहिलेल्या सकारात्मक कमेंट्स आणि मोठ्या प्रमाणावर लेख शेअर करणं यातून आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. या प्रोत्साहनातून नवनवीन विषयांवर लेख जन्माला येत असतात. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला सदैव मिळत राहू दे ही सदिच्छा. लोभ असावा.