ऑनलाइन जगतात हॅकर्स असतात ही गोष्ट काही आपल्याला नवीन नाही. किंबहुना या हॅकर्सचा फटका आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना कधी ना कधी बसलेला असतो किंवा आपण निदान तसं बातम्यांतून वाचत किंवा ऐकत असतो. मराठी गप्पावर काही काळापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता धोंगडे हिचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची बातमी वाचली असेलंच. सेलिब्रिटीजच्या बाबतीत असं होणं, हे नजीकच्या काळात वारंवार घडताना दिसतं आहे. सध्या अशाच एका हॅकिंग प्रकारचा बळी होण्यापासून एक मराठी सुपरस्टार थोडक्यात वाचला आहे.
या मराठी सुपरस्टारचं नाव आहे, स्वप्नील जोशी. स्वप्नील म्हणजे गेले कित्येक वर्षे मराठी मनोरंजन क्षेत्राचा चेहरा आहे. त्यांच्याबाबतीत असं घडल्याने मनोरंजन क्षेत्र तसेच प्रेक्षकांमधूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. झाल्या प्रकाराची माहिती स्वप्नील यांनी स्वतः एका इन्स्टाग्राम व्हिडियो मधून त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यात ते असं म्हणाले की त्यांना डायरेक्ट मेसेज म्हणजे एक डी. एम. आला. हा मेसेज इन्स्टाग्राम सपोर्ट अशा नावाच्या अकाउंट कडून आला होता. कुठचीही पोस्ट नसली तरी काही हजारांत या अकाउंटचे फॉलोवर्स असल्याचे दिसत होते. स्वप्नील यांना या अकाउंट कडून आलेल्या मेसेज मध्ये स्वप्नील यांच्या एका पोस्टमध्ये कॉपी राईटचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात येत होते. झाला प्रकार अनपेक्षित असल्याने स्वप्नील यांनी त्यांच्या सोशल मीडिया टीम ला तसे कळवले. त्यांची सोशल मीडिया टीम लगेच कार्यरत झाली होती. दरम्यान कॉपी राईट बद्दलच्या मेसेज नंतर स्वप्नील यांच्या कडून त्यांचा इन्स्टाग्राम आय.डी. आणि पासवर्ड मागण्यात आल्याचे स्वप्नील यांनी व्हिडियोमध्ये नमूद केले होते. तसेच एक फॉर्म भरण्यास सांगण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले होते. झाल्या प्रकारामुळे स्वप्नील यांना शंका आली होती, जी पुढे खरी ठरली.
तसेच काही क्षण असं वाटलं होतं की त्यांनी मेहनत करून जे फॉलोवर्स कमावले आहेत ते निघून जातात की काय. जो प्रकार अमृता धोंगडे हिच्या बाबतीत घडला होता. अमृताचे काही हजार फॉलोवर्स असलेलं अकाउंट हॅक झाल्यामुळे तिला नवीन अकाउंट उघडावे लागले होते. स्वप्नील यांच्या बाबतीत त्यांच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्स ची संख्या ही १० लाखांच्याही पुढे आहे. त्यामुळे होणारे नुकसान अर्थातच मोठे होते. पण, त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. आणि त्यांनी अकाउंट हॅक होण्यापासून वाचवले. त्यांनी घडलेला प्रसंग त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून सांगितला आहेच आणि इतरांनीही काळजी घ्यावी असं आवाहन त्यात केलेलं आहे. स्वप्नील यांच्या प्रमाणेच अमृता हिच्या सोबतही जवळपास तसाच प्रकार झाला होता. त्याबद्दलचा सविस्तर लेख तुम्हाला वाचायचा असल्यास वर उपलब्ध सर्च ऑप्शन मध्ये जा. अमृता धोंगडे असं टाईप करून सर्च करा, तुम्हाला तो लेख मिळेल. तसेच ऑनलाइन असताना, सतर्क राहा, सुरक्षित राहा !
बघा व्हिडीओ :
(Author : Vighnesh Khale)